Articles

जाणीवेची खोली


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01

हीच अमुची प्रार्थना
अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी
माणसासम वागणे

उबुंटू या चित्रपटातील समीर सामंत यांचे हे गीत. या गीताचा प्रत्यय काही माणसांना पाहिल्यावर, भेटल्यावर येतो. जगाचा अगदी साधा नियम आहे. माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं तरी जग सुखी, आनंदी होईल. पण माणूस हा मुळातच महात्वाकांक्षी प्राणी आहे आणि आपली महात्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तो बर्‍याचदा इतरांचा विचार करत नाही. एवढेच नव्हे तर तो इतरांचा नाश करायलाही मागे-पुढे पाहत नाही. जगात घडणार्‍या नकारात्मक घटना किती भयानक आहेत? माणसं पंथाच्या नावाखाली एकमेकांचा जीव घेत आहेत.

हे आजच घडतंय असं नाही. हे आधीपासूनच घडतंय. आज बातम्यांच्या माध्यमातून या घटानांचा तपशील आपल्याला सहज कळतो, इतकेच. पण मग एकीकडे इतकं वाईट होत असताना दुसरीकडे मात्र खुपच चांगलं होत आहे. मी बर्‍याचदा विचार करतो की ज्ञानोबा हे कोणत्या मातीतून निर्माण झाले असावेत? देवाकडे स्वतःसाठी काही न मागता विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागतात. हा इतका मोठेपणा त्यांच्याकडे अगदी लहानवयात आला तरी कसा? इतके चांगले विचार ते कसे करु शकतात? अगदी सज्जन माणूस जरी म्हटला तरी तो स्वार्थी नसेल, पण तो ईश्वराकडे स्वतःसाठी काहीतरी मागेलच. पण ज्ञानोबा मात्र विश्वाचे कल्याण मागतात. हा मोठापणा आपल्यात का असू नये?

समर्थ रामदास लहान असताना एकदा बेपत्ता झाले. त्यांचे बाबा त्यांना दिवसभर शोधून थकले. आईला अश्रू आवरता येत नव्हते. मग रात्रीच्या वेळेस देवळात बसलेले त्यांना दिसले. बाबांनी त्यांच्या कानशिलात लगावून जाब विचारला, “तुझी आई सकाळपासून रडतेय, मी तुला शोधतोय. अरे तू होतास कुठे? आणि इथे बसून काय करत होतास?” तर रामदास म्हणाले “चिंता करितो विश्वाची”. हे विश्व म्हणजे नेमकं काय? आणि रामदास विश्वाची चिंता करत होते, म्हणजे काय करत होते? संत साहित्याचे गाढे अभ्यासक यशवंत पाठक म्हणतात की विश्व म्हणजे जाणीवेची खोली. मग ही जाणीवेची खोली म्हणजे काय हो? ही जाणीवेची खोली आपल्या मनात नसते का? जर असेल तर आपल्याला का जाणीव होत नाही?

जाणीवेची खोली म्हणजे मला तरी वाटतं की आपण माणूस म्हणून जन्म घेतला आहे. मग आपण माणसाशी माणसासारखं वागणं, माणसाच्या सुखात सहभागी होणं आणि दुःखात त्यांच्या मदतीला धावून जाणं. चिंता करितो विश्वाची म्हणजेच जाणीवेच्या खोलीचं चिंतन करणं. आज आपण अत्याधुनिक युगात वावरत आहोत. माणसाच्या गरजा वाढल्या आहेत. दिवसाला मिळणारे २४ तास तोकडे पडत आहेत. या अशा अत्याधुनिक युगात जाणीवेच्या खोलीचं चिंतन करणं कितपत शक्य आहे. पण आहे… काही माणसं आजही या जगात आहेत, ज्यांना पाहून आपल्याला तुकोबा आठवावेत, ज्यांच्यात आपल्याला ज्ञानोबा दिसावेत. अशाच एका माणसाचा परिचय दिनांक ३० जानेवारी २०१८ रोजी झाला.

युवा सुतार प्रतिष्ठानच्या “युवोत्सव” कार्यक्रमाला मी गेलो होतो. नाच-गाणी व नाट्य असा बहारदार कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात मनोज पांचाळ या तरुणाचा सत्कार करण्यात आला. मनोज पांचाळ हे काही महिन्यांपासून माझे फेसबुक मित्र आहेत. पण प्रत्यक्षात ते कोण आहेत? हे मला माहित नव्हतं. पण या कार्यक्रमात त्यांचा वेगळाच परिचय पाहायला मिळाला. तिशीतला हा सर्वसामान्य दिसणारा तरुण विश्वाची चिंता करत असतो. हा तरुण अनाथ आश्रमात वाढला आणि आता तो अनेकांचा सहारा झाला आहे. इतरांचे दुःख पाहून हा माणूस अस्वस्थ होतो. रस्त्यावर, रेल्वे स्टेशन अशा स्थळी जे निराधार वृद्ध दिसतात, त्यांना मनोज पांचाळ जेवणासाठी डबा द्यायचे, त्यांची विचारपूस करायचे. यातूनच “जाणीव”ची निर्मिती झाली. जाणीव या संस्थेची त्यांनी स्थापना केली. वृद्धाश्रम निर्माण झाले. निराधार आजी-आजोबांना मनोज पांचाळ यांनी हक्काचे घर दिले.

या कार्यात त्यांची पत्नी सुद्धा त्यांना साथ देत आहे. विठ्ठल आणि रुक्मीणीने दिन-दुबळ्यांना आपले म्हटले, त्यांच्या मदतीसाठी वेळोवेळी धावून गेले. म्हणून विठ्ठलाला आपण माऊली म्हणतो आणि रुक्मीणीला आपण रखुमाई म्हणतो. हे पांचाळ जोडपं म्हणजे आजच्या युगातील विठू-रखुमाईच आहेत. युवोत्सव कार्यक्रमात त्यांच्या कार्याची एक चित्रफित दाखवण्यात आली आणि प्रेक्षक व या उभयंतांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. मनोज पांचाळ यांनी केलेले उपदेशही मोलाचे होते. त्यांनी संस्कारावर भर द्यायला सांगितला. आपण मुलांवर चांगले संस्कार केले तर ते का आपल्याला वार्‍यावर सोडतील? म्हणून त्यांनी पालकांना आवाहन केलं की मुलांना पैसे नकोत, त्यांना प्रेम हवं आहे. मनोज पांचाळ यांना त्यांच्या भोवती असलेल्या गर्दीमुळे भेटता आले नाही. पण त्यांना लवकरच भेटायचे आहे. असो.

मनोज म्हणजे जो मनात जन्म घेतो, मनोजचा दुसरा अर्थ प्रेमाचा देव. हा प्रेमाचा देव आजी-आजोबांना प्रेम देतोय. इतकेच नव्हे तर ते गावोगावी विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. ते फटाके फोडून नव्हे तर ज्यांच्या घरात अंधार आहे त्यांना सोलार दिवे देऊन दिवाळी साजरी करतात. या माणसाबद्दल बोलावे तितके कमी आहे. इथे एक दृष्टांत आठवतो. स्वामी विवेकानंद अमेरिकेहून भारतात आले. त्यांनी सर्वधर्मपरिषद गाजवली, विवेकानंद या नावाची चर्चा होऊ लागली. ते भारतात आपल्या आजीकडे म्हणजे आईच्या आईकडे आले. तिथे त्यांची आई सुद्धा आली होती. त्यांनी त्यांच्या आजीला नमस्कार केला. मग त्यांनी आपल्या आईला नमस्कार केला. त्यांची आई त्यांच्याकडे पाहतच राहिली. विवेकानंद सुद्धा पाहत राहिले. आपली आई आपल्याला नेहमीप्रमाणे आशीर्वाद का देत नाही? काही क्षण असेच गेले. मग त्यांच्या आईच्या तोंडून उद्गार बाहेर पडले, “आशीर्वाद देऊ की घेऊ?”.

जाणीव या वृद्धाश्रमात राहणारे आजी-आजोबा मनोज पांचाळ यांना पाहून हेच म्हणत असतील, “लेकरा तुला आशीर्वाद देऊ की तुझा आशीर्वाद घेऊ?” मनोज पांचाळ या तरुणाचे कार्य खुप मोठे आहे. त्यांची जाणीव ही संस्था म्हणजे समर्थ रामदासांना अभिप्रेत असलेली जाणीवेची खोली आहे.

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01