Poem

मी लिहायला बसतो तेव्हा…

मी लिहायला बसतो तेव्हा…
असंख्य कल्पनांचे थवे
उडत उडत माझ्या मनाच्या
फांद्यांवर येऊन बसतात
मी लिहायला बसतो तेव्हा…

मी लिहायला बसतो तेव्हा…
भुतकाळाच्या स्मशानात पहूडलेली
आठवणींची प्रेतं
अकस्मात तांडव घालू लागतात
मी लिहायला बसतो तेव्हा…

मी लिहायला बसतो तेव्हा…
मला ऐकू येतात,
हजारो द्रौपदींच्या किंकाळ्या.
माझ्या ह्रदयावर कोरले जातात,
मी न अनुभवलेल्या फाळणीचे घाव…
मी लिहायला बसतो तेव्हा…

मी लिहायला बसतो तेव्हा…
माझी प्रतिभा होते,
रतीच्या स्तनातील मधूर अमृत
देवकीच्या डोळ्यातील कठोर अश्रू
राजा सुधन्वाचे कोवळे वीर्य
पराशर-सत्यवतीचा मुक्त संभोग
पुष्यमित्राची राष्ट्रनिष्ठ तलवार
बुद्धाचे संतुष्ट दुःख आणि
तुकोबांचा अभेद्य आनंद
मी लिहायला बसतो तेव्हा…

मी लिहायला बसतो तेव्हा…
मीच होतो शिवबा आणि
मीच होतो अफझल
मीच होतो कान्हा आणि
मीच होतो राधा
मीच मिलन आणि
मीच विरह
मीच प्रेम आणि
मीच द्वेष
मीच अंधार आणि
मीच प्रकाश
मीच तर व्यक्त होत असतो
सगळ्या पात्रांतून
मीच होतो शब्द
भासतो केवळ निशब्द…
मी लिहायला बसतो तेव्हा…

कविता: जयेश शत्रुघ्न मेस्त्री


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01