Reviews - Film, Books, Plays

We The People

#ओळख_एकांकिकांची


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01

गेल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे आज मी We The People या एकांकिकेबद्दल सांगणार आहे. गेल्या लेखासंबंधी दोन महत्वाच्या टिप्स आलेल्या, त्या म्हणजे लेखन सविस्तर करावं आणि एकांकिकांची संपूर्ण माहिती द्यावी. चित्रपटाची माहिती सांगितल्यावर चित्रपट पाहणे शक्य आहे. पण एकांकिकांबद्दल तसे होत नाही. म्हणून सविस्तर लिहिणेच भाग आहे. We The People या एकांकिकेबद्दल किती सविस्तर लिहिता येईल हे मला ठाऊक नाही. कारण ७-८ वर्षांपूर्वीची गोष्ट असल्यामुळे आणि त्याकाळी मी शिकण्याच्या प्रक्रियेत असल्यामुळे ही एकांकिका मला पुसटशी आठवतेय. आजही मी शिकण्याच्या प्रक्रियेतच आहे. आपण नाटर सादर करतो त्यास मराठी प्रयोग असे म्हणतात. म्हणून रंगकर्मीसाठी शिकण्याची प्रक्रिया कधीच थांबत नाही. ती थांबली की प्रगती खुंटते. असो.

तर नवरात्रौत्सव मंडळ दादरतर्फे (कदाचित असेच नाव असावे) एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धे किशोर नार्वेकर लिखित आणि दिग्दर्शित “चाळ म्हणाली बिल्डिंगला” ही एकांकिक सादर केली. पण या स्पर्धेत आम्हाला केवळ अभिनयाचं पारितोषिक मिळालं. ते पारितोषिक “अम्मा” ही भूमिका करणार्‍या बाईला मिळालं. पण या स्पर्धेत जवळ जवळ सगळेच पारितोषिके We The People या एकांकिकेने पटकवले. माझ्या मते त्या वर्षी ही एकांकिका विविध स्पर्धांमध्ये बाजी मारत होती. असे काय होते या एकांकिकेत? तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी अगदी नवा विषय हाताळता येत नाही. याआधी हा विषय कुणी हाताळलाच नाही असेही म्हणता येत नाही. तरी काही लोक अगदी वेगळ्या विषयाला हात घालण्यात यशस्वी सुद्धा होतात. पण विषयाची बांधणी चांगली नसल्यामुळे त्या वेगळ्या विषयाला न्याय देता येत नाही. We The People चा विषय अगदी सामान्य आहे. विषयात नाविन्य मुळीच नव्हते. या विषयावर अनेक चित्रपट येऊन गेलेत असे म्हटले तरी वावगे ठरु नये.

एकांकिका एकांकिका वेड्यांच्या इस्पितळात घडते. ८ – १० वेडे आधीच त्या इस्पितळात उपचार घेत आहेत. एकांकिकेचा बाज विनोदी. त्यामुळे ते सर्व वेडे प्रेक्षकांना हसवण्याचे यशस्वी प्रयत्न करतात. म्हणजे कधी हे वेडे पंखा बनतात तर कधी अजून काही. त्या वेड्यांमध्ये एक प्रमुख वेडा असतो. या एकांकिकेचे दिग्दर्शन इतके कुशल होते की mannerism व miming उत्कृष्ट असेच होते. अगदी प्रत्येक बाब मला आठवत नाही. या सर्व वेड्यांचा बाजार सुरु असताना त्यांच्यात अजून एका वेड्याची भर पडते. हा वेडाही यांच्यात मिसळतो. जवळ जवळ पंधरा मिनिटे विनोदावर भर देऊन आणि characters develop करुन एकांकिका मूळ विषयावर स्थिरावते. या वेड्यांमध्ये जो प्रमुख वेडा असतो त्याने आपल्या एका व्यक्तीचा खुन केला आहे व त्या खुनापासून वाचण्यासाठी तो वेड्याचं नाटक करत असतो. हा प्रमुख वेडा नव्याने आलेल्या वेड्याशी मैत्री करु लागतो. कारण त्याला असा संशय आहे की नव्याने आलेला वेडा हा वेडा नसून आपल्यासारखा ठग आहे. तो प्रमुख वेडा नव्याने आलेल्या वेड्याला गुपचूप गाठतो आणि त्याला सांगतो की “तू वेडा नाहियेस, हे मला माहितीये”. पण तो नव्याने आलेला वेडा बेअरिंग सोडत नाही. पण प्रमुख वेडा आपली जिद्द सोडत नाही व त्याला सांगतो की त्याने कशाप्रकारे आपल्या बहिणीला वाचण्यासाठी खून केला. खून करणं हा आपला पेशा नाही. पण नाइलाज होता. त्याच्या या कहाणीने नव्याने आलेला वेडा दुःखी होतो व तोही त्याला सांगतो की आपल्या बहिणीवर बलात्कार करणार्‍याला आपण मारुन टाकले. हे संभाषण सुरु असताना जे इतर वेडे आहेत ते विविध पोजिशनमध्ये फ्रीज झाले आहेत. ते हलत नाही हे विशेष.

नव्याने आलेला वेडा जेव्हाबहिणीवरच्या अत्याचाराचे वर्णन करतो तेव्हा रंगमंचावर एक घटना चटकन घडते ती म्हणजे विंगेतून एक मुलगी किंचाळी एक रंगमंचावर कोसळते. तिच्या लाल लाईट्स दिल्या जातात आणि काही माणसे तिच्या भोवती फिरु लागतात. म्हणजे तिच्यावर बलात्कार होतोय असं प्रेक्षकांना वाटू लागतं. पण दोघांचं संभाषण सुरु असताना जेव्हा ही मुलगी किंचाळत रंगमंचावर कोसळते तेव्हा प्रेक्षक म्हणून तुम्ही दचकता. कारण असे काही घडेल याची कल्पना तुम्ही केलेली नसते. मग हळू हळू तिच्यावरच्या लाईट्स कमी होतात व ती एक्झीट घेते आणि पुन्हा संभाषण सुरु होतं. मग तो नव्याने आलेला वेडा आपण खून केल्याची ग्वाही देतो. तो ग्वाही देतो आणि एकाएकी फ्रीज झालेले सर्व वेडे क्षणात आणि एका तालात स्थिर उभे राहतात, त्यांच्या हातात बंदूक येते, तसेच तो प्रमुख वेडाही नव्याने आलेल्या वेड्याच्या दिशेने बंदून रोखून उभा राहतो. ही हालचाल इतकी जलद होते की त्या सर्वांनी बंदूक कधी आणि कुठून काढली हेच कळत नाही. अर्थात त्यांनी लेंग्यात बंदूक लपवलेली असते. पण सबंध एकांकिकेत याची जाणीव होत नाही. ते सर्व वेडे पोलिस असतात आणि प्रमुख वेडा हा ऑफिसर असतो. नव्याने आलेला वेडा नाटक करतोय हे पोलिसांना आधीच माहित असतं. म्हणूण तो इस्पितळात येण्याआधी हे सर्व पोलिस त्या इस्पितळाच्या एका रुमचा ताबा घेऊन वेड्याचा अभिनय करत असतात. त्याला अटक होते आणि एकांकिका संपते.

We The People… पोलिसांच्या कुशल आणि सक्षम ऑपरेशनवर (कार्यावर) आधारित ही एकांकिका. उत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, संगीत, अभिनय असे सर्वच पारितोषिक या एकांकिकेने पटकवले. यात एक बुटक्या माणूस पाहूणा कलाकार होता. त्यालाही अभिनयाचे पारितोषिक मिळाले. मी अनेक ज्येष्ठ रंगकर्मींना बोलताना ऐकलंय की छोटीशी भूमिकाही प्रभावीपणे सादर करता येते. केवळ भूमिकेचा खोलात जाऊन अभ्यास करावा. याचे हे उत्तम उदाहरण होते. सर्व सहाय्यक अभिनेत्यांनी जे काम केले आहे, त्यास तोड नाही. लेखन तर अतिशय उत्कृष्ट. विषय जरी सामान्य असला तरी मांडणी आणि दिग्दर्शनातलं नाविन्य भन्नाट होतं. एकांकिका कशी लिहावी आणि कशी सादर करावी, याचं उत्तम उदाहरण म्हणजे We The People… संभाजी सावंत सर नेहमी म्हणतात की नाटकांमध्ये/एकांकिकांमध्ये अंतरंग दाखवायचं असतं. हे समजून घेण्याचा मी सध्या प्रयत्न करतोय. माझे काही मित्र मला म्हणतात की तू संवाद चांगले लिहितोस, पण नाट्य घडवताना प्रॉब्लेम होतो. ही कसर मी तिसरी घंटा या नाटकात भरुन काढण्याचा प्रयत्न केला आहे. पण या गोष्टी आपण शिकतो ते चांगल्या एकांकिका पाहून.. कलाकाराने कला सादर करावी तसेच इतरांची कला पाहावी…

या एकांकिकेची ओळख करु घेतल्यावर तुम्हाला काय वाटलं हे नक्की कळवा. पुढच्या वेळेस जाणून घेऊया “मडवॉक” या एकांकिकेबद्दल.

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01