Reviews - Film, Books, Plays

मुरलेली कथा; मुरंबा


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01

कथेची गरज काय आहे? त्यानुसार पटकथा आणि संवाद लिहिणे, असं फार कमी होतं. बर्‍याचदा कमर्शिअल चित्रपटाच्या नावाखाली मीठ मसाला लावून चटपटीत करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. म्हणून अनेक वेळा मूळ विषय राहतो बाजूला आणि कथा भलतीकडेच भटकत राहते. पण भारतीय प्रेक्षकांना हा चटपटीतपणा आवडतो किंवा वारंवार आपण ते पाहत असल्यामुळे आपल्याला आता त्याची सवय झाली आहे. पण काही चित्रपट असे असतात जे आपल्या मूळ विषयाला चिकटून राहतात. मराठी चित्रपटांच्या बाबतीत सांगायचं झालं तर श्वास या चित्रपटा नंतर मराठी चित्रपटाकडे अमराठी प्रेक्षक आशेने पाहत आहेत. माझे अनेक गुजराती, उत्तर भारतीय मित्र आहेत. त्यांच्या तोंडून मी नेहमी ऐकत असतो की आम्ही आवर्जून मराठी चित्रपट पाहतो. कारण मराठी चित्रपट आशयघन असतात.

मुरंबा हा चित्रपट असाच आहे. विशेषतः हा चित्रपट पहिल्या सीनपासून शेवटच्या सीनपर्यंत मूळ कथेशी सुसंगत आहे. अलोकचं (अमेय) इंदूंसोबत (मिथिला) ब्रेकअप होतं आणि अलोक अस्वस्थ होतो. ही गोष्ट अलोक त्याच्या आई-बाबांना (सचिन खेडेकर, चिन्मयी सुमीत) सांगतो. अलोकचं म्हणणं असतं की ब्रेकअप होणं ही काही मोठी बाब नाही. हे आजच्या पिढीत होतंच राहतं. पण अलोकच्या आईला ही बाब पटत नाही. लग्न तुटणं आणि ब्रेकअप होणं ही एकच गोष्ट आहे, असं तिला वाटतं. हा या दोन पिढीतला अंतर आहे. पण हा अंतर दाखवताना अतिरेक झालेला नाही किंवा कोणतीही टोकाची गोष्ट करण्यात आलेली नाही. अलोक आणि इंदू लहानपणाचे मित्र, पुढे ते प्रेमात पडले आणि त्यांचं हे प्रेम-प्रकरण तीन वर्षांपासून सुरु आहे आणि दोघांच्याही घरच्यांची मान्यता आहे. मग नेमकं असं काय झालं ज्यामुळे त्यांचं नातं तुटलं, हे तुम्ही चित्रपटातच पाहू शकता.

चित्रपटाची कथा एका दिवसाची आहे. चित्रपट सुरु होतो तेव्हा फोनवरच अलोक आणि इंदूचं ब्रेकअप होतं आणि ही कथा अलोकच्या दृष्टीकोनातून पुढे सरकत जाते. अलोक आणि इंदूमधलं नातं हे आपल्याला अलोकला आठवणार्‍या दृश्यातून (Flash Back) कळतं. इथे लेखक, दिग्दर्शक असलेले वरुण नार्वेकर सुरुवातीला केवळ आलोकची बाजू आपल्याला दाखवतात. जी कथेची जमेची बाजू आहे. अलोकमुळे आपल्याला कळतं की इंदू त्यांच्या नात्याबद्दल किती बेजबाबदार आहे. पण अलोकच्या पालकांना विशेषतः त्याच्या बाबांना इंदूची बाजू जाणून घ्यायची असते. मग आपल्याला वाटू लागतं की नाण्याच्या दुसर्‍या बाजूला नक्कीच काहीतरी दडलंय. मग आपल्यालाही इंदूची बाजू ऐकण्याची उत्सुकता जाणवते.

ही मुळात एक विनोदी अंगाने जाणारी प्रेम कहाणी आहे. कितीतरी वर्षांपासून आपण चित्रपटात अनेक प्रेमकहाणी पाहत आहोत. म्हणून बर्‍याचदा प्रेम-कहाणी पाहताना उबग येतो. त्यात काहीही नाविन्य नसतं. पण तिच प्रेम कथा तुम्ही नव्या पद्धतीने मांडू शकता, हे मुरंबा पाहून आपल्याला कळतं. कथेची सुरुवात आणि कथेचा अंत म्हणजे कथा कुठून सुरु करायची आणि कुठे संपवायची याबद्दल प्रत्येकाचं वेगळं गणित असतं. महत्वाचं म्हणजे मुरंबामध्ये दोन्ही गोष्टी व्यवस्थित साधल्या गेल्या आहेत. कथेला एकदा सुरुवात झाली तर तिला योग्य ठिकाणी थांबवणे गरजेचे असते.

आपण कधी कधी ऐकतो की Happy Ending हे वास्तविक नसतं. म्हणून मुद्दामुन Sad Ending करण्याचा अट्टाहास काही लेखक आणि दिग्दर्शक करतात. मुळात चांगला शेवट किंवा दुःखात्मक शेवट हे त्या कथेच्या गरजेवर अवलंबून असतं. पण Happy Ending ती उगाच करु नये. त्याला ठोस कारण हवे. मुरंबाचा शेवट पाहताना कदाचित आपल्याला वाटेल की इतक्या सहज समस्या कशी सुटू शकेल? पण मुळात ती समस्या आपण (चित्रपटातील पात्राने) स्वतःच निर्माण केलेली असते, त्यामुळे एकदा का आपल्याला आपल्या चुकीची जाणीव झाली तर ती समस्या सहज सुटते. म्हणून मुरंबाचा शेवट उगाच केला आहे, असं वाटत नाही. हा शेवट म्हणजे कथेची गरज आहे आणि ती वास्तविकता आहे.

मुरंबाला ट्रिटमेंट चांगली देण्यात आली आहे. म्हणून आजच्या पिढीचं आणि आधीच्या पिढीचं संभाषण सुसंगत आहे. बर्‍याचदा आपल्याला जुन्या पिढीला समजून घेतलं पाहिजे, असं सांगितलं जातं. पण इथे नव्या पिढीची बाजू जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि त्यांची समस्या सोडवण्यासाठी जुनी पिढी पुढाकार घेते. आजचं युग प्रचंड वेगवान आहे. फेसबुकवर येणार्‍या अनोळखी व्यक्तींच्या विनंतीला आपण friendship Request म्हणतो आणि कोणतंही आपुलकीचं, जिव्हाळ्याचं नातं नसलेल्या व्यक्तींना आपल्याला Friends म्हणावं लागतं. ही आजची पिढी आहे. आता मागून येणारी पिढी तर याच संस्कारात वाढणार आहे. त्यामुळे त्यांचे प्रश्न क्षुल्लक वाटत असले तरी थोरा-मोठ्यांनी त्याकडे गांभिर्याने पाहिलं पाहिजे. अलोक आणि त्याच्या बाबांमधले संवाद आपल्याला हेच सांगतात. कोणत्याही प्रकारचा आकांडतांडव न करता, अगदी शांतचित्ताने ते अलोकचं म्हणणं ऐकून घेतात आणि त्याच्याशी सुसंवाद साधतात. त्याला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत त्याला समजवतात. ही नात्यांची गुंफण नार्वेकरांनी अगदी व्यवस्थित केली आहे.

अलोक आणि इंदू व आई-बाबा ही दोन्ही नवी-जुनी जोडी उत्तम पद्धतीने आपल्याला कळते. दोन्ही पिढीचं म्हणणं नार्वेकरांनी सुंदररित्या मांडलं आहे. अलोकच्या भुमिकेत अमेय अगदी शोभून दिसला आहे. तो आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करतो. इंदू ही मराठी चित्रपटाला मिळालेली सुंदर आणि गुणी अभिनेत्री आहे. तिचा लूक शहरी आहे. मराठीत निघणार्‍या आधुनिक चित्रपटात ती चांगलीच शोभून दिसेल. तिचं कॅमेर्‍यासमोर वावरणं लक्षणीय आहे. तिने तिची भूमिका सहज सुंदर निभावली आहे. चिन्मयी सुमीत उत्तम गृहिणी वाटतात. सचिन खेडेकरांनी बाबांची भूमिका उत्कृष्ट निभावली आहे. चित्रपटात लोकेशन्स कमी असले तरी ते साजेसे आहेत. काही सीन्स मोठे लिहिले गेले असले तरी कंटाळवाणे नाहीत. मुरंबा हा चित्रपट या चार प्रमुख पात्रांमधला संवाद आहे. म्हणून चित्रपट शाब्दिक असला तरी शब्दबंबाळ झालेला नाही. चित्रपटातले संवास मुळात सुद्धा वास्तविक आहेत. उगाच डायलॉगबाजी केलेली नाही. त्या प्रसंगाला जितके संवाद महत्वाचे आहेत, तितकेच आणि तसे संवाद चित्रपटात आहेत.

मुरंबाचं लेखन आणि दिग्दर्शन उत्तम आहे. मुरंबा हे नाव सुद्धा साजेसं आहे. मुळात वरुण नार्वेकरांनी त्यांची कथा चांगली मुरवली आहे. म्हणूनच हा चित्रपटरुपी आंबट गोड मुरंबा चांगलाच स्वादिष्ट झाला आहे.

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01