Drama / Story

महापात्रा… भाग – ५


पण त्याने काही न म्हणता दार लावलं… तयार झाला व सिंधूला म्हणाला… आता कदचित पहाटेच येईन मी… दार मुळीच उघडू नकोस… माझा आवाज ऐकला तरंच दार उघड… ती काळजीपोटी म्हणाली सांभाळून जा… लवकर या… त्याने तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि त्या माणसांसोबत जीपमध्ये बसून निघून गेला… उन्हाळ्याचे दिवस असले तरी रात्री बाहेर चांगलाच गारवा होता. रस्त्याने जाताना पुन्हा ती झाडं त्याला रोखून पाहत होती. विचारत होती… का? का करतोस असली कामं? आदित्यनाथ मनात म्हणाला मी नाही केलं तर दुसरं कुणीतरी करेल. पण हे काम तर होतंच राहणार… गुन्ह्यांचा हा सिलसिला काही थांबणार नाही. झांडं म्हणू लागली… अरे पण कुणीतरी हे थांबवलं पाहिजे… नाहीतरी निष्पाप मुलींचे बळी पडतच राहतील… आदित्यनाथ विचारतो पण कोण थांबवणार… चहू बाजूने आवाज येऊ लागतो तू थांबव… तू थांबव… तू थांबव हे… आदित्यनाथला ते आवाज असह्य होऊ लागल्यामुळे त्याने दोन्ही हात आपल्या कानांवर ठेवले… एका माणसाने त्याला विचारलं काही होतंय का? आदित्यनाथ नाही म्हणाला… आता गाडी स्मशानाजवळ पोहोचू लागली… कुत्र्यांच्या भुंकण्याचे किळसवाणे आवाज ऐकू येऊ लागले… त्याच्यासमोर जणून प्रेतांची माळ गुंफल्याप्रमाणे काही मृत स्त्रीया उभा राहिल्या…थ्या त्याच स्त्रीया ज्यांना त्याने बेकायदा अग्नी दिली होती… त्यातील शेवट्ची स्त्री पाहून तो हादरलाच… ती शेवटची स्त्री दुसरी तिसरी कुणी नसून त्याची लाडकी कन्या होती… मिथिला होती… त्याच्या काळजात धस्स झालं. एका क्षणी वाटलं की त्या चार गुंडांना सांगून टाकावं की मी हे काम करणार नाही… पण नंतर त्याने विचार केला की ह्यांना जर असं काही सांगितलं तर हे लोक माझा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाहीत…

जीप आता स्मशानात पोहोचली… सगळे उतरले… ते प्रेताच्या जवळ जाऊ लागले तसा त्यांना एका माणसाचा रडण्याचा आवाज ऐकू आला… आदित्यनाथला सांगण्यात आलं की हा रडणारा माणूस यजमान आहे. आदित्यनाथने विधी करण्यासाठी सर्व साहित्य नीट मांडलं… पण त्याच्या चेहर्‍यावर प्रश्न चिन्ह उमटलं… कारण यजमान श्रीमंत दिसत नव्हता… एका सामान्य घरातला माणूस दिसत होता… एक सामान्य घरातला माणूस इतका खर्च करेल? इतके पैसे तो आपल्याला देऊ शकेल? तो या गुंडांना पाळू शकेल? नाही… नाही… काहीतरी घोळ आहे. विचारु का? नाही नको… हे गुंड माजलेले दिसतात… आपण आपलं काम करु आणि सटकू… साहित्य मांडून झालं होतं… प्रेतावर लाकडं पण ठेवून झाली होती. पुढी क्रिया करण्यासाठी तो उठला… त्याने प्रेताकडे एकदा पाहिलं आणि मग पाहतच राहिला… हा चेहरा… या मुलीला कुठेतरी पाहिलंय़… ही मुलगी आपली कुणीतरी लागते असं त्याला सारखं सारखं वाटू लागलं… आपल्या नात्यातली तर नाही. गावचीही नाही… मग कोण आहे… त्या चार गुंडांपैकी एकाने आवाज दिला… लवकर आटोप… आमच्याकडे वेळ नाहीये. तो मुकाट्याने विधी उरकू लागला… हा यजमान मुलीचा बाप आहे… कदाचित मुलीने विष पिऊन आत्महत्या केलेली दिसतेय… पण या मुलीला आपण ओळखतो हे मात्र नक्की… आता तिला अग्नी देण्यात आली… तिचं शरीर नष्ट झालं. पण तिचा चेहरा अजूनही आदित्यनाथच्या डोळ्यासमोर होता… यजमानाने त्याला ओल्या डोळ्यांनी पैसे देऊ केले… त्याने पैसे हतात घेतले आणि खरंच दोन तीन महिने पुरतील एवढे पैसे होते. त्यला अजूनही वाटत होतं की हा माणूस इतके पैसे देऊ शकणार नाही… त्या यजमानाला विचारायचं म्हटलं तर ते चार आडदांड गुंड समोरच होती… त्यातल्या एकाने आवाज दिलाच… चल तुला घरी सोडतो… ते जीपमध्ये बसले आणि निघून गेले. मुलीचा बाप मात्र तिथे अजूनही ताटकळत होता, रडत होता…

आदित्यनाथ घरी आला. पण तिचा चेहरा त्याच्या नजरेसमोर जात नव्हता… पहाटेचे चार वाजले होते. किमान दोन तास झोप घेण्याचं ठरवलं. सकाळी बरोबर तो ६ ला उठला… प्रातर्विधी आटोपून पूजा करुन नाश्त्याची वाट पाहू लागला… सिंधूने पराठे आणून त्याच्या पुढ्यात ठेवले. त्याला अंगणात रिशभ खेळताना दिसला. त्याने सिंधूला विचारलं आज मुलं शाळेत नाही गेली का? सिंधू म्हणाली गेलेली पण परत आली. सुट्टी मिळालीय त्यांना… सुट्टी? सुट्टी कसली? आदित्यनाथने विचारलं… सिंधू म्हणाली ते मलाही नीट माहित नाही. पण कुणी टिचर वारली म्हणे… श्रीराम असा अस्पष्ट उद्गार त्याच्या तोंडून बाहेर पडला… नाश्ता खाता खाता त्याच्या समोर ती कालची मुलगी येत होती… मग त्य्च्या लक्षात आलं की आपण काल दारु प्यायलोच नाही… एरव्ही दारुशिवाय त्याला झोप नाही यायची… पण काल चक्क दारु न पिता शांत झोप लागली… दोन तासाची झोप सुद्धा इतकी शांत… त्याला स्वतःचं कौतुक वाटलं… तेवढ्यात मिथिला पडलेल्या चेहर्‍याने बाहेर जाऊ लागली… आदित्यनाथने तिला विचारलं कुठे चाललीस? ती मागे वळून पाहिलं व म्हणाली मिनूकडे जाते… आदित्यनाथ म्हणाला ठीक आहे. दुपारच्या आधी ये… तिने होकारार्थी मान डोलवली… आदित्यनाथला जाणवलं की मिथिलाचा मूड ठीक दिसत नाहीये. तो तिला कारण विचारण्यासाठी हाक मारणार इतक्यात ती दूर निघून गेली… त्यानं तिच्या पाठमोर्‍या अकृतीकडे पाहिलं आणि स्वतःशीच म्हणू लागला किती मोठी झाली पोर… कालपर्यंत तर एवढूसं पिल्लू होतं… आज ती मला एक परिपूर्ण स्त्री वाटतेय… बघता बघता लग्न करुन सासरी निघून जाईल कळणार सुद्धा नाही. पोरं किती पटापट मोठी होतात नै? अरे देवा… हिने पराठे तर दिले. पण लोणी द्यायला विसरली वाटतं…

त्याने हाक मारली सिंधू… ए सिंधू… ऐकतेस का? आतून कसलाच आवाज आला नाही… मग त्याने रिशभला हाक मारली… रिशभ… बेटा जरा इथे ये… काय बाबा असं म्हणत तो जवळ आला… बेटा जरा लोणी आण ना बाबासाठी… आणि माय कुठे गेलीय ते पण बघ… हो बाबा असं म्हणत तो घरात पळत सुटला… पटकन त्याने लोणीचं पातेलं त्याच्या समोर ठेवलं. आदित्यनाथने चमच्याने लोणी घेतली आणि तो पळत सुटला… तेवढ्यात आदित्यनाथच्या काहीतरी लक्षात आलं आणि त्याने पुन्हा त्याला हाक मारली. तो आज्ञाधारी पुत्राप्रमाणे पुन्हा समोर येऊन उभा राहिला… आदित्यनाथने विचारलं माय कुठे आहे? त्याने दोन बोटं दाखवली. आदित्यनाथ म्हणाला अच्छा… बरं मला सांग… तुझी टिचर वारली का? रिशभ म्हणाला माझी टिचर नाही काही. दिदीची क्लास टिचर वारली… दिदीची? आदित्यनाथने आश्चर्याने विचारलं… रिशभ म्हणाला हो ना… म्हणून तर दिदी नाराज आहे. माझ्याशी पण नीट नाही बोलली… रडत पण होती… आदित्यनाथने विचारलं काय नाव होतं तिचं? रिशभ म्हणाला अचला… हे नाव ऐकताच त्याला चटका लागल्यासारखा तो उडाला… अचला? तो प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला जेव्हा तो पहिल्यांदा अचलाला भेटला होता… तिने अत्यंत मधून आवाजत विचारलं होतं “कोण हवंय तुम्हाला?”… अचला… याचा अर्थ काल आपण ज्या स्त्रीची विधी करुन आलो ती अचला होती… होय ती अचलाच होती… होय होय ती अचलाच होती… ती विष पिऊन आत्महत्या नाही करु शकत. ति़च्या डोळ्यांत मी आत्मविश्वास पाहिलाय… ती आत्महत्या करणार्‍यापैकी नाहीये… असं म्हणत तो सरळ धावत सुटला… आणि रिशभ त्याला हाका मरत राहिला… बाबा कुठे चाललात? पण आदित्यनाथचे पाय झपाटले होते… आता तो थांबणार नव्हता…

क्रमशः

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री
#महापात्रा_दीर्घ_कथा


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01