Reviews - Film, Books, Plays

दि बाबाडूक; एक वास्तविक भयपट


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01

भयपट म्हटला की स्पेशल इफेक्ट्स, दचकवणारं म्यूजिक, भूतांचे विद्रूप चेहरे या सर्व गोष्टी सामान्य आहेत. पण या सर्वांच्या पलीकडे केवळ कथानक आणि विशिष्ट प्रसंग याद्वारे घाबरवण्याचा पयत्न करणारा चित्रपट म्हणजे बाबाडूक. २०१४ साली प्रदर्शित झालेला ऑस्ट्रेलियन सिनेमा. जेनिफर केंट या अभिनेत्रीचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट. प्रदर्शित झाल्यावर सुरुवातीस बाबाडूकला प्रेक्षकांचा चांगला प्रदिसाद मिळाला नाही. पण 2014 Sundance Film Festival मध्ये त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर या चित्रपटाला यश लाभले. समीक्षकांनीही वाहवा केली. व्यावसायिकदृष्ट्याही चांगली कमाई झाली.

अमेलियाचा नवरा एका कार अपघातात दगावतो. आता अमेलिया आणि तिचा मुलगा सॅम हे जगण्यासाठी धडपड करत असतात. नवर्‍याच्या मृत्यूमुळे तिला बरंच काही सोसावं लागलं. अमेलिया एक त्रस्त प्रौढ तरुणी आहे. लहान मुलांचे काही काल्पनिक पात्र असतात. मुलं त्या वयात त्या पत्रांना खरे मानतात. सॅम एक अकाल्पनिक शैतानाला खरे मानतो. त्या शैतानाला मारण्यासाठी त्याने काही शस्त्रही बनवले आहे. एका रात्री सॅम त्याच्या आईला पॉप-अप स्टोरी बुक वाचायला सांगतो. मिस्टर बाबाडूक या शैतानाच्या कथेचं हे पुस्तक. या पुस्तकानुसार बाबाडूकच्या अस्तित्वाची जाणीव झाल्यावर तो लोकांना त्रास द्यायला सुरु करतो. सॅमचा विश्वास बसतो की बाबाडूक खरोखर आहे. अमेलिया त्याला सांगत असते की या सर्व खोट्या गोष्टी आहेत. पण ती स्वतःही पुस्तक पाहिल्यानंतर धास्तावलेली आहे. सॅम बाबाडूकचं अस्तित्व अनुभवू लागतो. त्याच्यावर परिणाम होऊ नये म्हणून अमेलिया रात्रभर जागी राहते. पण बाबाडूक त्यांच्या घरात शिरकाव करतोच. पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल.

या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे लोकांना घाबरवण्यासाठी विद्रूप चेहरे किंवा दचकवणार्‍या बॅंगचा उपयोग केलेला नाही. सुरुवातीपासून काही विशिष्ट सीन्सद्वारे भिती निर्माण करण्यात आली आहे. खेळताना सॅमचं लोखंडाच्या दांडीवर सरळ उभं राहणं, आमेलियाला आलेल्या बाबाडूकच्या फोन कॉलची तक्रार करायला जेव्हा ती पोलिस स्टेशनमध्ये जाते तेव्हा पोलिसाच्या मागे तिला बाबाडूकचे कपडे दिसतात किंवा टिव्हीमध्ये दिसणारे भयचित्रे आणि गाडी सुरु असताना एका ठिकाणी पाहून सॅम बाबाडूकला जायला सांगतो, अशा प्रसंगांनी भिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. बाबाडूक अमेलियावर जेव्हा हावी होतो तेव्हा ती त्यांच्या पाळीव कुत्र्याची मान मुरगळते, हा प्रसंग जास्त भेदक आहे.

चित्रपटात अमेलियाचं भावविश्वही दाखवण्यात आलम आहे. टिव्हीवर चुंबन दृश्ये पाहिल्यावर एका एकलकोंड्या तरुणीची होणारी घुसमट इस्थर डेव्हिस या अभिनेत्रीने चांगली दाखवली आहे. कितीतरी वर्ष आपल्याला पुरुषाचा स्पर्श झालेला नाही हे भाव दिग्दर्शकानेही चांगले टिपलेत. चित्रपट पाहिल्यावर मला रात या रामगोपाल वर्मांच्या चित्रपटाची आठवण झाली. दोन्ही चित्रपटांचा प्लॉट वेगळा आहे. तरी घाबरवण्यासाठी जे प्रसंग निर्माण केलेत ते सुंदर आहेत. माझ्या मते बाबाडूकपेक्षा रामूदादांचा रात उजवा आहे. पण बाबाडूकमध्ये फापटपसारा करण्यापेक्षा जेनिफर केंट कथेवर अडून राहिली आहे. ती कुठेही भरकटली नाही. वडील नसलेल्या मुलाची भूमिका नौह वाईजमॅन (उच्चार कसा करायचा हे तुम्हीच बघून घ्या) या मुलाने उत्तम निभावली आहे. विशेषतः जेव्हा त्याला कारमध्ये आकडी येते तो प्रसंग छानच रंगवलाय. सॅमची चुलती रिबी जेव्हा सॅमला त्याचे बाबा नसल्यामुळे त्याला चिडवते तेव्हा तो तिला थोड्याश्या उंचावरुन ढकलतो. असे काही छोटे छोटे प्रसंग चित्रपटाची कथा रेंगाळत न ठेवता पुढे ढकलते. आई आणि मुलाचे भावविश्व तर जबरदस्त म्हणावे असेच रंगवण्यात आले आहे. दोघांचं भांडण करणं, एकमेकांना सांभाळून घेणं, जेव्हा अमेलियावर बाबाडूक हावी होतो तेव्हा सॅम त्याने बनवलेल्या शस्त्राने आईला मारतो. त्याला माहिती आहे की शरीर आपल्या आईचं आहे, पण तिच्या मनावर बाबाडूकने ताबा मिळवलाय. ती मुर्छित होऊन पडते आणि पुन्हा तिच्यातला बाबाडूक आक्रमक होऊ पाहतो, तेव्हा सॅम आईच्या गालावरुन हात फिरवतो, या प्रसंगात सॅमची आईविषयीची कळकळ जाणवते.

बाबाडूकचं कॅमेरा वर्क खुपच सहजगत्या करण्यात आलं आहे. उगाच ऑड ऍंगल्स लावण्याचे प्रयत्न नाही केलेत. बॅकग्राऊंड म्यूजिक हवे तेवढेच वापरण्यात आले आहे. इतर भयपटांप्रमाणे कानाचे पडते फाटत नाहीत हे महत्वाचे. दोन प्रमुख पात्र आणि इतर अगदी छोट्या छोट्या भूमिका. पण सपोर्टिंग ऍक्टर्स म्हणजे काय याचे हे उत्तम उदाहरण आहे. एक महत्वाचे उदाहरण म्हणजे ड्राईव्ह करताना जेव्हा गाडी आऊट ऑफ कंट्रोल जाते. तेव्हा दुसर्‍या गाडीतला एक माणूस उतरतो व अमेलियाला ओरडतो. हा एवढूसा प्रसंग आहे, पण त्या अभिनेत्याने उत्तम निभावला. तसेच पोलिस स्टेशनमध्ये जेव्हा अमेलिया जाते व अमेलियाला बाबाडूकचे कपडे दिसतात. तेव्हा मुख्य ऑफिसर आणि इतर दोन पोलिस यांचे लूक जेनिफरने भन्नाट टिपलेत. एडिटिंग सुंदर आहे. म्हणून चित्रपट लांबकचक झालेला नाही.

बाबाडूक हा सर्वोत्कृष्ट भयपट आहे असे मुळीच नव्हे. पण तो एकदा पहावा असा नक्कीच आहे. विशेषतः जे शॉर्ट्सफिल्म म्हणून भयपट बनवतात किंवा पहिल्यांदाच भयपट बनवू पाहतात अशा लोकांनी तर हा चित्रपट पाहायलाच हवा. कारण आपण हॉलिवूडची नक्कल करत असतो. म्हणून आपल्या भयपटांमध्ये अक्षरशः हॉलिवूडचे स्क्रीनप्ले लिहिले जातात. हे स्क्रीनप्ले पाहून आपल्याला वैताग आलेला असतो. कारण हे दृश्य जवळ जवळ प्रत्येक भयपटात दाखवले जातात. अगदी पाश्चात्य चित्रपटांताही रिपिटेशन्स सन्मानाने पाळले जातात. ते बाबाडूकमध्ये दिसत नाही. भयपटातील एक प्रयोग म्हणून जेनिफर केंटचा हा प्रयत्न यशस्वी ठरलाय. आता जेनिफरचा दि नाइटेंगल नावाचा रोमांचक चित्रपट येतोय. या येऊ घातलेल्या चित्रपटालाही ती उत्तम न्याय देईल आणि पारंपारिक स्क्रीनप्लेला चिकटून राहण्यापेक्षा नवं काहीतरी पाहायला मिळेल हे नक्की. तुर्तास तुम्ही बाबाडूक एकदा नक्की पाहा.

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01