Articles

आम्ही खरे इतिर्‍हासकार बॉ…

आज नव-इतिहासकारांची बैठक होती. सुर्य डोक्यावर आला होता. तरी पावसाळी दुपार असल्यामुळे सुर्याचा ताप तसा कमीच होता. पण आयोजकांच्या डोक्याला मात्र ताप लागून राहिला होता. काल रात्रीच्या आगमन बैठकीत सुगंधी सोनेरी जल प्राशन केल्यामुळे आज जाग जरा उशीराच येणार होती. म्हणूनच आयोजकांनी मुद्दामून मुख्य बैठक दुपारी भोजनानंतर आयोजित केली होती. अधून मधून अशा बैठकी होत राहतात आणि नव नवे शोध लागत राहतात. हे शोध लावण्यासाठी तुम्हला फारसे कष्ट घ्यायचे गरज नाही, तुम्हाला गड किल्ल्यांवर जायची गरज नाही, तुम्हाला ऐतिसाहिक संदर्भ तपासायची सुद्धा गरज नाही. केवळ सुगंधी सोनेरी जल प्राशन केले की तुमच्यामध्ये आपोआप इतिहास लिहिण्याची क्षमता येते. सुगंधी सोनेरी जल प्रशनानंतरच्या समाधी अवस्थेत तुम्हाला जे जे काही सुचेल ते ते सर्व इतिहास मानण्याचा एक प्रघात आहे. कुणी याचे संदर्भ किंवा तर्क तुम्हाला विचारले तर तुम्ही अमुक तमुक कादंबरी किंवा एखाद्या चित्रपटाचा संदर्भ सहज देऊ शकता.

बरे, नवइतिहासकार होण्यासाठी शिक्षणाचीही तशी काही अट नाही आणि अट केवळ एकच; तुम्हाला जातीजातींमध्ये भेद निर्माण करता आला पाहिजे आणि जनमानसात कशी सतत अस्वस्थता पसरत राहिल याकडे कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे. इतके सगळे गुण नव-इतिहासकार होण्यासाठी तुमच्या अंगी असणे आवश्यक आहे. सोसल मीडियाच्या या युगात कुणालाही इतिहासकार होण्याची मुभा असते. जसे आजकाल सगळेच डिजिटल झाले आहे, तसे इतिहासकार सुद्धा डिजिटल झाले आहे. फेसबुकवर पोस्टी पडाव्यात इतक्या जलदगतीने इतिहास लिहिला जात आहे. अर्थात ही आनंदाची बाब आहे. हे नव इतिहासाचे युग म्हणजे भारताच्या इतिहासातले ७ वे सोनेरी पानच जणू.

आणि तो क्षण येऊन ठेपला. माननीय नव-इतिहासकार जागे झाले. ते तिघे… सभामंडपात अवतरले. तिघांचेही डोळे लालेबुंद झाले होते. शेजवॉन सॉसचा रक्तिमा जणू डोळ्यांत उतरला होता. तिघातल्या सर्वात ज्येष्ठ इतिहासकाराने आपल्या दातात अडकलेला तंदुरीचा कण काढत सभेला सुरुवात केली. ते उद्गारले “मंडळी… आपण इथे इतिहास निश्चित करण्यासाठी आलो आहोत. (जांभई देत) जुनाट इतिहास खोडून आपल्याला नव्या इतिहासाची मांडणी करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला पंचतंत्राचा वापर करावा लागणार आहे. पहिले तंत्र म्हणजे जाती द्वेष, दुसरे तंत्र म्हणजे धर्म द्वेष, तिसरे तत्व म्हणजे आपले पूर्वज मुर्ख होते असे गृहित धरणे, चौथे तंत्र म्हणजे फेकाफेकी आणि पाचवे आणि शेवटचे तंत्र म्हणजे आपल्यासारखे हुश्शार आपणच… या पाच तंत्राचा अवलंब जर तुम्ही केला तर ब्रह्मदेवाचा बाप सुद्धा तुम्हाला इतिहासकार होण्यापासून रोखू शकणार नाही.”

दुसर्‍या इतिहासकाराने निर्विकार चेहर्‍याने ज्येष्ठ इतिहासकाराकडे पाहिले आणि तो म्हणाला, “महोदय, आपण जे बोलत आहात ते गुण आमच्यात ठायी ठायी भरलेले आहेत. तर आपण आता वेळ न दडवता लवकारत लवकर इतिहास लिहून घेऊ. काय आहे की छान पाऊस येतोय, संध्याकाळी लोणावळ्याकडे कुच करण्याचा बेत आहे आणि तेथे जाऊन धबधब्याखाली मनसोक्त आनंद लुटायचा आहे. कदाचित तेथूनच एखाद्या इतिहासाची प्रेरणा मिळेल आणि अचानक आम्हाला इतिहास सुचू शकतो.

तिसर्‍या व सर्वात कनिष्ठ इतिहासकाराने यांस संमती दर्शवली. ज्येष्ठ इतिहासकारांनी या गोष्टीस अनुमोदन देत म्हणले की आमचाही संध्याकळचा बेत आहे. पण आम्ही आनंद घेण्यासाठी जात नसून आनंद देण्यासाठी जाणार आहोत. (दोघांच्या चेहर्‍यावरील विचित्र हावभाव पाहत) गैरसमज नसावा, संध्याकाळी आमचे रावण एक महामानव या विषयावर प्रदीर्घ व्याख्यान आहे आणि या व्याख्यानातून आम्ही श्रोत्यांना आनंदच तर देत असतो. (दोघांनी सुटकेचा निःश्वास घेतला.)

त्यानंतर ज्याप्रमाणे ऋषींना रुचा स्मरायच्या त्याप्रमाणे ज्येष्ठ इतिहासकारांना व त्यांच्या सहकार्‍यांना इतिहास स्मरु लागला.
“राम काल्पनिक होता”
“रावण महात्मा होता”
“तुकारामांना ब्राह्मणांनी मारले.”
“रामदास आणि शिवाजी महाराजांचा संबंध नव्हता. ते रामदास हे मुघलांचे हेर होते.”.
अशा ऐतिहासिक तथ्यांनी जणू इतिहासात मोलाची भर पडली. हा इतिहास जरी शासकीय स्तरावर शिकवला जाणार नसला तरी लोकांमध्ये भांडणे लावणे, तरुणांची माथी भडकवणे अशा सत्कार्यासाठी याचा उपयोग होणार होता.
हा इतिहास ऐकून आयोजकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले, समाजात फुट पाडण्याच्या कार्यात आपलाही खारीचा वाटा आहे याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर रेंगाळत होता. ऐतिहासिक तथ्ये मांडून झाल्यानंतर तिघांचेही ग्लास एकमेकांना खणाणले…

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्रीअसे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01