Crispy

ब्रेकिंग न्यूज

आज सर्वोत्तम न्यूज चॅनलचे कार्यालय तसे शांतच होते. कोणत्याही नायिकेला कुणी डेटवर नेले नव्हते, कुणी प्रिन्स खड्ड्यात पडलेला नव्हता, कुणाचेही कुणाशीही लफडे झालेले नव्हते. सनसनाटी नाही नि कोणतीही ब्रेकिंग न्यूज नाही. आदरणीय संपादक महोदय देवाकडे “काहीतरी विपरित घडावे, किमान एखादा अतिरेकी तरी घुसावा” अशी प्रार्थना करीत होते. भारतासारख्या देशामध्ये सगळेच आलबेल झाले तर आपले पोट कसे भरणार? असा विचार ते आपले वाढलेले पोट पाहत करु लागले. रोज रोज कोणत्या बातम्या द्यायचा हा त्यांचा समोरचा एक यक्षप्रश्न होताच. पण तरीही त्यांच्या २० वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी कोणतीही बातमी हातची सुटू दिली नव्हती. गेल्याच महिन्यात त्यांनी धारावीच्या चाळीत बायका नळावर कशा भांडतात? या महत्वाच्या विषयावर एक रिपोर्ट तयार केला होता. याचे थेट प्रक्षेपण सुद्धा दाखवले होते. त्यामुळे त्यांच्या चॅनेलचे प्रेक्षक एका महत्वाच्या विषयाला मुकले नाहीत.

सध्या नरेंद्र मोदींचे कपडे, फडणवीसांचे वाढलेले पोट हे विषय त्यांच्या चॅनेलवर सुरु आहेत. पण तसे हे जुनाट विषय. दुपारचे बारा वाजले होते आणि त्यांच्या चेहर्‍यावरही बारा वाजलेले स्पष्ट दिसत होते. दुसरीकडे त्यांचा स्टार रिपोर्टर अप्रसन्न दोषी बातमी मिळवण्यासाठी वातानुकूलीत कारमधून वणवण भटकत होता. त्याच्या बाजूला त्याचा कॅमेरामॅन मिळेल ते दृश्य कॅमेरात टिपत होता. चुकून एखादी ब्रेकिंग न्यूज मिळालीच तर हातची सुटू नये हा त्याचा दिव्य हेतू. पण आज ट्रॅफिकही नव्हतं आणि कुणीही कुणाच्याही गाडीसमोर तडमडलंही नव्हतं. त्यामुळे आजची ब्रेकिंग न्यूज मिळवण्यासाठी स्वतःचीच लफडी बाहेर काढावी का? असा विचार दोषींच्या मनात एकदा घुटमळला. पण नको, जाऊ दे, असं म्हणत त्यांनी तो विषय झटकून टाकला. त्यांनी मध्येच इंटरनेटवर इतर चॅनेल्सचे अपडेट्स पाहिले. त्यांच्या चॅनेलवर एखादा गरमागरम विषय सुरु असेल तर तो विषय सुमडीत आपण ढापावा. पण सगळेच विषय पुचाट.

एका चॅनेलवर तर म्हणे, एका शेतकर्‍याने आपल्या परिस्थितीवर मात करत उत्तम शेती करुन दाखवली आणि उत्तम नफा सुद्धा कमवून दाखवला, अशी बातमी दाखवत होते. छ्या, ही काय बातमी आहे? तद्दन वाह्यातपणा… असं स्वतःशीच पुटपुटत स्टार रिपोर्टर दोषींनी इंटरनेट बंद केले. अहो, बातमी कशी असावी? शेतकर्‍याने आत्महत्या केली ही बातमी आहे. पीकाला चांगला भाव मिळाला नाही म्हणून रागाच्या भरात शेतकर्‍याने पीकांची नासधूस केली, ही बातमी आहे. शेतकर्‍याने उत्तम शेती केली ही बातमी दाखवणारा महामुर्खच आहे, असे भाव दोषींच्या चेहर्‍यावर दिसत होते. असल्या बिनकामाच्या बातम्यांच्या मागे दोषी कधीच लागले नाही. त्यांच्या बातम्या युनिक असायच्या. सर्वसाधारण पत्रकार जिथे पोहचण्याचा विचरही करु शकणार नाहीत, तिथे अप्रसन्न दोषी पोहोचायचे. जो ना देखे रवी असं काहीतरी म्हणतात ते दोषींच्या बाबतित लागू होतं. पण आज मात्र त्यांच्या वाटेला अप्रसन्नताच येणार होती असेच चिन्ह दिसत होते.

इथे संपादकही कंटाळलेले होते. शेवटी न राहून संपादकांनी आपल्या स्टार रिपोर्टरला फोन केला.
संपादक: हॅलो अप्रसन्न, कुठे आहेस.
अप्रसन्न: मी रस्त्यावर हिंडून हिंडून वैतागलोय. उन्ह सुद्धा चिक्कार आहे.
संपादक: अरे, पण तू तर गाडीत असशील ना?
अप्रसन्न: होय, मी गाडीतच आहे. पण गाडी तर उन्हात आहे ना?
संपादक: ए, तुझं ते लॉजिक तुझ्याकडेच ठेव. मला सांग काही लागलं का हाती?
अप्रसन्न: काहीच नाही. वैताग आलाय. मगाशी माझ्या मनात विचार आला की अगदीच काही हाती नाही लागलं. तर आपल्या स्टाफसोबत तुमचे ते प्रेमळ संबंध आहे. त्यावर एखादा रिपोर्ट तयार करावा.
संपादक: अरे मुर्ख आहेस का? अरे तरुण तू आहेस आणि तेजपाल माझा करतोयस होय? तुझे काय कमी प्रेमळ संबंध आहेत का?
अप्रसन्न: अहो, मागेच एका कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले की माणसाला कुत्रा चावला तर ती बातमी नसते, पण कुत्र्याला माणूस चावला तर ती बातमी असते.
संपादक: म्हणजे? तुला नेमकं काय म्हणायचंय?
अप्रसन्न: आपलं ते हे, आपलं हे ते… जाऊद्या हो, कामाचं बोलूया.
संपादक: ठिकाय… बरं… अगदीच काही हाती लागत नसेल तर सल्लूमियाच्या न झालेल्या लग्नावर एखादा रिपोर्ट का नाही चालवत? किंवा मुख्यमंत्री साहेबांच्या मिसेसचा एक ऍल्बम आलाय, त्यांनी यावेळेस गाणी म्हटली नसून गायलीत म्हणे. काय बोलतोस? करुया यावर ब्रेकिंग न्यूज?

तेवढ्यात अप्रसन्न दोषीचा दुसरा मोबाईल खणाणला. तर एक मेसेज आला होता. महत्वाचं म्हणजे, हा मेसेज त्यांच्या गुप्त सुत्रधाराचा होता. दोषींनी तो मेसेज वाचला आणि त्यांच्या भुवया उचांवल्या व ओठ फुलले, गालावर लाली उमटली. त्यांनी संपादक महोदयांना ब्रेकिंग न्यूज मिळाल्याचे सांगितले व सात आठ पत्रकार आणि कॅमेरामॅनचा ताफा घेऊन एका पत्त्यावर बोलावले. ड्रायव्हरने लगेच गाडी वळवली. एका घरासमोर येऊन गाडी थांबली. तेवढ्यात कार्यालयातून पत्रकार व कॅमेरामॅनचा ताफा येऊन धडकला. सगळेच दबा धरुन बसले होते. अप्रसन्न यांनी सर्वांना विश्वासात घेऊन सांगितलं की ही “बातमी सर्वप्रथम आपणच दाखवणार आहोत आणि या बातमीमुळे आपल्या चॅनलची टीआरपी सुद्धा वाढणार आहे. सावधान, आपली बातमी इकडेच येत आहे”.

तेवढ्यात तैमूरचे आई-बाबा तैमुरला घेऊन बाहेर आले. सर्वांनी आपले कॅमेरे तैमूरच्या दिशेने वळवले आणि एकच प्रश्नकल्लोळ केला. “आखिर तैमूर आज क्यों रोया?”

आणि अप्रसन्न यांनी लगेच कॅमेरासमोर आपले निवेदन सुरु केले, “तर आताच तुम्ही पाहिलं की तैमूर रडत होता आणि त्याचे आई-बाबा त्याला कुठेतरी घेऊन चालले होते. त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. याचाच अर्थ कुठेतरी पाणी मुरत आहे, याचाच अर्थ डाळीत काहीतरी काळं आहे, याचाच अर्थ…”

आणि अशाप्रकारे अप्रसन्न दोषी, संपादक आणि त्यांच्या संपूर्ण टिमला दिवसभरातील अत्यंत महत्वाची अशी ब्रेकिंग न्यूज मिळाली.

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्रीअसे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01