Crispy

मेनू कार्ड

तुम्ही हॉटेलात गेल्यावर मेनू कार्ड पाहून तुम्हाला कधी घाम फुटला आहे का? बर्‍याच लोकांना घाम फुटतो तो मेनू कार्डवरील पदार्थांच्या किंमती पाहून. पण मला मात्र पदार्थांची लिस्ट पाहूनंच घाम फुटला. झालं असं की आमच्या सौ म्हणाल्या आज दुपारी बाहेरंच जेवूया. तसा मी आज्ञाधारी पुरुष आहे आणि जो पुरुष बायकोचं हट्ट पुरवतो तो सुखी असतो असं माझं ठाम मत आहे, असो… पुन्हा पुरुषपुराण नको.

तर आम्ही ठरवलं आज बाहेर जेवायचं. मी खवय्या असल्यामुळे मला वेगवेगळ्या हॉटेलात जेवायला आवडतं. आपला खाण्यावर मुळीच ताबा नाही. सात्विक आहार वगैरे वगैरे ही अंधश्रद्धा असते यावर माझी पूर्ण-श्रद्धा आहे. तर आम्ही एका हॉटेलात शिरलो. हॉटेल खुपंच श्रीमंत दिसत होतं. बाहेर उभा असलेल्या वॉचमनने (त्याला वॉचमन म्हणताना जीव धस्स होतोय. कारण तो खुपच रुबाबदार वाटत होता) मला धीररगंभीर स्वरात “गुड आफ़्टरनुन सर” म्हटलं. मीही त्याच्याकडे पाहून रुबाबात हलकीशी स्माईल दिली आणि आम्ही आत जाऊन बसलो. 

वेटरने पाणी आणून दिलं. त्याने आमच्याकडे पाहून “एनी ऑर्डर सर” असं म्हटलं. मी सवयीप्रमाणे मेनू कार्ड मागितला आणि अतिशय आत्मविश्वासाने मी मेनू कार्ड पाहू लागलो. जस-जसा मी मेनू कार्ड पाहत गेलो. तसतसा माझा आत्मविश्वास ओसरु लागला. मी हळूच इकडे तिकडे पाहिलं आणि मेनू कार्ड बायकोच्या दिशेने फिरवलं व म्हटलं “तुला जे हवंय ते मागव”. बायकोने मेनू पाहिला आणि म्हटलं की मला यातलं काही कळत नाहिये. मुळात ते इटालियन हॉटेल होतं आणि सगळ्या डिशेस इटालियन होत्या. त्या पर्दार्थांची नावं वाचून ते खायचं की उडवायचं हेच कळत नव्हतं.

शेवटी मी धाडस करुन वेटरला बोलवलं व विचारलं. लंचमध्ये काय आहे. तो स्मीत हासत म्हणाला “पिझ्झा…” मी त्याला खालून वर आणि वरुन खाली न्याहाळत मनातल्या मनात म्हणालो, “तुझ्या तिर्थरुपांनी तरी लंचमध्ये पिझ्झा खाल्ला होता का रे?”  मी माझी सहनशक्ती अगदी घट्ट ताणून धरली व त्याला स्पष्टंच विचारलं, “या सगळ्या मेनू कार्डमध्ये राईसचा आयटम कुठला आहे?” तर त्याने मेनू कार्डवरील एका पदार्थाच्या नावावर बोट ठेवलं. पण त्यात कुठेही राईस असं लिहिलं नव्हतं. तरीही वेटरवर मी पूर्ण विश्वास दाखवला व त्याला तो पदार्थ आणायला सांगितला. मला तर फारंच कौतुक वाटत होतं की इटालियन लोक काय खात असावेत? म्हणून तो अमूक तमूक जो काही पदार्थ होता त्याची आतूरतेने मी वाट पाहत होतो. तो पदार्थ आणून त्याने टेबलवर ठेवला आणि मी सुटकेचा श्वास सोडला. कारण तो पदार्थ अतिशय चांगला व चविष्ट होता.

तर अशी ही मेनू कार्डची गंमत. पण मला नेहमी एका गोष्टीची गंमत वाटते. जगात इतक्या विविध संस्कृती आहेत. त्यांचं राहणीमान, खाणं, पिणं इतकं वेगळं आहे. याची देवाण घेवाण झाली पाहिजे. तुम्ही तुमचं चांगलं आम्हाला द्या, आम्ही आमचं चांगलं ते तुम्हाला देतो. असं पूर्वीपासून चालत आलं आहेच. यापुढेही झालं पाहिजे. पण या देवाण घेवाण करण्याच्या परंपरेला लाथाडत स्वतःची संस्कृती(?) इतरांवर बलात्काराने लादणार्‍या प्रेषितांची मला नेहमीच कीव वाटत आली आहे.

लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री

असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01