Crispy

शी १२ तास महाचर्चा: तैमूरने अंथरुण का ओलं केलं?

अप्रसन्न रोषी: नमस्कार मी अप्रसन्न रोषी शी १२ तासमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आताच आलेल्या बातमीनुसार एक अतिशय धक्कादायक बाब समोर आली आहे. सबंध जगाचंच नव्हे तर ब्रह्मांडाचं लक्ष वेधून घेणार्‍या अद्वितीय बालकाने, साक्षात ईश्वरीय कण ज्या बालकात आहेत, त्या तैमूरने आपल्या राहत्या घरातलं अंथरुण ओलं केलं आहे. ही अतिशय धक्कादायक बाब आहे, क्लेशदायक आहे आणि आश्चर्यकारक सुद्धा आहे. तैमूरने अंथरुण ओलं करण्यामागचं कारण काय आहे? नेमकं असं काय घडलं की साक्षात तैमूरला अंथरुण ओलं करावं लागलं? या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत, डावे अंथरुण ओले करा संघटनेचे शंभर खडूस, ज्येष्ठ पत्रकार अखिल बगळे, सर्वगुणसंपन्न व सर्वविषय पारंगत डॉ. विषभर फादरी आणि उजवे अंथरुण ओले करु नका संघटनेचे टनाटन पाठवले.
तर आपला आजचा विषय असा की तैमूरने अंथरुण का ओलं केलं? मला पहिल्यांचा अखिल बगळेंना प्रश्न विचारायचा आहे, पण तो मी टाळणार आहे. कारण बगळे एकदा बोलायला लागले की कार्यक्रम कधी संपेल सांगता येणार नाही. म्हणून मी आता जातोय डॉ. विषभर फादरी यांच्याकडे. फादरी, फादरी बोला. तुम्हाला काय वाटतं? अंथरुण ओलं करताना तैमूरच्या मनात नेमके कोणते भाव होते?

डॉ. विषभर फादरी: अंथरुण ओलं करणं ही नैसर्गित मानसिकता आहे. जसे समलिंगी संबंध नैसर्गिक आहे तसे अंथरुण ओले करणे सुद्धा नैसर्गिक आहे.

टनाटन पाठवले: माझा यावर आक्षेप आहे. समलैंगिक संबंध आणि अंथरुण ओले करणे हे दोन वेगळे विषय आहेत.

डॉ. विषभर फादरी: अहो, टनाटन मला बोलू तरी द्या. माझं म्हणणं मला मांडू द्या. मला केवळ एवढेच म्हणायचे आहे की जसे कावळा आणि चिमणी नैसर्गिक आहेत तसे अंधरुण ओले करणे हे सुद्धा नैसर्गिक आहे.

टनाटन पाठवले: आता कावळा, चिमणी कुठून आले? फादरी विषय भरकटवत आहेत.

अप्रसन्न रोषी: फादरी फादरी, कावळा चिमण्यांची गोष्ट सांगण्याची ही वेळ नाही. ती तुम्ही फेसबुकवर सांगतच असता. आता इथे आपल्याला केवळ महाबालक तैमूरबद्दल आणि त्याच्या सूबद्दल विचार करायचा आहे. तर आता मी जातोय टनाटन पाठवले यांच्याकडे. बोला पाठवले तुम्हाला काय वाटतं?

टनाटन पाठवले: तैमूरने ज्या अंथरुणावर सू केली त्या अंथरुणामध्ये काही अनिष्ट शक्तींचा वास होता असे आम्हाला वाटते.

शंभर खडूस: म्हणजे? पाठवले, तुम्हाला काय म्हणायचं काय आहे पाठवले? पाठवले ओ पाठवले? ज्या अंथरुणाबद्दल तुम्ही बोलत आहात, ते अंथरुण मुख्य निवासींनी बनवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की हे कारस्थान मुख्य निवासींचं आहे? तुम्हाला नेमकं म्हणायचं तरी काय आहे?

टनाटन पाठवले: आम्हाला फक्त इतकंच म्हणायचंय की त्या अंथरुणात अनिष्ट शक्तींचा वास आहे.

शंभर खडूस: पाठवले ओ पाठवले? मला तर तुमच्या अंगातून वास येतोय.

टनाटन पाठवले: अहो वास म्हणजे दुर्गंध नाही ओ. वास म्हणजे असणे, राहणे या अर्थी म्हटले.

शंभर खडूस: तुम्ही कोणत्याही अर्थी म्हणा, पाठवले ओ पाठवले. मला तरी असं वाटतंय की जे व्हिक्टिम आहेत. त्या मुख्य निवासींनाच तुम्ही दोषी ठरवत आहात.

अप्रसन्न रोषी: मला वाटतं चर्चा कुठेतरी भरकटतेय… मी माझं सर्व धाडस एकवटून अखिल बगळे यांना बोलण्याची संधी देतोय. बोला, अखिल बगळे बोला. सबंध महाराष्ट्र कानावर बोट ठेवून तुमचं बोलणं ऐकण्यास उत्सुक आहे. बोला.

अखिल बगळे: खी खाय खोखखो.

अप्रसन्न रोषी: नाही, कोड लॅंग्वेजमध्ये नको, तुमच्या स्वतःच्या लॅंग्वेजमध्ये बोला.

शंभर खडूस: बोलो बोलो, टेल टेल…

अखिल बगळे: खी खाय खोखखो…

अप्रसन्न रोषी: बगळे… बगळे… मला वाटतं. बगळेंचा आवाज बसलाय. एखाद्या म्हावर्‍याचा काटा रुतला असावा बगळ्यांच्या घशात. ही ऐतिहासिकच घटना म्हणावी लागेल. बगळेंना बोलण्याची संधी मिळाली आणि बगळे काही बोललेच नाही. आता मी पुन्हा शंभर खडूस यांच्याकडे जातोय. खडूस मला सांगा. हा सगळा काय प्रकार आहे.

शंभर खडूस: अतिशय निंदनीय प्रकार आहे हा. तनुवादी लोकांचं कारस्थान आहे. तनुवादी लोकांना अख्खं जग तनुवादी करायचंय.

अप्रसन्न रोषी: पण याचा तैमूरच्या सूशी काय संबंध?

शंभर खडूस: अप्रसन्न… अप्रसन्न मी येणार आहे तिथे. अप्रसन्न… मघाशी पाठवले म्हणाले की त्या अंथरुणात अनिष्ट शक्तींचा वास आहे आणि ते अंथरुण जे आहे ते मुख्य निवासींनी बनवलंय. याचा अर्थ ती अनिष्ट शक्ती तनुवादी लोकांनी त्या अंथरुणात घुसवली असणार आणि म्हणूनच तैमूरने अंथरुण ओलं केलेलं आहे, जेणेकरुन जे व्हिक्टिम आहेत, ते मुख्य निवासीच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे राहतील हा त्यांचा डाव आहे.

टनाटन पाठवले: आम्हाला वाटते आमचे मित्र खडूस, हे बगळेंची भूमिका निभावत आहेत.

शंभर खडूस: पाठवले ओ पाठवले… मी तुमचा मित्र नाही. या दाढीची शपथ घेऊन सांगतोय, मी तनुवाद्यांना जवळ करत नाही. माझ्या प्रश्नाचं होय किंवा नाही एवढंच उत्तर द्या. या अनिष्ट शक्ती तुम्ही आंथरुणात केव्हा घुसवल्या?

टनाटन पाठवले: तुम्ही नक्की कोणत्या शाळेत शिकलाय? या प्रश्नाचं उत्तर होय किंवा नाही असं कसं देणार?

शंभर खडूस: ते मला माहित नाही, तुम्हाला होय किंवा नाही म्हणावं लागेलच.

अप्रसन्न रोषी: तुम्ही दोघेही थांबा. फालतुगिरी करु नका. आता आपल्याकडे फक्त दोन मिनिटे राहिली आहेत. मी सर्वात शेवटी डॉ. विषभर फादरींकडे जातोय. ही सर्व चर्चा तुम्ही शांतपणे ऐकत होता. तुंहाला काय वाटतंय?

डॉ. विषभर फादरी: चर्चा अनैसर्गिक होती. पण राहूल गांधींचं जानवे घालणे जितकं नैसर्गिक आहे, तितकंच अंथरुण ओलं करणं नैसर्गिक आहे.

अप्रसन्न रोषी: फादरी, कुठचा विषय कुठे नेताय? तुम्ही फेबुकवरच पोस्ट पोस्ट ब्लॉक ब्लॉक खेळत रहा. इथे पुन्हा येऊ नका. तर प्रेक्षकांनो, ही चर्चा ऐकून मी असा निष्कर्ष काढतोय की तैमुरचं अंथरुण ओलं करणं ही काही साधीसुधी बाब नाही. ही एक असाधारण बाब आहे. पोलिस यंत्रणा याचा तपास करतीलच. आपण सर्वांनीच पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे. लवकरच याचा छडा लागणार आहे. आता आपण रजा घेऊया, उद्या पुन्हा भेटूया. शी १२ तास, महाचर्चामध्ये, असाच एक गहन आणि देशहिताचा गंभीर विषय घेऊन. तोपर्यंत मीटा डोळे, झोपा नीट…

लेखक: दिल्लीचा भाट जयेश

तळटीप: वाचकहो, तैमूर हे अतिशय गोड गोंडस बाळ आहे. आपल्या सर्वांनाच लहान मुले खुप आवडतात. पण मीडियाने जो भंपकपणा चालवला आहे, त्यावर ही चापट मारली. त्या इवल्याशा गोड बालकाबद्दल कोणतीही तक्रार नाही. त्याने तर अजून जगही पाहिलं नाही. तैमूरच्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा… श्री. सैफ व सौ. करीना यांची मी मनापासून क्षमा मागतो.

 

असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01