Poem

येशील ना?…

प्रिये तोडुनी साऱ्या बंधना.
आता तरी येशील ना?
येशील ना?…

मी जनी जनी तुज शोधतो
ठेच लागता जरा थांबतो
तू स्वैर हिंडते मनोवनी
अश्रू सम वाहते लोचनी
या आंबलेल्या मनास गं,
गंध तुझा देशील ना?
आता तरी येशील ना?
येशील ना?…

तू आहेस अथवा नाही
मजला हे ठाऊक नाही
तरी मी खुळ्या सारखा
तिष्ठतो चातका सारखा
हे अंतर दूर करण्या,
प्रेम-सेतू होशील ना?
आता तरी येशील ना?
येशील ना?…

मी जसा झुरतो इथे
तुही झुरतेस का तिथे?
कल्पनेच्या या प्रणयक्रीडा
तुलाही होतात का विरहपीडा?
परमोच्च बिंदू तो गाठण्या,
बीज तू होशील ना?
आता तरी येशील ना?
येशील ना?…

न संपणाऱ्या या वेदना
का देतेस तू कल्पना?
मी दुःख सारे वेचतो
अन शब्दमाळ गुंफतो
मी लिहितो हे गीत,
तू ओठ सांग होशील ना?
आता तरी येशील ना?
येशील ना?…

प्रिये तोडुनी साऱ्या बंधना.
आता तरी येशील ना?
येशील ना?…

कविता: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01