Reviews - Film, Books, Plays

भिती म्हणजे दि ओमेन


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01

मागे मी बाबाडूक या चित्रपटाबद्दल लिहिलं होतं. घाबरवण्यासाठी विदृप चेहरे आणि दचकवणार्‍या संगीताची आवश्यकता असतेच असे नाही. बाबाडूक या चित्रपटात तरी बर्‍यापैकी भूताचं अस्तित्व दाखवण्यात आलं आहे. पण दि ओमन असा चित्रपट आहे ज्यात भूत किंवा शैतान नाही. पण तरीही सबंध चित्रपटात शैतानाचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. या चित्रपटात एकही विदृप चेहरे नाही, वेडे वाकडे चालणारी भूतं नाहीत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत केवळ माणसेच माणसे आहेत. पण तरीही तुम्हाला भिती वाटते. याच कारण जबरदस्त कथा आणि विलक्षण पटकथा. जोडीला उत्कृष्ट संगीत, सिनेमॅटोग्राफी, दिग्दर्शन आणि उत्तम अभिनयाची साथ आहे.

भूताचं आणि देवाचं अस्तित्व आहे की नाही याविषयी जनमानसाच्या मनात संभ्रम आहे. पण अनेक लोकांना भूताचा अनुभव आला आहे आणि देवाचा सुद्धा अनुभव आलेला आहे. पण ज्यांना अनुभव आलेला नाही तेही या गोष्टींवर विश्वास ठेवतात. म्हणजे आपण लहानपणापासून देवळात जातो, त्या दगडाच्या मूर्तीसमोर हात जोडतो. कारण आपल्या पालकांनी आपल्याला तसं करायला सांगितलेलं असतं. तसंच भूतांचंही आहे. अनेक पालक आपल्या मुलांना भूतांविषयी सावध करतात. चिंचेच्या झाडाखाली रात्री जाऊ नकोस, भर दुपारी शेतात हिंडू नकोस अशा गोष्टी आपण लहानपणी ऐकल्या असतील. दि ओमेन हा चित्रपट बायबलमधील मान्यतांवर आधारित आहे. होली पॉवर आणि इविल पॉवर अशी ही मान्यता आहे. जवळ जवळ सर्वच धर्मग्रंथांनी देवासह शैतानाचे अस्तित्व स्वीकारले आहे.

दि ओमेन या चित्रपटाची कथा डॅमियन या मुलाच्या जन्माने सुरु होतो. अमेरिकन राजनयिक रॉबर्ट थॉर्नची बायको कॅथरिन इस्पितळात एका मुलाला जन्म देते. पण त्यांचा मुलगा जन्मताच मरतो असे रॉबर्टला सांगितले जाते. फादर स्पिलेटो रॉबर्टला सांगतो की त्याला मुलगा मेला आहे, पण याच इस्पितळात एका दुसर्‍या बाईने एका मुला जन्म दिलाय आणि ती बाई मुलाला जन्म देऊन देवा घरी गेली. फादर रॉबर्टला या अनाथ मुलाला दत्तक देण्यास सांगतो. आपला मुलगा जन्मताच मेला, हे जर आपल्या बायकोला कळलं तर ती खुप दुःखी होईल. कदाचित यातून ती स्वतःला सावरु शकणार नाही. म्हणून रॉबर्ट त्या मुलाला दत्त घेतो व आपल्या बायकोपासून ही गोष्ट लपवून ठेवतो. त्या मुलाचं नाव डॅमियन असं ठेवण्यात येतं. रॉबर्ट थॉर्न हा श्रीमंत माणूस. डॅमियन हा अनाथ मुलगा श्रीमंतीत वाढतोय. त्याची देखरेख करायला एक आया आहे. सगळं काही चांगलं होत असताना डॅमियनच्या पाचव्या वाढदिवसाला त्याची आया सर्वांसमोर गळफास लावून घेते. हे दृश्य पाहून डॅमियनचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जमलेले लोक व मुलं प्रचंड घाबरतात. डॅमियन सुद्धा घाबरतो. आया मेल्यानंतर अकस्मात एक बाई येते, जी आता डॅमियनची नवीन आया आहे. तिचं नाव मिसेस बेलॉक.

डॅमियनच्या आयाने आत्महत्या केल्यानंतर कॅथरिनला आपल्या मुलाची काळजी वाटू लागते. रॉबर्टलाही यात काहीतरी विचित्रपणा वाटतो. पण नेमकं काय हे कुणालाच कळत नाही. एके दिवशी थॉर्न डॅमियनचे आई-बाबा त्याला चर्चमध्ये घेऊन जातात, पण चर्चमध्ये जाण्याआधी, चर्चच्या दरवाज्यापाशी गाडीमध्ये पाच वर्षांचा डॅमियन अतिशय आक्रमक होतो. त्याची ही अवस्था पाहून रॉबर्ट गाडी वळवायला सांगतो. एकदा झूमध्ये गेले असता तेथील प्राणी डॅमियनला पाहून घाबरतात, माकडं तर बिथरतात. कॅथरिनला कळत नाही की नेमकं काय झालं. डॅमियनमध्ये असं काहीतरी आहे याची चुणूक तिला लागते. पण पाच वर्षांचं ते निरागस गोड पोर…

कॅथलिक प्रिस्ट फादर ब्रेनान रॉबर्टला डॅमियनच्या रहस्यमय अस्तित्वाबद्दल सावध करतो आणि सांगतो की डॅमियन हा मनुष्य प्राणी नाही. सुरुवातीला रॉबर्ट त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. पण फादर ब्रेनान त्याला सांगतो की तुझी बायको पोटूशी आहे आणि डॅमियन या मुलाचा जन्म होऊ देणार नाही. पण फादरच्या बोलण्यावर त्याचा पूर्णपणे विश्वास बसत नाही. रॉबर्टला सत्य सांगितल्यानंतर अचानक आलेल्या वादळामुळे चर्चच्या छतावरील वीजेचा खाली पडतो आणि फादरच्या पोटात घुसतो. फादर मेल्यामुळे रॉबर्टला फादरच्या बोलण्यात तथ्य आहे असं जाणवतं. कॅथरिन रॉबर्टला सांगते की ती प्रेग्नेंट आहे आणि तिला हे मूल नकोय. आता रॉबर्टला फादर जे बोलला होता, ते अगदी खरंय असं वाटू लागतं. फोटोग्राफर केथ रॉबर्टला गाठतो आणि सांगतो की डॅमियलची आया आणि फादर मरण्यापूर्वी त्यांच्या फोटोमध्ये एकप्रकारची सावली दिसत आहे. केथ म्हणतो की त्यालाही डॅमियनबद्दल शंसय आहे. मग केथ आणि रॉबर्ट डॅमियनच्या जन्माचं रहस्य सोडवण्याचा प्रयत्न करतात. ते रहस्य काय आहे, हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट तुम्हाला पाहायलाच हवा.

सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतो. थिएटरमध्ये तुम्ही खस चित्रपट पाहायलाच जाता म्हणून तुमचे लक्ष विचलित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण हा १९७६ चा चित्रपट असल्यामुळे तो तुम्हाला घरीच पाहावा लागणार आहे. तरीही तुम्ही तुमची कामे विसरता व आजूबाजूला घडणार्‍या गोष्टींकडे तुमची नजरही जात नाही. इतका हा चित्रपट तुम्हाला खिळवून ठेवतो. यातील काही दृश्ये आणि संगीत भिती निर्माण करतात. मॅडियनची आया आनंदाने स्वतःला लटकवून घेते, कॅथरिनचा अपघात आणि अपघातात काचेमुळे केथचं मुंडकं उडतं, स्मशानात काळ्या कुत्रांचा हल्ला ही दृश्ये भयानक आहेत. ती इतक्या सुंदर पद्धतीने चित्रीत केली आहे. यासाठी दिग्दर्शक रिचर्ड डोनर आणि सिनेमॅटोग्राफर गिल्बर्ट टेलर यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे.

रॉबर्ट आणि केथ स्माशानात कबरी उखडून पाहत असतानाचे शॉट्स तर कमाल आहेत. प्रत्येक शॉटमध्ये, प्रत्येक फ्रेममध्ये एक थ्रिल आहे, धास्ती आहे. ग्रेगरी पेक या अभिनेत्याने अफलातून अभिनय केला आहे. रॉबर्टच्या भूमिकेत तो चांगलाच शोभून दिसलाय. ली रेमिक ही जितकी सुंदर दिसते तितका सुंदर अभिनय सुद्धा केला आहे आणि विशेष स्तुती करायची तर ती म्हणजे मेसेस बेलॉकची भूमिका निभावणार्‍या बिल्ली व्हाईटलॉक या अभिनेत्रीची. तिने अतिशय कंट्रोल्ड अभिनय केला आहे. त्यामुळे सुरुवातीला तिचा आक्रमकपणा तिच्या नजरेतून जाणवतो व शेवटी तिच्या अविर्भावातून… मला जास्त कौतुक करावेसे वाटते ते दिग्दर्शकाचे. कारण पाच सहा वर्षाच्या मुलाकडून हवा तसा अभिनय करवून घेणे हे काही सोपे काम नाही. मुलं कितीही चुणचुणीत असले तरी लहान मुलांकडून काम काढून घेणं जवळ जवळ अशक्य होऊन बसतं. म्हणून कधी कधी मुलं देतील त्या शॉट्सवर समाधान मानावं लागतं. पण दिग्दर्शकाने डॅमियनची भूमिका करणार्‍या हार्वे स्टेफसन या लहान मुलाकडून चांगले काम करवून घेतले आहे. लहान मोठ्या भूमिकेत असणार्‍या सर्वच कलाकारांनी आपलं काम चोख केलं आहे आणि लेखकाला कसं विसरुन चालेल? डेव्हिड सेल्ट्झर या लेखकाने भन्नाट सीन्स लिहिले आहेत. त्याला प्रणाम करायलाच हवा. या चित्रपटाचे अजून दोन भाग सुद्धा आहेत. डॅमियन: ओमेन २ आणि दि फायनल कन्फ्लिक्ट.

मी तर असं म्हणेन की हॉरर चित्रपटांच्या चाहत्यांनी हा चित्रपट अवश्य पाहायला हवा. थ्रिल, सस्पेन्स आणि भिती बस्स… मनोरंजन म्हणजे केवळ हसवणं नव्हे याचा प्रत्यय दि ओमेन पाहिल्यावर येतो.

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01