Reviews - Film, Books, Plays

प्रशांत दामले स्टाईल “भो भो”


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01

कलाकार : प्रशांत दामले, अश्विनी एकबोटे, सुबोध भावे, सौरभ गोखले, संजय मोने, शरद पोंक्षे, समीर विजयन, केतकी चितळे, किशोर चौगुले, राजन भिसे

कथा / दिग्दर्शन : भरत गायकवाड
पटकथा : भरत गायकवाड, जयंता बोर्डोलोय
संवाद: भरत गायकवाड, मकरंद सावंत, जयदीप लेलेमला पुन्हा एकदा म्हणावसं वाटतंय की मराठी चित्रपटात आशय आणि विषयाला अतिशय महत्व आहे. कितीतरी नवनव्या कल्पना मराठीतून आपल्यासमोर येत आहेत. हा मराठीतला जीवंतपणा आहे. हे मराठीचं वैशिष्ट्य आहे. प्रशांत दामले आपल्यासाठी अशीच एक मनोरंजक मेजवानी घेऊन आलेत. त्यांचा भो भो हा चित्रपट सिनेमागृहात झळकत आहे. चित्रपटगृहात शिरताना आपण प्रशांत दामलेंचा चित्रपट पाहायला जाणार आहोत हे डोक्यात पक्क बसलं होतं. याआधी त्यांचे बरेच चित्रपट टिव्हीवर पाहिले आहेत. मोरुची मावशी हे नाटक पाहिलं आहे. त्यांच्या सहज सुंदर अभिनयाशी आपण सारेच परिचित आहोत. त्यामुळे चित्रपटाला तोच “प्रशांत दामले टच” असणार हे पक्क माहित होतं आणि झालं तसंच.

चित्रपटाचं नाव वेगळ आहे तसंच चित्रपटाची कथाही वेगळी आहे. भो भो हा मर्डर मिस्ट्री आहे. ही एक डिटेक्टिव्ह स्टोरी आहे. पण ही रुढार्थाने डिटेक्टिव्ह स्टोरी नाही. तुमचा गोंधळ उडतोय ना? पण मी लिहिलेल्या वाक्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. याचं स्पष्टीकरण मी पुढे देईन. आपण चित्रपटाची कथा पाहूया. स्मिता भांडारकर या बाईचा खून झाला आहे आणि आरोपी आहे तिचाच पाळीव कुत्रा सॅंडी. स्मिताच्या पश्चात स्मिताच्या आईने काढलेली तिची एक कोटीची पॉलिसी आहे. पैसे मिळण्यासाठी आईने क्लेम केला आहे. इन्शुरेन्स कंपनी या क्लेमच्या चौकशीसाठी गुप्तहेर नेमतात. तो गुप्तहेर म्हणजे व्यंकटेश भोंडे (प्रशांत दामले). पी.डी(संजय मोने) भोंडेचा बॉस आहे.

भोंडे हा श्वानप्रेमी आहे. त्यामुळे या केसमधला त्याचा इंटरेस्ट वाढत जातो व चौकशी करताना त्याच्या लक्षात येतं की स्मिताचा मृत्यू सॅंडी चावल्याने झालेला नसून तिचा खुन झाला आहे. विनायक भांडारकर (सुबोध भावे) हा स्मिताचा नवरा आहे. विनायक सायकॉजीचा प्राध्यापक आहे. तर विक्रम भांडारकर (सौरभ गोखले) विनायकचा लहान भाऊ आहे. मुळात कुत्र्यावर खुनाचा आरोप असणं हेच किती नवीन आहे. म्हणूनच चित्रपटाची कथा फार रंजक व उत्तम आहे. पण पटकथा व काही ठिकाणी संवादाच्या बाबतीत मात्र आपली निराशाच होते.

काय खटकतं?

आपण ब्योमकेश बक्शी, शेरलॉक होम्सची सिरीज पाहिली आहे. पण मराठीत अशा प्रकारचा चित्रपट बनलेला नाही किंवा हा विषय फारसा कोणी हाताळलेला नाही. एखादी डिटेक्टिव्ह स्टोरी पाहताना आपल्याला अपेक्षित असतं ते गांभीर्य. जे या चित्रपटात बघायला मिळत नाही. हा मुळात विनोदी चित्रपट आहे. ब्योमकेश बक्शीच्या सीरीजमध्येही विनोद घडतो किंवा आता गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्शी या हिंदी चित्रपटातली कथा सुद्धा विनोदी अंगाने पुढे जाते व शेवटी जो स्पस्पेन्स उलगडतो तो अनपेक्षित असतो. पण भो भो या चित्रपटाची पटकथा खुपच कॉमन लिहिली असल्यामुळे स्पस्पेन्स अनपेक्षित वाटत नाही. म्हणजे एखादी मर्डर मिस्ट्री दाखवायची असते तेव्हा सर्वसाधारण नियम सगळेच लेखक पाळतात तो म्हणजे जो गुन्हेगार आहे, त्याला सोज्वळ दाखवणं व जो गुन्हेगार नाही त्याला संशयाच्या भोवर्‍यात अडकवणं आणि शेवटी आपल्याला कळतं की ज्याच्यावर संशय होता तो गुन्हेगारच नाही.

हा नियम या चित्रपटात सुद्धा काटेकोरपणे पाळला गेला असल्याने यातलं गुढ आधीच कळतं. थोडक्यात कॉमन लॉजिक म्हणजे जो गुन्हेगार वाटत नाही तोच गुन्हेगार आहे. मला वाटतं हा चित्रपट विनोदी बनवण्यापेक्षा चित्रपटात विनोद ओघाने आला असता तर बरं झालं असतं. चित्रपटातील काही दृश्ये खटकतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुत्राच खुनी आहे या गोष्टीवर पोलिस कोणताही अधिक तपास न करता विश्वास कसा काय ठेवतात? चित्रपटाची कथा पुढे ढकलण्यासाठी लेखकाने असं केलं असाव. तरीही स्पस्पेन्स उलगडत जातो ते मनाला पटत नाही. एका सीनमध्ये डिटेक्टिव्ह भोंडेला जॅकेट हा महत्वाचा पुरावा सापडतो. पण तो पुरावा ज्याप्रकारे सापडतो ते न पटण्यासारखं आहे. तो सीन उगाच निर्माण केल्यासारखा वाटतो.

दुसर्‍या एका सीनमध्ये विनायक भांडारकर भोंडेला आपला टॅब रिपेअरींग करण्यासाठी देतो. मला कळत नाही एखाद्या अनोळखी माणसाला आपण आपला महागडा टॅब रिपेअर करायला देऊ शकतो का? असे बरेच सीन्स उगाच निर्माण केलेत. भोंडेला चित्रपटाच्य अलेखकाने खुपच सहकार्य केलेलं दिसतंय. सगळे पुरावे त्याच्या समोर आणून ठेवलेत. त्यामुळे ही गुढकथा मुळीच वाटत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संवादातून जाणवतं की भोंडे हे पुर्वी हवालदार असतात. पण त्यांच्या श्वानप्रेमी स्वभावामुळे त्यांना त्यांची नोकरी गमवावी लागते. हा लॉजिक काही पटत नाही. एखादा माणूस श्वानप्रेमी असेल, आपण असं म्हणू की त्याचं श्वानप्रेम अतिरेक होतंय तरी सुद्धा त्याला नोकरीवरुन का काढून टाकलं याचा स्पष्ट उल्लेख झालेला नाही. अजून एक प्रश्न मला पडलाय तो असा की भोंडे ज्यावेळी पहिल्यांदा भांडारकरांच्या घरी जातो तेव्हा तो त्यांना उगाच नको ते प्रश्न विचारतो. पण कदाचित ही या डिटेक्टिव्हची पद्धत असेल किंवा लेखकाने विनोदनिर्मितीसाठी असं केलं असावं. असो

जमेची बाजू

पण चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे चित्रपटातील कलाकार. सर्व कलाकारांनी अक्षरशः अप्रतिम अभिनय केला आहे. प्रशांत दामले म्हणजे टायमिंगचे सम्राट आहेत. संपूर्ण चित्रपटात प्रशांत दामले लक्षात राहतात. त्यांची एनर्जी जबरदस्त आहे. त्याम्च्या सोबतीला अनेक दिग्गज कलाकार आहेत. अश्विनी एकबोटे, संजय मोने यांनी त्यांची भुमिका उत्तम निभावली आहे. सुबोध भावेंनी कंट्रोल्ड अभिनय केलाय. वेगवेगळ्या प्रकारच्या भुमिका निभावण्यात ते एक्सर्ट आहेत. शरद पोंक्षे डॉक्टरच्या भुमिकेत छान शोभलेत. सौरभ गोखले, समीर विजयन, राजन भिसे यांचीही उत्तम झाली आहे. छोट्याशा रोलमध्ये किशोर चौगुले लक्षात राहतात. केतकी चितळेचं गोड आणि निरागस दिसणं प्रेक्षकांना सुखावतं. भरत गायकवाडांचं दिग्दर्शन सुंदर झालंय. काही सीन्स खुपच उत्तम झालेत. भटक्या कुत्र्यांचा चांगल्या पद्धतीने वापर केलाय. ते दृश्य खरे वाटतात. आरोपी कुत्रा सॅंडीसोबतचे सीन्सही उत्तम झालेत. त्यामुळे सॅंडीच्या अभिनयाची प्रशंसा केलीच पाहिजे.

तर या चित्रपटाची कथा खरंच अफलातून आहे. पण पटकथा आणि चित्रपटाची मांडणी जर वेगळ्या प्रकारची झाली असती तर ही मराठीतली एक उत्कृष्ट कलाकृती ठरली असती. परंतु प्रत्येक कलाकृतीमध्ये काहीतरी कमकुवतपणा असतोय. कुणीच परफेक्ट नसतं असं म्हणतात. या चित्रपटात प्रशांत दामलेंना पाहण्याची एक वेगळीच मजा आहे. त्यांची नाटकाची विनोदाची शैली इथे जाणवते. सबंध चित्रपटात दामलेंनी साकारलेल्या भोंडेचे संवाद जास्त आहेत. त्यामुळे मला प्रामाणिकपणे वाटतं की भो भो हा चित्रपट प्रशांत दामले स्टाईल चित्रपट आहे.

लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01