Reviews - Film, Books, Plays

हा सर्व खेळ मनाचा; ध्यानीमनी


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01

कलाकार: महेश मांजरेकर, अश्विनी भावे, अभिजित खांडकेकर, मृण्मयी देशपांडे.
लेखक: प्रशांत दळवी.
दिग्दर्शक: चंद्रकांत कुलकर्णी.


ध्यानीमनी या नाटकावर आधारीत ध्यानीमनी हा सिनेमा बनवण्यात आलेला आहे. ते नाटक मी पाहिलं नसल्यामुळे माझ्यासाठी किंवा माझ्या पिढीसाठी हा सिनेमा ताजा आहे. ज्यांनी हे नाटक पाहिलंय त्यांचं म्हणणं असं आहे की सिनेमा बनवताना मूळ कथेत बदल करण्यात आलेला नाही. महत्वाचे म्हणजे नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक हे सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक सुद्धा आहेत. हा एक सायकॉलॉजिकल ड्रामा आहे. माणसाचं मन हे सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टींना कारणीभूत असतं. मन जे स्वीकारतं ते त्या व्यक्तीसाठी सत्य असतं. मग प्रत्यक्षात सत्य काही असो. पण मन म्हणजे नेमकं काय याचा निश्चित पुरावा कोणाकडेच नाही. तरी मन आपल्या शरीरावर अधिराज्य गाजवत असतं.

समीर करंदीकर (अभिजित) आणि अपर्णा करंदीकर (मृण्मयी) हे काही दिवसांसाठी सदाकडे (मांजरेकर) सुट्टी घालवायला येतात. सदा हा समीरच्या वडिलांचा माजी विद्यार्थी आहे. सदा त्याच्या कुटुंबा सोबत रोह्याच्या एका रिसॉर्टमध्ये राहत असतो. तो त्या कंपनीचा कर्मचारी आहे. सदाच्या बायोकचं नाव शालिनी (अश्विनी भावे) आणि मुलाचं नाव मोहित. मोहितवर शालिनीचा प्रचंड जीव आहे. त्याच्याशिवाय तिला जगच नाही. एवढंच काय तर मोहितमध्ये ती इतकी गुंतून गेली आहे, यामुळे तिला तिच्या नवर्‍याकडे पाहायलाही वेळ नसतो. ज्या दिवशी करंदीकर दांपत्य सदाच्या घरी रहायला येतं, त्या दिवशी मोहित पिकनीकला गेलेला असतो. रात्री उशीरापर्यंत मोहित परतत नाही. शालिनी अस्वस्थ होते, सदा मोहितला शोधायला जातो, त्याच्या मित्रांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा त्यांना उशीर होणार असल्याचं कळतं. अखेर मोहित घरी येतो, पण तो करंदीकर दांपत्याला दिसत नाही. पुढे काय होतं? हे आपल्याला ध्यानीमनी या चित्रपटात कळेल.

हा सिनेमा असला तरी याला नाटकाची ट्रिटमेंट देण्यात आली आहे. मराठी थिएटरचा प्रभाव सिनेमावर दिसून येतो. सिनेमाची कथा चांगली आहे. पण पटकथा लिहिताना थोडा वेगळा विचार केला असता तर सिनेमा वेगळ्याच उंचीला पोहोचला असता. अभिजित, मृण्मयी, अश्विनी भावे आणि महेश मांजरेकर हे या सिनेमाचे प्रमुख पात्र आहेत. अभिजितचं काम चांगलं झालंय. मृण्मयी लहान भूमिकेतही लक्षात राहते. महेश मांजरेकर यांनी सदाभाऊ उत्तम सादर केला आहे. पण अश्विनी भावे यांनी साकारलेली शालिनी आपल्याला खटकते. सुरुवातीपासूनच हाय पिचवर बोलते. प्रेक्षकांच्या मनावर सुरुवातीस सदाभाऊ मानसिक रुग्ण असल्याचे बिंबवण्यात आले आहे. पण शालिनीचं वागणं पाहता तिच मानसिक रुग्ण असल्याचे सुरुवातीपासून जाणवत राहतं.

गरज नसताना खुप मोठ्याने बोलणे, खुप मोठे ऍक्शन करणे, खुप काळजी घेणे, वरंवार मोहितची स्तुती करणे किंवा प्रत्येक वेळी मोहित बद्दल बोलणे यामुळे शालिनीला एखादा मानसिक आजार असावा असं आपल्याला वाटू लागतं. हे सर्व लेखक आणि दिग्दर्शकाने मोहितच अस्तित्व निर्माण करण्यासाठी केलं आहे. पण शालिनीचं वारंवार बोलण्याने आपल्याला कंटाळा येतो. ती कधी गप्प बसेल असं आपल्याला वाटू लागतं. तिला अधिक एक्स्प्रेसिव दाखवली नसती तर बरं झालं असतं.

आपण सर्वांनी राम गोपाल वर्मांचा कौन हा चित्रपट आहे. त्यात आधी आपल्याला वाटतं ती तरुण मुलगी संकटात सापडली आहे. त्या एका रात्री तिच्या आयुष्यात अनेक प्रसंग घडतात आणि चित्रपटाच्या शेवटी आपल्याला कळतं की ते सगळे प्रसंग तिच घडवत असते. हा जो भयानक धक्का आपल्याला बसतो, तो या चित्रपटात बसत नाही. त्याचं प्रमुख कारण पार्श्व संगीत आणि शालिनी हे पात्र. या दोन गोष्टींवर विचार केला असता तर चित्रपट उत्तम धक्कादायक ठरला असता. यातल्या बर्‍याचशा गोष्टी आपल्या अपेक्षेने प्रमाणे घडतात. म्हणून कथा चांगली असूनही अगदी खिळवून ठेवत नाही. याचा अर्थ असा नाही की चित्रपट फसला आहे, पण चित्रपट तितकासा परिणामकारक झाला नाही. महेश मांजरेकर यांनी सर्वसामान्य माणसाची भूमिका उत्तम साकारली आहे. त्यांचा अनुभवी अभिनय आपल्याला पाहायला मिळतो. मृण्मयी ही अतिशय गुणी अभिनेत्री आहे, हे तिने पुन्हा एकदा सिद्ध केलंय. शालिनीच्या पात्रावर लेखक आणि दिग्दर्शकांनी थोडा विचार केला असता तर ते महत्वाचं पात्र चुकल्यासारखं वाटलं नसतं.

चित्रपटाच्या पटकथेत विशेष काहीच नाही. तसेच संगीतही चांगले झालेले नाही. अशा सस्पेन्स, सायकॉलॉजिकल ड्रामाला संगीताची उत्तम साथ लागतेच. नाहीतर सबंध चित्रपट कितीही चांगला असता, तरी संगीत/पार्श्व संगीतामुळे चित्रपट खुप परिणामकारक होण्यास अयशस्वी ठरतो. या चित्रपटाच्या बाबतीत अगदी तसेच झाले आहे. चित्रपट खुप शाब्दिक झालाय. शालिनीच्या पात्रासाठी खुप शब्द खर्च केले आहेत. त्यामुळे पटकथा आणि संवाद विशेष जादू घडवून आणत नाही. चित्रपटाचा पूर्वार्ध अधिक उत्तम व्हायला हवा होता. पूर्वार्धात मोहितचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी खुप वेळ घेतला आहे. नाटकात आपल्याला शक्यतो शब्दांशिवाय पर्याय नसतो. पण चित्रपटात दिग्दर्शक शब्दांवाचून किंवा कमी शब्द वापरुन अंतरंग दाखवू शकतो. चित्रपट ठराविक क्लायमॅक्सने संपतो. परंतु एकंदर चंद्रकांत कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनाची विशेष स्टाईल, कलाकारांचा अभिनय आणि उत्तम कथा यामुळे चित्रपट पाहावासा वाटतो.

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01