Articles

शाहिद आफ्रिदीला शहिद होण्याची भिती…

पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी कोणत्या ना कोणत्या व्यक्तव्यामुळे बर्‍याचदा वादाच्या भोवर्‍यात सापडत असतो. शाहिद आफ्रिदीला काश्मिर विषयी प्रश्न विचारला असताना त्याने ’चार प्रांत पाकिस्तानला सांभाळता येत नसतील तर काश्मिर घेऊन काय करणार?’ असे जळजळीत उत्तर दिले आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे पाकमध्ये खळबळ उडाली आहे. जावेद मियांदादने त्याचे कान चांगलेच पिळले आहेत. क्रिकेटपटूने क्रिकेटकडेच लक्ष द्यावे, निवृत्त झाल्यानंतर आपले दुसरे करियर निवडावे असा सल्ला मियांदाद आफ्रिदीला दिला आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे भारतीयांना मात्र चांगलाच आनंद झाला आहे. कारण कळत नकळत आफ्रिदीच्या मुखातून सत्यच बाहेर पडले आहे. पाकिस्तान हा असा देश आहे जो स्वतःची प्रगती करवून घेण्याऐवजी भारताच्या अधोगतीवर लक्ष केंद्रित करत आहे. १९४७ साली हिंदुंनी त्यांना पाकिस्तान जणू सोन्याच्या तबकात घालून दिला होता. त्यासाठी पाकच्या समर्थकांना कोणताही संघर्ष करावा लागला नाही, त्यांना रस्त्यावर उतरावं लागलं नाही, यासाठी लढाई सुद्धा झालेली नाही. पाक हे एकमेव राष्ट्र आहे जे मागितलं आणि मिळालं. त्यामुळे मागणार्‍यांना आपल्या धार्मिक अस्मितेशिवाय राष्ट्राची अशी कोणतीच किंमत कळत नव्हती आणि त्यांच्या नंतर आलेल्या राजकीय व धार्मिक पिढीलाही ती किंमत कळू शकलेली नाही.

योगी अरविंद असे म्हणालेत की ” हि सृष्टी जेव्हा निर्माण झाली, तेव्हा ही सृष्टी किती चांगली आहे, असा जर कोणाला प्रश्न पडला तर त्याला पटकन पाहता यावं म्हणून देवानं मॉडल निर्माण केलं. ते मॉडल म्हणजे भारत देश आहे”. पृथ्वी किती चांगली आहे, हे जर पाहायचे असेल तर भारत पहा. असं योगी अरविंद यांना वाटतं. भारत इतका सुंदर का होता? कारण इथली जनता धार्मिक होती. परंतु धार्मिक आततायीपणा त्यांच्यात नव्हता. अगदी त्या विरोधात पाकिस्तानची धार्मिकता आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की पाकिस्तानचा जन्म का झाला? पाकिस्तानचा जन्म हा धार्मिक मुद्द्यावर झाला आहे. आम्ही मुसलमान आहोत, आम्हाला वेगळे राष्ट्र हवे आहे. आम्ही तुमच्यासोबत गुण्यागोविंदाने नांदू शकत नाही. कारण आपण सारेच जरी माणसे असलो तरी आम्ही अगदी तुमच्या विरुद्ध आहोत. तुम्ही पूर्व असाल तर आम्ही पश्चिम आहोत. ही भावना पाकिस्तान समर्थकांच्या मनात होती. कॉंग्रेसने जरी हिंदूपण विसरुन हिंदी राष्ट्रवाद स्वीकारल होता तरी सुद्धा १८८८ मध्ये सर सय्यद अहमद यांनी हिंदी राष्ट्रवाद नाकारलेला आहे. भारतात हिंदु आणि मुस्लिम अशी दोन युद्धमान राष्ट्र आहेत, असं ते म्हणाले होते. सर सय्यद अहमद यांनी जणू पाक निर्मितीची अघोषित घोषणाच त्यावेळी केली होती. पण आपल्या पुढार्‍यांना हा धोका दिसला नव्हता असे म्हणता येईल. ते गाफील राहिले आणि भारताचा कितीतरी मोठा भाग भारतापासून वेगळा झाला.

बरं फाळणी सुद्धा शांततेने किंवा सामंजसपणाने झाली नाही. फालणीला मंजूरी देणारे दोन्ही पाकिस्तानी आणि भारतीय पुढारी सपशेल हरले होते. मुस्लिम नसलेल्यांना पाक सोडून भारतात यावं लागलं. माणसं माणसांना कापत होते. रक्ताच्या थोराळ्यात कलेवरं पडली होती. हिच पाकिस्तान निर्मितीची कथा आहे. क्रांतिवीर सिनेमात नाना पाटेकरांचा एक सुंदर प्रसंग आहे. त्यात ते स्वतःच्या आणि समोरच्या हातावर दगड मारतात आणि म्हणतात ये हिंदू का खून और ये मुसलमान का खून. दोघांचंही रक्त लाल आहे. ईश्वराने भेदभाव केलेला नाही असा या प्रसंगाला सुंदर अर्थ आहे. पण पाकची निर्मिती रक्ताच्या नद्या वाहून झालेली आहे. आज भारतात राहणारा मुसलमान आणि पाकिस्तानात राहणारा हिंदू यांची अवस्था आणि संख्या पाहिली की आपल्या लक्षात येईल की पाकिस्तानच्या मनात द्वेष किती खोलपर्यंत रुजला आहे. पाकिस्तानात बिगर मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे साहिद आफ्रिदी जरी खरं बोलला असला तरी या सर्व घटना त्याच्यासाठी अपिरिचित नाहीत. सध्या पाकिस्तानचा राष्ट्र प्रमुख एक क्रिकेटपटू आहे. इम्रान खान ह्यांना नव्या पाकचे स्वप्नं दिसू लागले आहेत. त्यांना जगाला कर्ज वगैरे द्यायची आहेत. पाकिस्तानला त्यांना एक समर्थ राष्ट्र म्हणून घडवायचे आहे. या त्यांच्या कल्पना चांगल्याच म्हणाव्या लागतील. पण मुंगेरीलालला पडलेली हसीन सपने या व्यतिरिक्त त्यांच्या संकल्पनेला फारसे महत्व देता येत नाही. कारण पाकिस्तान हा देश, देश म्हणवून घेण्याच्या लायकीचा राहिलेला नाही. जी स्वप्ने इम्रान खान पाहत आहेत ती पूर्ण करन्यासाठि त्यांना सत्य स्वीकारावं लागेल. जे या जन्मात तरी ते स्वीकारणात नाही आणि त्यावर कृतीही करणार नाही. पाकिस्तान हा देश मोजक्या लोकांच्या धार्मिक आणि राजकीय अस्तित्वासाठी निर्माण झाला व पोसला गेला आहे.

इम्रान खान ह्यांना या धार्मिक अस्मितेला आव्हान द्यावे लागणार आहे. जग इस्लाममय करणे ही जी संकल्पना आहे त्या संकल्पनेतून पाकचा जन्म झालेला आहे. ती संकल्पना इम्रान ह्यांना कधीच पुसता येणार नाही. आज पाक अवस्था बिकट आहे. तेच आफ्रिदीने कळत नकळत म्हणून दाखवले आहे. पाकिस्तानला काश्मिर हवे आहे. पण सत्य हेच आहे की त्यांच्याकडे असलेले चार प्रांत त्यांना सांभाळता येत नाहीत. आतंकवाद, बेरोजगारी अशा अनेक समस्यांनी पाकला पोखरुन टाकले आहे. तरीही पाक भारतावर कुरघोडी करत राहतो. सैनिकी, आतंकी हल्ले करत राहतो. त्यांना जग इस्लाममय करायचं आहे. पण जो प्रांत आपल्याकडे आहे, कोणताही संघर्ष न करता दान म्हणून मिळालेला आहे, त्या प्रांताचा त्यांना विकास करायचा नाही. याचं कारण दान मिळालेल्या वस्तूंची किंमत नसते. तशीच अवस्था आज पाकची झालेली आहे. कितीतरी वर्षांच्या संघर्षा नंतर इस्रायल राष्ट्राची स्थापना झाली. आज ते राष्ट्र अनेकांच्या नाकावर टिच्चून उभे आहे. प्रगती करीत आहे. पण पाकला मात्र काश्मिर हवे आहे, भारतात बॉम्बस्फोट घडवायचे आहेत. इतकेच काय तर त्यांना आपापसात भांडायचे सुद्धा आहे. पण प्रगती आणि विकास करायचा नाही.

शाहिद आफ्रिदीच्या तोंडून जरी सत्य निघालं असलं तरी आता त्याने माघार घेतली आहे. त्याने ट्विट्स करुन आपले स्पष्टीकरण दिले आहे. “My comments are being misconstrued by Indian media! I’m passionate about my country and greatly value the struggles of Kashmiris. Humanity must prevail and they should get their rights.” आणि “My clip is incomplete & out of context as what I said before that is missing. Kashmir is unresolved dispute & under brutal Indian occupation. It must be resolved as per UN resolution. Myself along with every Pakistani support Kashmiri freedom struggle. Kashmir belongs to Pakistan.” असे दोन ट्विट्स त्याने केले आहेत. ते ट्विट्स अतिशय बोलके आहेत. मुळात त्याने स्पष्टीकरण देऊन आपल्या आधीच्या म्हणण्याला दुजोराच दिला आहे. आपल्या तोंडून जरी सत्य निघाले असले तरी ते आपल्यासाठी घातक आहे हे त्याने ओळखले आहे. जर शाहिदने स्पष्टीकरण दिले नसते तर त्याला शहिद व्हावे लागले असते. कारण त्याच्या या वक्तव्यामुळे कट्टरपंथीय व काही राजकारणी नाराज झाले आणि पाकिस्तानचा पुर्वेतिहास पाहता आफ्रिदीच्या आणि त्याच्या घरच्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. याच भितीपोटी त्याने माघार घेतली आहे. जरी त्याने माघार घेतली असली तरी पाकचा फोलपणा लपून राहिलेला नाही. उलट तो आणखीनच उघडा पडला आहे. शाहिद आफ्रिदी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही, तो एक सन्माननीय क्रिकेटपटू आहे. पण त्यालाही खरं बोलण्याची भिती वाटते. आपल्याकडे मात्र कुणीही पंतप्रधानाला सुद्धा बोल लावू शकतात, जाब विचारु शकतात. हाच मूलभूत फरक आहे भारत आणि पाकमधला. हाच मूलभूत फरक आहे मानवी आणि राक्षसी संस्कृतीमधला…

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01