Drama / Story

महापात्रा… भाग – ६

याचा अर्थ काल आपण ज्या स्त्रीची विधी करुन आलो ती अचला होती… होय ती अचलाच होती… होय होय ती अचलाच होती… ती विष पिऊन आत्महत्या नाही करु शकत. ति़च्या डोळ्यांत मी आत्मविश्वास पाहिलाय… ती आत्महत्या करणार्‍यापैकी नाहीये… असं म्हणत तो सरळ धावत सुटला… आणि रिशभ त्याला हाका मारत राहिला… बाबा कुठे चाललात? पण आदित्यनाथचे पाय झपाटले होते… आता तो थांबणार नव्हता…

आदित्यनाथ पळत पळत मिनूच्या घरी येतो… व्हरंड्यात मिनू आणि मिथिला बसलेत… दोघांच्याही डोळ्यांत अश्रू आहेत. आदित्यनाथ धापा टाकतोय… आदित्यनाथ विचारतो तुझ्या टिचरला काय झालं होतं? हा प्रश्न एकाएकी आल्यावर दोघी अचंबित होतात… मिनू म्हणते टिचरने आत्महत्या केली… आदित्यनाथच्या डोळ्यासमोर काल रात्रीचा प्रसंग उभा राहतो… मिथिला रडत सांगते की टिचरचं एका मुलावर प्रेम होतं… पण त्याने तिला फसवलं… मिनू म्हणाते म्हणून टिचरने विष पिऊन आत्महत्या केली… मिथिला लगेच म्हणते… नाही अचला टिचर आत्महत्या करुच शकणार नाही… आदित्यनाथ विचारतो का? का करु शकणार नाही… मिथिला म्हणते कारण ती नेहमी म्हणायची हे जीवन अनमोल आहे… या जगण्यावर प्रेम करा… तिचं सर्वांवर प्रेम होतं… तिचं स्वतःवर पण प्रेम होतं… आदित्यनाथला आपल्या मुलीच्या तोम्दून तत्वज्ञान ऐकताना कौतुक वाटतं… या प्रसंगातही त्याच्यातला बाप जागा होतो… तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवतो… ती त्याच्याकडे पाहत राहते. एकाएकी दोघांचा बांध फुटतो… मिथिला त्याला घट्ट बिलगून रडू लागते. त्यालाही अश्रू अनावर होतात… त्या बाप लेकीचा फुटलेला बांध पाहून भर उन्हात आभाळाही आपले अश्रू लपवता आले नाही…

आज आदित्यनाथला नेमकं काय झालं होतं हे त्याचं त्यालाच कळेना… कारण याआधी त्याने अनेक मृतदेहांचे बंदोबस्त लावले होते. अंतिम संस्कारच्या नावाखाली उत्तर भारतात कितीतरी गुन्हे लपवले गेले… हिंदू धर्मात मृतदेह जाळला जातो त्यामुळे मागे ठोस पुरावाही राहत नाही…
अचलाने आत्महत्या केली नाही हे जरी खरं मानलं तरी आत हे सिद्ध कसं करायचं? मृयदेहाची तर केव्हाच राख झाली होती… आतापर्यंत राखही शिल्लक राहिली नसेल… गंगामाईच्या कुशीत ती कधीच विलीन झाली असेल… आदित्यनाथला आतून वाटत होतं की अचलाच्या कुटुंबाला न्याय मिळवून दिला पाहिजे. पण ते गरीब आहेत… त्यांच्या लढण्याची ताकद नाही हे त्याला मुलीकडून समजलं होतं… मग त्यांनी मला इतके पैसे दिले तरी कसे? यामागचे नक्की कोणत्या तरी बड्या असामीचा हात आहे आणि तो त्यांच्यावर दबाव टाकतोय. आदित्यनाथ विचार करु लागला की आपल्याला काय करायचंय नको त्या भानगडीत पडून… पण मिथिलाने हे मनाला लावून घेतलं होतं… ती तरी किती दिवस रडत बसणार… दोना चार दिचस सुतकाचे… मग सगळं… पूर्वपदावर… तरीही त्याला आतून आवाज येत होता… त्या गरीब आई-वडीलांना न्याय मिळवून दिला पाहिजे. पण त्या दलित कुटुंबाला कोण न्याय मिळवून देणार? मुळात कुणालाच काही फरक पडणार नव्हता… पण आदित्यनाथ मात्र अस्वस्थ होता…

पण का? कदाचित त्याला अचलामध्ये आपली मुलगी दिसली असावी… आपलीही मुलगी वयात येतेय… तिच्यासोबत असं काही झालं तर? नाही… नाही… हे कुणीतरी थांबवायला हवं… मग मी का नको? रात्रीच्या त्या शांत वातावरणात त्याचं मन अशांत होतं… तो उठून मिथिलाच्या जवळ येतो… मिथिला अगदी शांत झोपलीय… तो आपल्या मुलीला प्रेमाने न्याहाळतो… वासनेच्या त्या नगरीमध्ये बाप लेकीचं एक असंही नात फुलतंय यावर साक्षात ईश्वराचाही विश्वास बसला नसता… आदित्यनाथने आपल्या मुलीला एकदा निरखून पाहिलं… तिच्या केसांवरुन मायेने हात फिरवला आणि तिच्या कळाळाचे चुंबन घेणार इतक्यात तो मागे सरसावला… तरूण मुलीचे चुंबन कसे घ्यायचे? मुलगी वयात येऊ लागली की आई वडीलांना जरा काळजीच घ्यावी लागते… मुलीशी जरा जपून वागावं लागतं… परस्परसंबंधांमधील हिंदू धर्मातले नियम काही कठोर आणि कालबाह्य वाटत असले तरी त्या नियमांमुळे विकृतीला थोडाफार तरी आळा बसत होता… मग त्याला एकदम आठवलं की आपण सकाळी आपल्या वयात आलेल्या मुलीला गच्च मिठी मारली… हे बहुधा पहिल्यांदाच झालं असावं… तिच्या वठारलेल्या छातीचा मृदू स्पर्श जरी त्याला झाला असला तरी त्याच्या मनात वाईट विचार आले नव्हते… पण तरीही त्याने ठरवलं… मुलीशी वागताना जरा जपून वागलं पाहिजे… शेवटी ती परक्याची धन आहे… त्याच्या नजरेसमोर लाल चोळीतील मिथिला उभी राहिली… आणि नकळत त्याच्या डोळ्यांनी अश्रूंना वाट मोकळी करुन दिली… अश्रू पण आसुसलेले पाहा… बापाने ठरवलं की मुलीचे चुंबन घ्यायचे नाही तरी ते लबाड अश्रू तिच्या कपाळावर ओघळलेच… त्याने आपले डोळे पुसत अश्रूंना बजावले खबरदार जर माझ्या पोरीला स्पर्श कराल तर…

इकडे अचलाच्या घराचा दरवाजा ठोठावला जातो… आत असलेल्या अचलाच्या आई-वडीलांचा आणि त्यांच्या लहान मुलीच्या काळजाचा ठोका चुकतो… म्हातारा आतूनच आवाज देतो को… को… कोण आहे? बाहेरुन कसलाच आवाज येत नाही… पुन्हा दार ठोठावण्याचा आवाज येतो… पोरगी रडकुंडीला येते… बापाला तिची अवस्था पाहवत नाही. तो सगळा जोर एकवटून म्हणतो… चालते व्हा… आता काय हवंय तुम्हाला? पण बाहेरचा माणूस मस्तवाल म्हणायला हवा… पुन्हा दार ठोठावलं जातं. माणूस मरणाच्या भिटीमुळे थोडा धीट होतो म्हणतात… म्हातार्‍यानेही आपलं बळ एकवटत दार उघडलं.. म्हातारीच्या आणि लेकीच्या काळजाचा ठोका चुकला… बाहेर एक माणूस तोंडाला कापड लावून उभा होता. त्याचे डोळे लाल झाले होते… म्हातार्‍याने त्याच्यासमोर हात जोडत म्हटलं आता आणखी काय हवंय तुम्हाला? तुमच्या मनाप्रमाणे मी सगळं केलं ना… मी एक लेक गमावलीय माझी. मला दुसरी लेक नाही गमवायची… पण तो माणूस हूं नाही की चूं नाही… तो सरळ आत शिरला. तसे म्हातारी आणि पोर घाबरली… म्हातार्‍याने बळे अवसान आणत म्हटलं आधी माझा जीव घ्या… त्या माणसाने आतून दरवाजा लावून घेतला… त्या दलित कुटुंबाला कळून चुकलं होतं की ही आपली शेवटची रात्र आहे… पण त्याने आपल्या बायकोच्या आणि मुलीच्या जीवाची भीक मागितली… आता मात्र त्या माणसाने आपल्या चेहर्‍यावराचा कापड काढला आणि म्हणाला मी आदित्यनाथ… पंडीत आहे… काल तुमच्या मुलीचि अंतिम क्रिया मीच केली… म्हातार्‍याच्या पायाखालची जमीनच सरकली… आदित्यनाथ म्हणाला मला तुमची मदत करायचीय… सांगा नेमकं काय झालं तुमच्या मुलीसोबत? म्हातार्‍याच्या तोंडून शब्दच फुटेना… केवळ खुळ्यासारखा पाहत राहिला.. आदित्यनाथ म्हणाला तुम्ही सागितलं नाही तर कसं कळेल मला? म्हातारा म्हणाला निघून जा इथून… तुम्ही जा इथून… नाहीतर तुमचा जीवही धोक्यात सापडेल…. आदित्यनाथ तसा भित्रा होताच… पण आज मात्र तो निश्चय करुनच रणांगणात उतरला होता… आपले पाप धुण्याची नमी संधी त्याच्याकडे चालून आली होती… पण ही संधी त्याचा जीवही घेऊ शकत होती… हे त्याला पक्क ठाऊक होतं…

क्रमशः

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री
#महापात्रा_दीर्घ_कथा


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01