Reviews - Film, Books, Plays

सदरक्षणाय खलनिग्रहणाय


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01

मी माझ्या आयुष्यातले पहिले सुसंगत (सुसंगत म्हणजे त्या आधी जे करत होतो त्यास नाटक म्हणता येणार नाही.) नाटक केले ते वसंत सबनिस लिखित “सौजन्याची ऐशीतैशी”. हे नाटक आम्ही गणेशोत्सवात हौशी रंगभूमी म्हणून सादर केले होते. मी यात अगदी लहान भूमिका केली होती. या नाटकाचे दिग्दर्शक किशोर नार्वेकर यांची ओळख यानिमित्ते झाली. त्यानंतर त्यांच्या नाटकांमध्ये आणि एकांकिकांमध्ये कामे केली. पण एक एकांकिका जी माझ्यासमोर कधीही सादर झाली नाही ती म्हणजे “सदरक्षणाय खलनिग्रहणाय”. माझे मित्र गणेश घाडी आणि प्रशांत पेंढारे ही एकांकिका सादर करणार होते. पण काही कारणास्तव ती एकांकिका सादर झाली नाही.

याआधी ती एकांकिका सादर झाली व आम्ही प्रयत्न करत होतो त्यानंतरही कुणीतरी ती सादर केली व त्यास बक्षिसही मिळाले. मला असं कळलं की नार्वेकर सरांची पहिली एकांकिका. यापासून त्यांच्या नाट्य लेखनाला सुरुवात झाली. ही एकांकिका पोलिसांच्या व्यथेवर भाष्य करणारी आहे. २०१६ ला अशाच विषयाचा “पोलिस लाईन” नावाचा मराठी चित्रपट येऊन गेला. २०१६ लाच राज्यनाट्य स्पर्धेत याच विषयावर माझा मित्र मदन देशमुख लिखित आणि विशाल जाधव दिग्दर्शित “स्टेशन हाऊस” नावाचे नाटकही येऊन गेले.

सदरक्षणाय खलनिग्रहणाय ही एकांकिका दोन हलावदारांची आहे. एक हवालदार जो सिस्टीमच्या विरोधात लढतो तर दुसरी सिश्टिमचाच एक भाग होऊन जातो. दोघांनीही आपल्या पोलिसी कार्कीर्दीची सुरुवात एकत्रच केली. त्यांचं ट्रेनिंगही एकत्रच झालं. सज्जनांच्या रक्षणाची आणि दुर्जनांच्या नियमनाची शपथ त्यांनी घेतली. दोघेही तरुण म्हणून काहीतरी करुन दाखवण्याचा जोश. पुस्तकी जीवनात सगळंच चांगलं वाटतं. पण जेव्हा आपण वास्तविक जीवनात प्रवेश करतो तेव्हा मात्र आपला भ्रमनिरास होतो. भ्रष्टाचार करणे पाप आहे, असे आपल्याला शिकवले तरी प्रत्यक्षात मात्र भ्रष्टाचार दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे असं जाणवू लागतो आणि मग सुरु होतं द्वंद्व. आपल्या सुविचारांचं आणि वास्तवाचं…

याच वास्तवाला हे दोन तरुण हवालदार बळी पडतात. सिस्टीमच्या विरोधात पेटून उठलेला आणि सिस्टीमचा भाग झालेला, दोन्ही हवालदारांना आपला जीव गमवावा लागतो. ही एकांकिका सुरु होते परेडपासून… पण ती परेड करणारे ते दोन हवालदार आधीच मृत्यूमुखी पडले आहेत… शरीर जळल्यानंतरही त्यांच्यातला हवालदार काही नष्ट होत नाही. एकांकिकेतील संवाद काळजाला भिडणारे आहेत. ही मुळात द्विपात्री एकांकिका असली आणि भर्‍यापैकी शाब्दिक असली तरी शब्दबंबाळ मुळीच नाही. त्यात नाट्य आहे. दिग्दर्शक आपल्या कल्पनेप्रमाणे ती एकांकिका अधिक खुलवू शकतो व त्यात अजून काही पात्रांचा समावेशही करु शकतो अशाप्रकारची एकांकिकेची बांधणी आहे. परंतु द्विपात्री म्हणूनही ती सादर केली तरी परिणामकारक ठरेल.

मित्रहो, मी म्हटल्याप्रमाणे एकांकिकांचा परिचय करुन देण्यास मी या लेखापासून सुरुवात केली आहे. किशोर नार्वेकरांच्या एकांकिकेपासून सुरुवात करण्याचे कारण म्हणजे त्यांनी मला स्टेजवर उभं राहायला शिकवलं. म्हणून त्यांच्या एकांकिकेपासून श्रीगणेशा केला. या माहितीपर लिखाणात काही कमतरता आढळतेय का सांगा? म्हणजे पुढच्या वेळेस अधिक सविस्त लिहिता येईल. या लेखांचा उद्देश एकांकिकांबद्दल सामान्य प्रेक्षांत जागृती निर्माण करणे असा आहे. फेसबुकवर लोक केवळ रजनी, खान, कुमार, बच्चन यांच्या चर्चा करण्यात रंगलेले असतात. त्या करु नये असं मुळीच नाही. आपापली रुची निवडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण इतक्या वर्षांपासून एकांकिका नावाची एक चळवळ सुरु आहे. त्याकडे प्रेक्षकांनी लक्ष दिलं पाहिजे. तसेच प्रोत्साहनही दिले पाहिजे. बर्‍याच एकांकिका स्पर्धा निःशुल्क असतात किंवा अगदी १००/- ते १५०/- रुपयात किमान सहा एकांकिका तरी पाहता येतात. प्रेख्षकांना विनम्ती आहे की या एकांकिका स्पर्धांना जरु उपस्थित रहावे.
पुढची एकांकिका “we the people”… ही एकांकिका मला स्वतःला खुप भावली. कारण त्या स्पर्धेत मीही स्पर्धक म्हणून उपस्थित होतो आणि या एकांकिकेने जवळ जवळ सगळीच बक्षिसे जिंकली. पुढच्या लेखात आपण जाणून घेऊया एकांकिका “we the people” बद्दल…

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

ओळख_एकांकिकांची अधिकाधिक_शेअर_करा एकांकिका


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01