Drama / Story

महापात्रा… भाग – ७

म्हातार्‍याच्या पायाखालची जमीनच सरकली… आदित्यनाथ म्हणाला मला तुमची मदत करायचीय… सांगा नेमकं काय झालं तुमच्या मुलीसोबत? म्हातार्‍याच्या तोंडून शब्दच फुटेना… केवळ खुळ्यासारखा पाहत राहिला.. आदित्यनाथ म्हणाला तुम्ही सागितलं नाही तर कसं कळेल मला? म्हातारा म्हणाला निघून जा इथून… तुम्ही जा इथून… नाहीतर तुमचा जीवही धोक्यात येईल…. आदित्यनाथ तसा भित्रा होताच… पण आज मात्र तो निश्चय करुनच रणांगणात उतरला होता… आपले पाप धुण्याची नामी संधी त्याच्याकडे चालून आली होती… पण ही संधी त्याचा जीवही घेऊ शकत होती… हे त्याला पक्क ठाऊक होतं…

आदित्य त्यांना सांगतो की तुम्ही घाबरु नका… आपण घाबरतो म्हणून हे लोक शेफारतात. पण आपण जर त्यांच्याविरिधात उभे राहिलो तर ते नाही काही करु शकत… म्हातारा म्हणतो की काही नाही करु शकत? त्यांनी माझ्या मुलीचा जीव घेतलाय… आदित्यनाथ विचारतो कुणी घेतला जीव? म्हातारा म्हणतो मी नाही सांगणार, नाहीतर ते माझ्या दुसर्‍या मुलीचाही जीव घेतील… हे वाक्य ऐकताच म्हातारीने मुलीला छातीशी घट्ट धरलं आणि ती थेरडी वाघिणीसारखी गरजली… जा… निघून जा… नकोय आम्हाला तुझी मदत… आम्हाला जगू दे. मुकाट्याने जगू दे… निघ इथून… पण आदित्यनाथ निश्चय करुन आला होता… तो काही हलायला तयार नव्हता… जोपर्यंत त्या माणसाचं नाव कळत नाही तोपर्यंत आपण इथून जाणार नाही असं त्याने सांगून टाकलं… आता मात्र म्हातार्‍याचा तोल गेला… आदित्यनाथ जात नाही म्हतल्यावर तो ताडताड करत स्वयंपाकघरात गेला नि कॅन घेऊन बाहेर आला. आदित्यनाथला कळेना हा काय करतोय… त्याने कॅनचं झाकण काढलं आणि आपल्या मुलीवर आणि बायकोवर घासलेट ओतू लागला… नंतर त्याने स्वतःवरही घासलेट ओतून घेतला. आदित्यनाथचे शब्दच मेले… त्याच्या तोंडून शब्दच फुटेना… म्हातार्‍याने त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि म्हणाला म्हण पंडीत म्हण… मंत्र म्हण… आज पहिल्यांदा तू जिवंत माणसांना अग्नी देणार आहेस… गप्प का बसलास… मंत्रोच्चार कर… आदित्यनाथ म्हणाला तुम्ही मरणारा घाबरत नाही. मग त्या माणसाला का घाबरता? म्हातारा म्हणाला मरणाला कोण खुळा घाबरतो रे… गरीब घाबरतो तो जीवनाला… मरणामुळे तर आपली सुटका होते.. पण हे जीवन? हे जीवन आपल्याला रोज मरायला भाग पाडतं… मी जर तुला त्याचं नाव सांगितलं तर तो माझ्या मुलीला उचलून नेईल आणि रोज तिच्यावर अमानुष अत्याचार करेल… त्यापेक्षा मेलेलं काय वाईट आहे? या सगळ्या जाचापासून सुटका तर मिळेल.

हे ऐकल्यानंतर आदित्यनाथ एक क्षणही तिथे थांबला नाही… आपण बेकायदा ज्या ज्या मुलींचे अंतिम संस्कार केले त्यांच्यासोबत काय झालं असेल याची जाणीव खर्‍याअर्थाने त्याला आज झाली होती. तो घरी आला… रात्रही बरीच झाली होती… दारुचे पाच सहा ग्लास त्याने रिचवले… पण आज कुणास ठाऊक मद्याची गुंगी त्याला चढली नव्हती. आज त्याला कोणत्याच स्त्रीचा आवाज ऐकू येत नव्हता, आज त्याला झोपही येत नव्हती… सिंधू हळूच खोलीत डोकावली… तिने त्याला काळजीने विचारलं अजून झोपला नाहीत? आदित्यनाथने नकारार्थी मान डोलावली… त्याने तिला जवळ बोलावलं… आपल्या मांडीवर बसायला सांगितलं… तिने ओळखलं की स्वारीला नेमकं काय हवंय… पण त्याला मात्र काही नको होतं…. त्याला काहीतरी द्यायचं होतं… इतकी वर्ष तर तो केवळ घेत होता… आता त्याने द्यायचं ठरवलं होतं… तो म्हणाला तुझं माझ्यावर किती प्रेम आहे? ती म्हणाली हा काय प्रश्न झाला का? माझं उरलेलं आयुष्य जितकं आहे तितकं प्रेम आहे तुमच्यावर… माझ्या शरीरात जितक्या धमन्या आहेत तितकं प्रेम आहे तुमच्यावर… माझं ह्रदय जितक्या वेळा धडधडतं तितकं प्रेम आहे तुमच्यावर… आदित्यनाथने तिला विचारलं, जर उद्या मला काही झालं तर काय करशील? तिचं ह्रदय जोरात धडधडू लागलं… तिची डोंगराळ छाती वरखाली होऊ लागली… तिच्या गरम श्वासाने त्याच्या छातीला उब मिळू लागली… तिने त्याला गच्च मिठी मारली… नयन-जलाने तिने आपल्या पतीदेवाला अभिषेक केला… तिच्या तोंडून शब्दच फुटेना… मग त्याने पुन्हा विचारलं… मी हे तुला दुखवण्यासाठी नाही म्हटलं… खरंच जर मला उद्या काही झालं तर तू काय करशील. कारण तशी परिस्थिती येऊन ठेवलीय… मला जर काही झालं तर तू मुलांचा सांभाळ करशील ना व्यवस्थित? तो पुढे काही बोलणार इतक्यात तिने तिचे ओठ त्याच्या ओठांवर ठेवले आणि त्याच्या शब्दांना जणू तिने आपल्या ओठांचे कुंपण घातले… शब्द तर कुंपणाआड बंदिस्त झाले. पण ओठ ओठांची भाषा बोलू लागले… जिव्हा जिव्हेला डसू लागली… अजगराप्रमाणे त्यांनी एकमेकांच्या शरीराला विळखा घातला… निरव शांततेत त्यांचे कामूक चित्कार रातकिड्यांच्या ओ ला ओ देऊ लागले… रात्रीचा आळस झटकून सूर्य केव्हाच कामावर रुजू झाला होता. पण या ब्राह्मण उभयंतानांचे डोळे अजूनही उघडले नव्हते… कौलाच्या फटीतून कोवळे उन्ह डोकावून पाहत होते… आज रविवार असल्यामुळे मुलांच्या शाळेचा प्रश्न नव्हता… पण हे ब्राह्मण जोडपं इतक्या उशीरापर्यंत पहिल्या रात्रीनंतरही कधी झोपले नव्हते. शेवटी कुणीतरी दार ठोठावलंच… तो अजूनही गाढ झोपेत होता… ती दचकून उठली… बाहेर त्यांचा मुलगा रिशभ होता… तिने कसेबसे कपडे आपल्या अंगावर चढवले आणि आदित्यनाथच्या अंगावर चादर टाकली… रिशभला भूक लागली होती म्हणे…

त्या प्रणय रात्रीच्या उन्मादाची मेंदी अजून रंगलीही नव्हती आणि ती आपल्या मुळ भूमिकेत शिरली… आईच्या… गृहिणीच्या… आदित्यनाथ सुद्धा काही वेळातच उठला… पटापट स्नान करुन बाहेर जायला निघाला… कुठे चाललात? मागून सिंधूचा आपुलकीचा आवाज ऐकू आला… मी एका कामासाठी तालुक्याला चाललोय… संध्याकाळपर्यंत येईन… सिंधू काळजीपोटी म्हणाली तालुक्याला जायला फक्त पाऊण तास लागतो. मग संध्याकाळ कशी होईल? आदित्यनाथला कळून चुकलं की आपणंच आपल्या पायावर कुर्‍हाड मारुन घेतली आहे. आपल्या जीवाचं काही बरंवाईट होणार नाही याची अतिरिक्त काळजी ही उठताबसता घेत राहणार… बायको अतिरिक्त काळजी करायला लागली की पुरुषाच्या डोक्याला ताप होतो… याक्षणी त्याने आपला पौरुषी अधिकार वापरण्याचा प्रयत्न केला… पण त्याचं काही चालेना… शेवटी एका शेठजीला भेटायला चाललोय अशी थाप त्याने मारली आणि थेट पोलिस स्टेशन गाठलं… तो पोलिस स्टेशनमध्ये तेव्हा त्याला तिथे त्या रात्रीचा तो तरुण मुलगा दिसला ज्याच्या बापानेच त्याच्या बायकोवर बलात्कार केला होता… दोघांची नजरानजर झाली. पण त्या तरुणाने आदित्यनाथला न ओळखण्याची शपथ घेतली होती जणू… सबइन्स्पेक्टर त्या तरुणाला दम भरत होते. चौधरी साहेबांचा मुलगा आहेस म्हणून… नाहीतर तुला पोलिसी खाक्या दाखवला असता… सबइन्स्पेक्टरने त्याच्या समोरंच चौधरीला फोन लावला… नमस्कार चौधरी साहेब… अहो तुमच्या सेवेसाठीच तर आम्ही इथे बसलो आहोत… नाही नाही… तुमचे सुपुत्र माझ्यासोबत आहेत… होय चौकीत… काही नाही हो… तरुण रक्त म्हटल्यावर चालायचंच… पण नशीब माझ्या हाती सापडले… नाहीतर… काय केलं? अहो… कायदा किती सक्त झालाय माहितीय तुम्हाला… त्यांना सांग अतुम्ही १८ वर्षाच्या वर मुलगी असेल तर प्रकरण आम्ही सांभाळून घेऊ शकतो… पण अल्पवयीन मुलीच्या बाबतीत आम्ही तुमची काहीच मदत करु शकत नाही. मी तिथे पोचलो म्हणून… नाही आम्ही त्या मुलीला आणि तिच्या घरच्यांना समजवलंय… समजलेत ते… पण सांभाळा लेकाला… आदित्यनाथच्या पायाखालची जमीनच सरकली होती… हे चौधरींचं कुटुंब आहे की बलात्कारी घडवण्याची शाळा? बाप, काका, मुलगा सगळे एकाच माळेचे मणी… मी तर ह्याला चांगला समजत होतो. पण हा सुद्धा त्यातलाच… अशुद्ध बीजापोटी फळे कडवट रानटी….

सबइन्स्पेक्टरने एका हवालदाराला बोलावालं आणि त्या तरुणाला घरी सुखरुप सोडायला सांगितलं… जाताना पुन्हा त्या तरुणाची आणि आदित्यनाथची नजरानजर झाली… त्या तरुणाने आदित्यनाथकडे पाहून विचित्र स्मित केलं… आदित्यनाथला कळेना हा तरुण आपल्याकडे पाहून असा का हसला? कदाचित आपल्याला त्याचं खरं रुप कळलं होतं म्हणून… आता सबइन्स्पेक्टर आदित्यनाथकडे पाहत म्हणाला ब्राह्मणदेव या… काय सेवा करु तुमची? आधी घडलेला प्रसंग पाहून आदित्यनाथचा कंठ कोरडा झाला होता…

क्रमशः

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री
#महापात्रा_दीर्घ_कथा


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01