Articles

राहूल हाच मोदींना पर्याय…

कौरव-पांडव युद्धाची घोषणा झाल्यानंतर पांडव हस्तिनापूरावर आक्रमण करणार का? असा प्रश्न दुर्योधनाच्या मनात आला होता. त्याने सैन्य सज्ज ठेवले होते. कौरवांनी पांडवांना राज्य देण्यास नकार दिला. त्यामुळे युद्धावर शिक्कामोर्तब झाला होता आणि राज्य कौरवांकडे असल्यामुळे पांडवांकडून युद्धाला सुरुवात होणार होती. पांडव युद्धाची जागा निवडणारे होते. ते हस्तिनापूरावर आक्रमण करु शकतात यामुळे दुर्योधन सैन्यासह सज्ज होता. पण पांडवांनी कुरुक्षेत्र निवडलं. सर्वात महत्वाची बाब म्हणजे कुरुक्षेत्राची अशी जागा निवडली जी सैनिकी तळासाठी योग्य असेल. तिथे वाहत्या पाण्याची व्यवस्था होती, त्यामुळे शौच आणि इतर विधी वगैरेंमुळे आजारपण येण्याची संभावना कमी होती. कौरवांना मात्र अशी जागा उपलब्ध झाली नाही. जी जागा पांडवांनी निवडली नाही ती कुरुक्षेत्रातील जागा कौरंवांनी निवडावी हाच एक पर्याय त्यांच्यासमोर होता. कुरुक्षेत्रावर युद्ध व्हावे ही कृष्णाची इच्छा होती. त्याचे प्रमुख कारण म्हणजे युद्धामुळे सामान्य माणसाला त्रास होऊ नये आणि वाहते पाणी असलेली जागा का निवडली हे आधी सांगितलं आहे.

कुशल राजकारणी तोच असतो जो युद्धाची जागा, रणनिती आणि आपला शत्रू निश्चित करण्याची ताकद स्वतःकडे ठेवतो. श्रीकृष्णाच्या राजकारणात या गोष्टी प्रामुख्याने दिसून येतात. तो शत्रूच्या रणनितीला बळी पडण्यापेक्षा स्वतःची रणनिती स्वतःच आखत होता. मग लोकांनी त्याला रणछोडदास म्हटलं तरी त्याला काही फरक पडत नाही. जरासंधापासून आपल्या प्रजेच्या रक्षणासाठी माघार घेऊन तो आपल्या प्रजेसह नगरी सोडून दुसरीकडे राहायला जातो. त्यावेळेस अनेकांनी त्याला भित्रा, पळपुटा असेही म्हटले असेल. अगदी छी थू झाली असेल. पण यामुळे तो अस्वस्थ होत नाही. तो थांबतो, व्यूहरचना आखतो आणि आपल्या प्रजेच्या अंगाला धक्काही लागणार नाही अशा पद्धतीने भीमाकडून जरासंधाचा वध करवतो. ही कृष्णाची रणनिती आहे, ही कृष्णाची व्यहरचना आहे. ही रणनिती फक्त त्यालाच माहित असते. शत्रूला याचा थांगपत्ताही तो लागू देत नाही. विरोधक काय म्हणतील यापेक्षा आपली प्रजा काय म्हणेल याची दक्षता तो घ्यायचा. शिवाजी महाराजांनी सुद्धा अनेकदा युद्धाची भूमी स्वतः निश्चित केली आहे आणि कोणत्या शत्रूला कोणत्या वेळी अंगावर घ्यायचे हे त्यांनी व्यवस्थित ठरवले होते.

२०१४ पासून भारतीय राजकारण पुष्कळ बदलले आहे. ज्यावेळी नरेंद्र मोदींची एंट्री राष्ट्रीय राजकारणात झाली म्हणजे जेव्हा ते भाजपकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित झाले तेव्हा कॉंग्रेस आणि विरोधकांकडे मोदींवर टिका करण्यासाठी वेगळे मुद्दे नव्हते. कारण गुजरात मॉडेल हा यशस्वी मॉडेल समजला जातो. मोदींच्या काळात गुजरातला अच्छे दिन आले होते हे सर्वांनी पाहिलं होतं. म्हणून २००२ सालची दंगल, मौत का सौदागर हेच विषय विरोधकांकडे होते. पण मतदारांवर त्याचा परिणाम झाला नाही. उलट राहूल गांधी आणि अरविंद केजरीवाल या सोज्वळ चेहर्‍यांना डावलून जनतेने मौता का सौदागराची निवड केली आणि म्हणूनच मी असं म्हणालो की २०१४ पासून भारतीय राजकारण बदललेलं आहे. इथे मोदी नावाचा एक नवा नेता उदयाला आलेला आहे. तो पारंपारिक राजकीय घराणे, उच्चशिक्षित समजले जाणारे घराणे, पांडित्य असलेले घराणे, उद्योजकीय घराणे किंवा शासकीय सेवेत सक्रीय असलेल्या अशा कोणत्याही घराण्यातला तो नाही. तो अशा सर्वसामान्य घराण्यातून आलेला आहे, जिथे २० ते २५ हजाराची नोकरी म्हणजे आयुष्याचं सोनं झालं असं मानलं जातं. त्यामुळे नरेंद्र मोदी इतर सर्व राजकारण्यांपेक्षा वेगळे आहेत. त्यांचे डावपेच सुद्धा वेगळे आहेत. २०१४ च्या निवडणूकीत विरोधकांनी त्यांच्यावर सर्व पातळी सोडून टिका करावी अशीच त्यांची इच्छा होती. ती इच्छा विरोधकांनी पूर्ण केली आहे आणि याचा फायदा नरेंद्र मोदींना झाला. एकीकडे मोदी हे आव्हान अचानकपणे येऊन पडल्यामुळे गोंधळलेले विरोधक आणि दुसरीकडे आपली रणनिती बनवून काम करणारे मोदी असे चित्र २०१४ च्या निवडणूकीत पाहायला मिळाले.

नरेंद्र मोदी जिंकूच शकणार नाही अशी इच्छा राजकीय विश्लेषकांनी बाळगली होती. पण त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. कारण नरेंद्र मोदींच्या विरोधात परंपरागत युवराजपद प्राप्त झालेले राहूल गांधी होते आणि नव्याने उदयाला आलेले अरविंद केजरीवाल होते. पण नरेंद्र मोदींनी राहूल आणि केजरीवाला या दोघांनाही बाजूला ठेवल व कॉंग्रेसवर लक्ष केंद्रित केलं. अच्छे दिन, सबका साथ सबका विकास असा अजेंडा समोर ठेवून कॉंग्रेस मुक्त भारत ही लोक चळवळ राबवली. लोक चळवळ म्हणजे काय? कॉंग्रेस मुक्त भारतचा अर्थ आहे की लोकांनी लोकशाही प्रमाणे कॉंग्रेसचं शासन पाडायचं आहे. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत लोकांनी कॉंग्रेसचं शासन पाडलं आणि भाजपला सत्तारुढ झाली. आता २०१९ ची निवडणूक जवळ येत आहे. २०१४ ला विरोधकांकडे मोदींविरोधात टिका करायला मुद्दे नव्हते. पण सत्ताधार्‍यांविरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी कॉंग्रेसकडे बरेच मुद्दे आहेत. या मुद्द्यांचा विचार आपण दुसर्‍या एखाद्या लेखात करु. २०१४ प्रमाणे राहूल गांधी नरेंद्र मोदींच्या विरोधात उभे ठाकणार आहेत हे आता स्पष्ट झालंय. म्हणजे कॉंग्रेसकडून राहूल गांधी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार आहेत. नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी सगळे विरोधक एकवटले आहेत. एकवटले असं म्हणणं एका अर्थाने चुकीचे ठरेल. सर्व विरोधकांना नरेंद्र मोदींना हरवायचं आहे. पण इथे प्रत्येक जण स्वतःला महाराजा समजणारा आहे. ते महाराजे युवराजांना शरण यायला तयार नाहीत. महाराष्ट्रात शिवसेनेने केव्हाच बंड पुकारलेलं आहे. पण शिवसेना हा स्थानिक पक्ष आहे. त्यामुळे त्यांनाही मर्यादा आहेत. काही वेला शिवसेनेने राहूल गांधी यांची स्तुती केली होती. याचा अर्थ राष्ट्रीय राजकारणात राहूल गांधींना आपला नेता स्वीकारला आहे. शिवसेनेला राहूल आणि मोदी यापैकी एकाची निवड करायलाच हवी. कारण प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय नेता देऊ शकत नाही आणि भाजप वगळता कॉंग्रेस हाच दोन क्रमांकाचा सामर्थ्यशाली राष्ट्रीय पक्ष आहे. कॉंग्रेसने राहूल गांधींना आपला नेता म्हणून घोषित केलेले आहे. अनेक राजकीय समीक्षक आता राहूल सुजाण झाले आहेत, ते पप्पू राहिले नसून पंतप्रधानपदासाठी योग्य आहेत असे सांगत फिरत आहेत. राहूल गांधींचे एखाद दुसरे भाषण ऐकून आणि एखादी मुलाखत पाहून तेव नरेंद्र मोदींसाठी सशक्त पर्याय आहेत असा निष्कर्ष काढला जात आहे.

आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नरेंद्र मोदी विरोधकांच्या रणनितीमध्ये अडकत नाहीत तर ते स्वतःची स्वतंत्र रणनिती आखतात. म्हणजे गुजरात दंगलीबद्द्ल नरेंद्र मोदींवर प्रचंड टिका झाली पण मोदींनी त्यांना उत्तर दिले नाही, ते अस्वस्थ झाले नाहीत. उलट विरोधकांनी केलेल्या टिकेचा त्यांनी चांगलाच फायदा उचलला. आता सुद्धा विरोधक राफेलवरुन मोदींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण नरेंद्र मोदींनी संयम बाळगला आहे. राहूल गांधी तर प्रत्येक भाषणात आणि मुलाखतीत मोदींवर शरसंधान करत आहेत. पण मोदींनी सध्या एक पाऊल मागेच राहायचं ठरवलं आहे. त्याचं कारण लोकांना जाणीव व्हायला हवी की नरेंद्र मोदींच्या विरोधात जर कुणी मोठा नेता असेल तर तो राहूल गांधी आहे. राहूल गांधींच्या नेतृत्वाखाली मोदी विरोधी निवडणूक लढवली जाणार आहे याची खात्री लोकांना पटावी असं मोदींना वाटतं. २०१४ निवडणूकीत कॉंग्रेसच्या पापाचे पाढे मोदींनी वाचले. म्हणून त्यांनी राहूल विरुद्ध मोदी अशी लढत न होऊ देता. कॉंग्रेस विरुद्ध मोदी अशी लढत होऊ दिली. आता मोदींना पूर्ण जाणीव आहे की एकाच मुद्यावर निवडणूक लढवता येणार नाही आणि आता आपण सत्ताधारी आहोत. त्यामुळे कॉंग्रेसच्य अपापाचे पाढे वाचण्यापेक्षा आपण केलेल्या कामाची यादी वाचणे हे कधीही श्रेयस्कर ठरणारे आहे. जी चूक कॉंग्रेसने मोदींच्या विरोधात केली ती चूक मोदी करणार नाही. नरेंद्र मोदी कॉंग्रेसकडे ७० वर्षांचा हिशेब मांडायला लागले तेव्हा कॉंग्रेसने आपल्या नेतृत्वाखाली देश कसा प्रगत झाला हे सांगण्याऐवजी मोदी किती नालायक आहेत हे सांगत बसले. पण मोदी ती चूक आता करणार नाही. सबंध प्रचारात ते काही वेळा कॉंग्रेसच्या चुकांकडे लक्ष वेधतील पण त्यांचा भर त्यांच्या विकास कामांवरच असणार आहे. आता कॉंग्रेसच्या काळातील भ्रष्टाचार उघड होत आहे. कोर्टात केस सुरु आहे. म्हणून मोदींकडे हा एक मुद्दा आहेच. ही सगळी व्यूहरचना आखताना राहूल गांधी आपल्या विरोधात असतील याची काळजी ते घेत आहेत. कारण त्यांना मतदारांवर पूर्ण खात्री आहे की गुजरात दंगलीमध्ये विरोधकांनी त्यांना बळजबरी अडकवण्याचा प्रयत्न केला तरी भारतीय जनतेने त्यांचीच निवड केली. मग आता राहूल गांधी हेराल्ड प्रकरणात अडकले आहेत तसेच कॉंग्रेसचे अनेक नेते विविध प्रकरणात अडकत आहेत. अशावेळी जेव्हा लोकांना राहूल आणि मोदी यांच्यात निवड करायची असेल तेव्हा लोक मोदींची निवड करतील. जे जे मोदी समर्थक आता मोदींना हटवण्यासाठी राहूल गांधींना समर्थन देतील त्यांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. कारण राहूल सध्या छीद्र असलेल्या होडीतून प्रवास करीत आहेत आणि त्यांच्या होडीत जो बसेल त्याचीही तशीच किंवा त्यापेक्षा वाईट अवस्था होईल. कॉंग्रेस आणि सबंध विरोधक राहूल यांना आपला नेता स्वीकारुन मोदींच्या जाळ्यात अडकत चालले आहेत. राहूल हाच मोदींना पर्याय ही तर मोदींचीच इच्छा… कारण राहूल गांधीच मोदींच्या गळ्यात विजयमाला घालणार आहेत.

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01