Reviews - Film, Books, Plays

मनोरंजक; चि. व चि. सौ. कां.


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01

कलाकार: ललित प्रभाकर, मृण्मयी गोडबोले, भारत गणेशपुरे, प्रदिप जोशी, सुप्रिया पाठारे, पुर्णिमा तळवलकर, सुनिल अभ्यंकर, पुष्कर लोणारकर, ज्योती सुभाष, ऋतुराज शिंदे, आरती मोरे, सतीश अळेकर.
दिग्दर्शक: परेश मोकाशी.
कथा/संवाद/पटकथा: परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी.


प्रत्येक चित्रपटाचा बाज वेगळा असतो. त्यानुसारच आपण त्या चित्रपटाकडे पाहिलं पाहिजे. म्हणजे एखादा चित्रपट Mad Comedy असेल तर त्या चित्रपटात काही अशा गोष्टी घडू शकतात ज्या बुद्धीला सहजासहजी पटणार नाहीत. चि. व चि. सौ. कां. या चित्रपटात असाच काही प्रयोग करण्याचा प्रयत्न परेश मोकाशी यांनी केला आहे. ह्यात तीन विषय प्रामुख्याने मांडण्यात आले आहेत. एक म्हणजे पाणी आणि विजेची बचत.

दुसरे वेगन (प्राण्यांपासून तयार झालेले काहीही न वापरणारी व्यक्ती) आणि तिसरा विषय म्हणजे वैचारिक आधुनिकता. या जोडीला प्रेम कहाणी सुद्धा आहे. परेश मोकाशी यांचे आधीचे दोन चित्रपट जर कुणी पाहिले असतील तर त्याला हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता असेलच. आधीच्या चित्रपटापासून काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न यावेळी मोकाशी यांनी केला आहे. ही सत्या (ललित प्रभाकर) आणि सावी (मृण्मयी गोडबोले) या अत्यंत टोकाच्या व्यक्तींची कहाणी आहे. सत्या हा पाणी आणि विजेच्या बचतीसाठी प्रचंड आग्रही आहे. तो पराकोटीचा पर्यावरणप्रेमी आहे. पाणी वाचवण्यासाठी तो एकच शर्ट आलटून पालटून घालतो. तो स्वतः सोलार एनर्जीचा वापर करतो आणि त्यातही बचत करतो. पण तो मांसाहारी आहे. सावीचं प्राणी प्रेम सुद्धा टोकाचं आहे. ती वेगन आहे. गंमत म्हणजे ती किड्यांना सुद्धा वाचवते आणि मांसाहारी माणसाच्या रिक्षात सुद्धा बसत नाही.

ते दोघे राज (ऋतुराज शिंदे) आणि नेहा (आरती मोरे) या त्यांच्या मित्रांच्या लग्नात भेटतात. राज आणि नेहाचं लग्न काही दिवसात तुटतं. सावीच्या आई-बाबा तिच्या लग्नासाठी आग्रही असतात. योगायोगाने सत्याचं स्थळ तिला चालून येतं. ते दोघेही कांदापोह्याच्या कार्यक्रमाला एकमेकांना ओळखतात. सावी इथे एक अट ठेवते की तिला सत्यासोबत लग्नाआधी एकत्र राहायचं आहे. त्या दोघांमध्ये कोणतेही शारिरीक संबंध असणार नाहीत आणि या काही महिन्यांत त्यांचे सूर जुळले की मगच ते लग्न करतील. सत्याला ही अट मान्य करतो. मग सावी सत्याच्या घरी राहायला येते आणि त्यानंतर काय होतं? त्या दोघांचं लग्न होतं की नाही? त्यांचं असं लग्नाआधी एकत्र राहिल्यामुळे त्यांच्या घरच्यांवर काय परिणाम होतो? या सगळ्या गोष्टी विनोदी अंगाने दाखवल्या आहेत.

चित्रपटाचे हे दोन महत्वाचे पात्र अत्यंत टोकाचे असल्यामुळे चित्रपट गंमतीशीर ठरतो. पण चित्रपट पाहताना मला एक गोष्ट कळली नाही की मोकाशींनी सर्व पात्रांना ओरडून बोलण्याची सक्ती का केली आहे? नेहा आणि राजच्या भांडणाची सुरुवात जरी गंमतीशीर वाटली तरी नंतर मात्र खुपच आरडाओरडा झाल्यासारखं वाटतं. आरती मोरे ही गुणी अभिनेत्री आहे. तिला आपण याआधी काही चित्रपटात व मालिकांमध्ये पाहिलं आहे. पण तिचा जाडसर आवाज अजून मोठ्याने बोलल्यामुळे त्रासदायक वाटला आहे. मुळात चित्रपटातले प्रत्येक पात्र वरच्या पट्टीतच बोलले असल्यामुळे काही वेळा त्या सीनमधली मजा जाते. पण मध्यांतरानंतर कथा वेगळ्या वळणावर येते आणि मोठ्याने बोलण्याला थोडासा आळा बसतो. सावी आणि सत्या इतक्या टोकाचे का आहेत? याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. म्हणजे त्यांच्या घरात त्यांच्या स्वभावाचं कुणीच नाही. अशी कोणती विशेष गोष्ट त्यांच्या बाबतीत घडली ज्यामुळे सत्या पराकोटीचा पर्यावरण प्रेमी झाला आणि सावी वेगन झाली? हे आपल्याला कळत नाही.

पण तरीही त्या दोघांचं पात्र मजेशीर आहे. त्या दोघांचं एकमेकांशी वागणं सुद्धा वेगळं आहे. आता अरेंज मॅरेज असतानाही त्या दोघांचं लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणं जरी थोडसं अवघड वाटत असलं तरी तरी हा कथेतल्या गंमतीचा भाग मानायला हरकत नाही. कारण त्या दोघांना लग्न झाल्यानंतर काडीमोड होऊ नये म्हणून लिव्ह इनमध्ये राहायचं आहे. मी वर म्हटल्याप्रमाणे वैचारिक आधुनिकतेचा विषय हाच. या वैचारिक आधुनिकतेला जोड किंवा कथेच्या गंमतीची गरज म्हणून अजून एक लव्ह स्टोरी या चित्रपटात आहे, ती सत्याच्या आजीची (ज्योती सुभाष). आजीचा नवरा वीस वर्षापूर्वीच वारला आहे. आजीचं भुदरगडकरांवर (सतीश आळेकर) प्रेम आहे. ते दोघं नवयुवकांप्रमाणे लपून छपून भेटतात. त्यांच्या भेटीचे प्रसंग किंवा आजीला भुदरगडकरांना भेटण्यासाठी करावा लागणारा संघर्ष चांगला दाखवला आहे. यात वात्रटपणा नसून निरागसता आहे. म्हातारपणी माणूस कसा लहानमुलासारखा वागतो हे सुंदररित्या दाखलंय. अर्थात चित्रपट विनोदी असल्यामुळे काही ठिकाणी अतिशयोक्ती करणे गरजेची आहे.

सत्या हा प्रचंड पर्यावरण प्रेमी असला तरी एअर कंडिशनरच्या बाबतीत त्याने स्वतःमधला पर्यावरण प्रेमी मारला आहे. त्याचं पर्यावरण प्रेम तुम्ही चित्रपट पाहिल्यावर कळेलच. सगळ्याच गोष्टी मी इथे सांगितल्या तर चित्रपट पाहण्याची मजा जाईल. तर अशा या पराकोटीच्या पर्यावरण प्रेमी माणसाच्या घरी चक्क एअर कंडिशनर आहे. त्याला एसी शिवाय झोप लागत नाही. पंखा न लावता एसीने विजेची बचत कशी होईल? हा विरोधाभास आहे. असो. सत्या आणि सावी जेव्हा एकत्र राहतात, तेव्हा त्यांच्यात जे सीन्स घडतात ते चांगले आहेत. मुळात याच प्रसंगानंतर चित्रपटाची पकड मजबूत होते.

विनोदातून उलगडत जाणारी नाती, प्रेम, विज्ञान, निसर्गाविषयी परोपकाराची भावना या सर्व गोष्टी चांगल्या सजवल्या आहेत. आपण बर्‍याचदा मोठ्या लोकांकडून (या क्षेत्रातल्या) ऐकतो की सर्व कथा साधारण सारख्याच असतात. पण ती कथा कशी सांगायची यात वेगळेपण असायला हवं आणि परेश मोकाशी स्टोरी टेलर म्हणून तज्ज्ञ आहेत. कथा सांगण्याची त्यांची पद्धत वेगळी आहे. त्यांना मधुगंधा कुलकर्णींची उत्तम साथ लाभली आहे. चित्रपटातले अनेक सीन्स नवीन वाटतात. काही विनोदही मराठी चित्रपट म्हणून नवीन आहेत. स्वानंद किरकिरे यांनी गायलेले शिर्षक गीत आपल्या लक्षात राहते. भारत गणेशपुरे हे चित्रपटातील पात्र निवेदक म्हणून काम करतं. भारत गणेशपुरेंची त्यांच्या पद्धतीची टिपिकल डायलॉग डिलिव्हरी चांगली वाटते. इतर सर्व पात्रांनी चोख काम केलंय.

चित्रपट मनोरंजक आहे. प्रेम, विनोद या सोबत सामाजिक संदेश दिला आहे. पण मोकाशींच्या आधीच्या दोन चित्रपटाशी या चित्रपटाची तुलना करता येणार नाही. हरिशचंद्राची फॅक्टरी हा उत्कृष्ट चित्रपट होता आणि एलिझाबेट एकादशी तर एक उत्तम कलाकृती होती. मराठी चित्रपटातील सर्वात चांगल्या चित्रपटांच्या यादीत एलिझाबेट एकादशीचे नाव घेतले पाहिजे. पण मोकाशींचा हा वेगळा प्रयोग सुद्धा बर्‍यापैकी चांगला झाला आहे. चि. व चि. सौ. कां. हा एक चांगला व्यावसायिक सिनेमा आहे. तर मराठी रसिकांनी परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी या श्री व सौ यांचा चि. व चि. सौ. कां.

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01