Crispy

गिरे तो भी ढ्यांग ऊपर

स्थळ: दैनिक “काम”ना महाकार्यालय, म्हंबै

वेळ: रात्रौ १२ वा.

महासंपादक सोमरसाचा आस्वाद घेत आहेत. सोमरसाचा आस्वाद घेताना टायपिस्टला महावाक्य सांगत आहेत. उद्याचा अग्रलेख आणि पहिल्या पानाची पहिली बातमी याची जोरदार तयारी सुरु आहे. सबंध कर्मचारी वर्ग महासंपादकांकडे डोळे लावून बसलेले आहेत. महासंपादक सोमरसाचा प्याला ओठांना लावतात आणि महावाक्य उच्चारतात…

महासंपादक: गड आला, पण सिंह गडगडला…

महासंपदकांच्या मुखातून हे महावाक्य निघाल्यानंतर अवघ्या महाकार्यालयात, “वाह वाह” च्या आरोळ्या फुटल्या. सर्वांनी सोमरसाचा प्याला भिडवला. अवघे “काम”ना महाकार्यालय महासंपादकांच्या महावाक्याचे गुणगान गाऊ लागले. शत्रूच्या चारी मुंड्या चित्त केल्याचा आनंद सर्वांच्या चेहर्‍यावर ठळकपणे दिसत होता. महासंपादकांची मुद्रा स्वतःच्याच कौशल्याने प्रफुल्लित झाली होती. महासंपादक असेच नेहमी स्वतःत मग्न असतात. त्यांच्या स्वतःच्या शब्द कौशल्याचा त्यांना खूप हेवा वाटतो. “काम”नाच्या महाकार्यालयात ते काहीतरी काम करीत असत. त्या पदास सर्व महासंपादक म्हणतात. असो. महासंपदकांच्या महावाक्यानंतर पेपर छपाईचे काम सुरु झाले. कुणीतरी मध्येच म्हटलं,

कुणीतरी: महासंपादय महोदय, मुजरा…

महासंपादक: पेश करो…

कुणीतरी: काय?

महासंपादक: नाही, आपलं… ते… हे… हेल वाघोबा…

कुणीतरी: हेल वाघोबा… महासंपादक महोदय, आपण कमळाचा विजय झाल्यानंतरही पंजाची लाल केली. पण आपल्या इच्छुकांबद्दल काही लिहिले नाही.

महासंपादक: (धीरगंभीरतेने त्याच्याकडे चष्मा खाली करुन उघड्या डोळ्यांनी कटाक्ष टाकतात) इच्छुक? म्हणजे ते काय असतं?

कुणीतरी: महासंपादक महोदय, इच्छुक म्हणजे जे निवडणूकीत निवडणूकी लढविण्यासाठी उभे राहतात त्यांस मराठीत इच्छुक म्हणतात.

महासंपादक: मग उमेदवार काय मद्रासीत म्हणतात काय? (महासंपादक टिपिकल वाघोबा स्टाईलमध्ये गरजले)

कुणीतरी: महासंपादक महोदय, उमेदवार हा शब्द फारसीतून आलाय. पण इच्छुक हा शब्द शुद्ध संस्कृत पुरस्कृत मराठी आहे.

महासंपादक: फारसीतून आलाय म्हणजे परप्रांतीय म्हणायचा. ह्या परप्रांतीयांच्या तर…

कुणीतरी: महासंपादक महोदय, मूळ विषय बाजूला राहतोय.

महासंपादक: आता हा विषय कोण आहे?

कुणीतरी: विषय म्हणजे सबजेक्ट. आपण आपल्या इच्छुकांबद्दल म्हणजे उमेदवारांबद्दल काही लिहिले नाही.

महासंपादक: माझ्या तरुण मित्रा, पहिली गोष्ट म्हनजे कमळ हा पाकीस्तानपेक्षा मोठा सत्रू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंजा हा आपला नैसर्गिक मित्र आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपले उमेदवार हा गनिमी कावा होता.

कुणीतरी: गनिमी कावा?

महासंपादक: हो, गनिमी कावा. आपल्या उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले म्हणून कमळाच्या गोटात आनंद आहे. पण आपल्या उमेदवारांमुळे कंमळाला आपण पाणी पाजले. आपल्या उमेदवारांमुळेच तिकडच्या मराठी माणसाने कमळाला मते दिली नाहीत. हा आमचा दुहेरी डाव होता. कुणीही याचा अंदाज लावू शकलेला नाही आणि कुणालाही अंदाज लावता येणार नाही.

कुणीतरी: म्हणजे महासंपादक महोदय?

महासंपादक: म्हणजे म्हणजे वाघोबाचे पंजे, गुजरातची शान त्यावर धनुष्य बाण… गुजरातचा बंडखोर पटेल जेव्हा म्हंबैत आलेला, तेव्हाच ही योजना आखली गेली. आम्ही गुजरातमध्ये उमेदवार उतरवले त्यामुळे गुजरातमधील मराठी माणसाने आमचा नैसर्गिक मित्र पंजाला मते दिली, बंडखोर पटेलामुळे पटेलांनी पंजाला मते दिली आणि अशाप्रकारे आमच्या योजनेप्रमाणे पंजाने मुसंडी मारली. कमळ काठावर पास झाला, आलमगीर बादशहा राऊल बाजीगर ठरले आणि तुला तर माहिती आहे, हरुन सुद्धा जिंकणार्‍याला बाजीगर म्हणतात.

कुणीतरी: अशी होती योजना होय? महासंपादक महोदय, तुम्ही खरंच महान आहात. आमच्यासारखे साधे कर्मचारी सॉरी सैनिक आपली ही योजना ओळखू शकलो नाही. तुम्ही खरंच ब्रह्मदेवाचेही सल्लागार होऊ सकता. त्रिभूवनात आपल्या इतका हुशार, जाणता कुणीच नाही. आमच्या सारख्या कर्मचार्‍यांचे सॉरी सैनिकांचे भाग्यच की आपल्या ऑफिसमध्ये सॉरी सैन्यतळात काम करण्याची स्वर्ण संधी मिळाली. खरेच आमचे भाग्य… येतो महासंपादक महोदय. मुजरा करतो…

महासंपादक: उमराव जानमधला कर..

कुणीतरी: काय?

महासंपादक: आपलं… ते… हे… हेल वाघोबा.

कुणीतरी: हेल वाघोबा…

असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01

कुणीतरी निघून जातो. महासंपादक महोदय, सोमरसाचा प्याला पुन्हा ओठाला लावतात आणि धीरगंभीरपणे समोर शून्यात पाहतात. उद्या आपल्या बातमीने कमळ गटात अस्वस्थता पसरणार, त्यांच्या चारी मुड्या चित्त होणार, अश्रूंचा पाट वाहणार, आमची भवानी लेखणी म्हणजे काय तरवारीपेक्षा कमी आहे? असा मनोमन विचार करीत असताना कधी सकाळ झाली त्यांचं त्यांनाच कळले नाही. पेपर छापले, त्याचे वितरणही झाले. सैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. अवघे वाघोबा साम्राज्य महासंपादकांच्या महावाक्याची स्तुती करीत होते. महासंपादक आपल्या महाकार्यालयातून घरी जावयास हवे असा विचार करुन बाहेर पडले. महाकार्यालयाच्या बाहेर त्यांची महाकार उभी होती. ते महाकारपाशी आले. त्यांनी खिशातून महाकिल्ली काढली आणि महाकारचा दरवाजा उघडून आत बसले. गाडी सुरु करण्यापूर्वी सहज नजर मारावी म्हणून त्यांनी दैनिक “काम”नाची महावेबसाईट ओपन केली. आपली महावाक्यातील महाबातमी पाहिली, त्याखाली कमेंट वाचून महासंपदाकांच महाह्रदय महाकंपित झालं. कमेंटमध्ये लिहिलं होतं, “गिरे तो भी ढ्यांग ऊपर…”

लेखक: दिल्लीचा भाट जयेश…