Articles

इमोशन्स बिकता है बॉस…


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01

माणूस खुप इमोशनल असतो. वर वर धीट दिसणारा किंवा बेधडक भासणारा माणूस तर जरा जास्तच इमोशनल असतो. यामुळेच प्रसार माध्यमांनी इमोशन्स कॅच केले आहेत. गेल्या १० वर्शांपासून टेलिव्हिजन मिडिया खुपच इमोशनल झाला आहे. टिव्हीवरच्या सिरियल्स या महिलाप्रधान असून स्त्री किती शोषित असते हे वारंवार दाखवलं जातं. टिव्ही सिरीयल्समधली स्त्री इतकी शोषित असते की ती नवर्‍याच्या दुसर्‍या बायकोलाही स्वीकारते आणि महत्वाचं म्हणजे आधुनिक पुरोगामी वगैरे म्हणवून घेणारे लोक या गोष्टींचा स्वीकार करतात.

आपल्याकडे पूर्वी चित्रपट सुद्धा असेच तयार व्हायचे. घर हो तो ऐसा वगैरे चित्रपट म्हणजे मुद्दामून रडायला लावणार्‍या या कथा होत्या. म्हणजे खपल्या काढून पुन्हा पुन्हा रडावे, अशाच या बाबी आहेत. मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा एक बातमी खुप गाजली होती, प्रिन्स बोअरवेलमध्ये पडल्याची. तो त्यातून सुखरुप वाचला. पण न्यूज चॅनेलनी प्रिन्स पडल्याच्या वृत्ताला ज्या प्रकारे कॅश केलं, ते अतिशय किळसवाणं होतं. लहान मुलाबद्दल अधिक सहानुभूती असते, हे खरंय. पण जणू प्रिन्स बोअरवेलमधून बाहेर निघणं हा राष्ट्रीय मुद्दा झाला होता. तो बाहेर पडल्याच्या दुसर्‍या दिवशी कॉलेजमधील माझ्या एका मित्राने मला विचारलं की तू पेढे वाटलेस की नाही? मी त्याला गंमतीनेच म्हटलं की पेढे वाटण्यासारखा प्रसंग यायला अजून तशी करामत मी केलेलीच नाही. तर तो म्हणला, प्रिन्स बाहेर निघाला तेव्हा त्यांच्या विभागात सर्वांनी पेढे वाटले. यालाच कुणीतरी इमोशनल अत्याचार असं नाव दिलंय.

इमोशन्सचा हा खेळ खुप जुनाच आहे. भारतीय चित्रपट हे इमोशनल असतात. पण हे चित्रपट माध्यमापर्यंत सिमीत होतं तोपर्यंत ठीक होतं. टिव्हीमुळे इमोशन्सचा बाजार झाला आहे आनि लोक ते आवडीने पाहत आहेत. समाजातील काही बुद्धीआदी वर्ग चर्चा करत असतात की ही मालिका चांगली नाही वगैरे वगैरे. पण आपण पाहतो की तिच मालिका सर्वात जास्त चालते आणि अधिकाधिक वर्श सुरु असते. हे असं का होतं? हा लॉजिक अगदी साधा आहे. समाजातील स्वतःला बुद्धीवादी म्हणवून घेणारा जो वर्ग आहे, त्या वर्गाला सामान्य माणसाची नाडी माहित नाही. जी या माध्यमांना माहित आहे. अगदी निवडणूकीचं उदाहरण घ्या ना. निश्चलीकरणामुळे मोदी सरकारला फटका बसेल असं हा बुद्धीवादी वर्ग म्हणत होता. पण मोदी पुन्हा पुन्हा जिंकत आहेत. हा बुद्धीवादी नेहमी सर्वसामान्यांपासून दोन हात लांबच असतो. त्यामुळे त्याला भारतीय मनाचे व्यवस्थित विश्लेषण करता येत नाही. मुळात मालिका म्हणजेच उलगडत जाणे. पण आपल्याकडील सर्व मालिका या स्थिरावलेल्या आहेत. कथा पुढे सरकत नाही. काही चॅनेल्स तर कोनतीही सुसुत्रता बाळगत नाही. ते इकतं विसंगत दाखवतात की कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो, या सगळ्या गोष्टी लोक पचवतात तरी कश्या?

पण हे या माध्यमाचं तंत्र आहे. बहुसंख्य वर्ग हा विचार करणारा नसतो तर तो भावनाप्रधान असतो. मालिका सादर करताना तुम्ही किती वेगळ्या कथा देणार? अशक्य आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात एक कथा वर्षानुवर्षे चालवणे व चांगल्या पद्धतीने चालवणे केवळ अशक्य. त्यामुळे मालिकेत भरकटणे हे सहजक आहे. केवळ मालिकाच इमोशन्स कॅच करता असे नाही. तर रियॅलिटी शो सुद्धा इमोशन्स विकतात. “मुझे तेरे घर मे रोटी चाहिये” या असल्या असंबद्ध कमेंट्स परिक्षक करतात. एखाद्या स्पर्धकाच्या घरची परिस्थिती बिकट असेल तर त्याच्या परिस्थितीचा देखावा करतात. तो कसा गरीबीत वाढतोय, कश्या हालअपेष्टा सहन करतोय, त्याचे घरचे कसे दिनरात मेहनत करतायत? त्याच्या घरातलं कुणी मेलं असेल तर त्याचा देखावा. लोकांना रियॅलिटी सो मध्ये नाच-गाण्यांपेक्षा या असल्या इमोशनल गोष्टींमध्ये जास्त रस आहे. या गोष्टी जर रियॅलिटी शो मधून काढून टाकल्या आणि केवळ नाच-गाणी व परिक्षकांनी तोंड न उघडता मार्कं दिले तर एकही शो चालणार नाही. कारण लोकांना टॅलेंट नकोय, त्यांना इमोशन्स हवेत. त्यांना रडायला आवडतं आणि टिव्हीमध्ये रडणार्‍या चेहर्‍यात स्वतःला पाहायला आवडतं. कारण इथे इमोशन्स विकले जातात. इमोशन्स नसेल तर टिव्ही मिडिया बंद पडतील.

आजकाल बातम्या सुद्धा सिरीयल्ससारखे दाखवतात. एखादा प्रसंग अतिरंजित करुन दाखवणे किंवा क्राईम स्टोरी शूट करुन दाखवणे म्हणजे इमोशन्स विकणेच आहे. यातून सगळ्यात चांगली गोष्ट जर घडत असेल तर कलाकारांना काम मिळतंय. पण किमान न्यूज चॅनल हे माध्यम तरी यापासून वेगळं असायला हवं होतं. उलट न्यूज चॅनेल्स सिरीयल्सपेक्षाही जास्त इमोशन्स विकतात. राजकीय बातम्या सोडून द्या. पण इतर सर्व बातम्या पाहा. त्या अशा प्रकारे दाखवल्या जातात की लोक बातम्यांचा आनंद लुटत असतात. म्हणजे एखाद्या मुलाचा शाळेमदह्ये खून झाला तर न्यूज चॅनेलवाले ते असं रंगवतात की लोक एखादा चित्तथराक चित्रपट आनंदाने पाहावा अशाप्रकारे त्या मुलाचा मृत्यू पाहत बसतात. हे किती विचित्र आहे? इमोशन्स विकण्याच्या नादात लोकांच्या म्रुत्यूचाही सोहळा करुन टाकतो. मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणं असं जे काही म्हणतात ते हेच होय. श्री. व सौ. खान यांचा सुपुत्र तैमुर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करतो हे सुद्धा बातमीच्या रुपात दाखवतात. म्हणजे या बातमी प्रसिद्ध करणार्‍यांची मानसिकता काय असेल याचा अंदाजही आपल्याला लावता येणार नाही.

माणसाचे इमोशन्स इतके महाग झालेत. या इमोशन्सवर माध्यमे करोडो रुपये कमवत आहेत. माणसाने इमोशनल असावंच. पण त्याचा अतिरेक होऊ नये एवढं पाहिलं तरी खुप आहे. माध्यमे जे दाखवतात ते आपण पाहता. याचाच अर्थ आपल्याला जे हवंय तेच ते दाखवतात. आपण थोडीशी का होईना आपली रुची बदललई पाहिजे. जर हे असंच सुरु राहिलं तर उद्या आपल्या घरच्या गोष्टी सुद्धा चव्हाट्यावर येऊ शकतात. पूर्वी चार भिंतीत घडणार्‍या गोष्टी त्या भिंतीनाही ऐकू येत नसत. पण आज चव्हाट्यावर गोष्टी मांडण्याचा जमाना आहे. म्हणूनच राजनेते, कलाकार यांच्या आयुष्यात काय चाललंय यात आपल्याला रस असतो. व्हीआयपी लोकांबद्दल काही प्रमाणात ही उत्सुकता आपल्या मनात असणे स्वाभाविक आहे.

पण माणूस सामाजिक आयुष्यात कसा आहे हे महत्वाचं. प्रत्येकाचंच वैयक्तिक आयुष्य चांगलं असेल असं नाही. आपल्यापैकी सुद्धा कितीतरी लोकांचं आयुष्य चांगलं नसतं. आपण सेलिबिटी नाही म्हणून आपल्या जीवनात कुणाला रस नाही. पण उद्या असाही प्रकार निर्माण होऊ शकतो की लोकांना सामान्य लोकांच्या जीवनातही रस निर्माण होऊ शकतो आणि मग माध्यमे आपल्याही घरात डोकावून पाहतील व आपले इमोशन्स चव्ह्याट्यावर आणतील. आताच काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचली होती. प्रेमभंग झालेल्या एका तरुणीने प्रियकराच्या घरासमोर डीजे लावून डान्स केला. त्या तरुणीला असं करावसं वाटलं आणि मिडियाला ते प्रसिद्ध करावसं वाटलं. कारण, इमोशन्स बिकता है बॉस…

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01