Articles

बाहुबली आणि पाकव्याप्त काश्मीर

बाहुबली हा चित्रपट प्रचंड गाजला. भारतात पहिल्यांदा इतक्या मोठ्या बजेटचा आणि व्यापक चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे त्यास मिळलेला प्रतिसादही व्यापक व भव्य होता. हा हिंदू संस्कृती दाखवणारा चित्रपट आहे व असे चित्रपट निर्माण झाले पाहिजे, असू अनेक हिंदूत्ववादी लेखकांनी आळवला होता. पण याचा साक्षात्कार मला फिल्म रायटर्स असोसिएशनच्या कार्यालयात आला. तिथे एका मासिकात बाहुबलीवर प्रखाशित झालेला लेख मी वाचला. आता त्या मासिकाचे नाव व लेखाचे शीर्षक मला आठवत नाही. पण त्या लेखात बाहुबली हा हिंदू संस्कृतीवर आधारलेला चित्रपट आहे व ही चिंतेची बाब आहे वगैरे. म्हणजे जसं हिंदूत्ववादी लेखकांना वाटतं तसंच डाव्या लेखकांनाही वाटतं की बाहुबली हा हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवणारा चित्रपट आहे.

बाहुबली १ ला समीक्षकांनी बर्‍यापैकी पसंती दिली होती तर दुसरा भाग अनेकांना आवडला नाही. त्याच्या कारणांची चर्चा करण्याची ही जागा नाही. बाहुबली चित्रपटाची मूळ कथा बाहुबलीचा मुलगा आणि बाहुबलीची पत्नी त्यांचा प्रतिशोध. बाहुबलीचा मुलगा आपघाताने आपली आई देवसेनेला सोडवतो आणि नंतर त्याला कळतं की ती आपली आईच आहे व आपल्या पित्याचे राज्य आपला चुलता भल्लाळदेवने बळकावले आहे. मग तो सहज (सिनेमॅटिक लिबर्टी) भल्लाळदेवला हरवून आपले राज्य जिंकतो.

आपल्या आईला मुक्त करणे आणि गमावलेले राज्य पुन्हा प्राप्त करणे हे संस्कार मुळात भारतीयांनी घेतले पाहिजे. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या एक दिवस आधी आपण सोन्याच्या तबकात मुस्लिमांना पाकीस्थान देऊन एक शत्रू राष्ट्र निर्माण केले आहे. ते राष्ट्र आजही आपल्याला व्यवस्थित जगू देत नाही. सबंध भारत पाकीस्थान करणे हे त्या राष्ट्राचे ध्येय आहे आणि म्हणूनच ते भारतात अराजकता माजवण्यासाठी वेळोवेळी दहशतवादी हल्ले घडवून आणत राहतात. पण भारतातल्या जनता अजूनही फाळणी आणि पाकीस्थानच्या अत्याचारापासून अनभिज्ञ आहेत असेच त्यांचे वर्तन दिसते. एक सामान्य माणूस सीमेवर जावून लढू शकत नाही. परंतु सीमेवर लढणारे सैनिक मात्र सशस्त्र क्रांती घडवून आणू शकतात आणि सामान्य माणसे त्यांना धीर देऊ शकतात. फाळणी झाल्यानंतर सावरकर म्हणाले, “सिंधुवाचून हिंदू !अर्थावाचून शब्द! प्रणावाचून कुडी!” “इतर कोणी जरी विसरले तरी महाराष्ट्र पुन्हा सिंधू नदीला मुक्त केल्या वाचून राहणार नाही” हा विश्वास सावरकरांना वाटतो. हे वाक्य जरी भावनाप्रधान वाटत असले तरी हे वाक्य तर्कतिर्थ, विज्ञाननिष्ठ सावरकरांचे आहे, हे मात्र विसरुन चालणार नाही आणि भावना मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. भावनेशिवाय माणूस हा माणूस असू शकत नाही.

अशीच भावना ज्यू लोकांनी सहस्रो वर्षे जोपासली. नेक्स्ट इयर इन जेरुसलेम म्हणत त्यांनी कित्येक दिवस रात्र केवळ प्रार्थना केली असेल. त्यांनाही अनेकांनी ही केवळ एक भावना आहे, भावनेला वास्तवाचा आधार नसतो, म्हटले असेलच. पण ज्यू माणसाची शेवटची वेळ जेव्हा येते, त्याच्या आयुष्याची तिसरी घंटा जेव्हा वाजते तेव्हा तो आपल्या मुलांना जवळ बोलवतो आणि सांगतो की कधीही विसरु नका की तुम्ही ज्यू आहात. ही भावनाच तर आहे आणि या भावनेच्या बळावर त्यांनी इस्रायल नावाचे राष्ट्र निर्माण केले आहे. अर्थात त्यास कृतीची भयंकर जोड आहे. पण कृती करण्याआधी ती भावना मनात उत्पन्न झाली. सिंधू नदी मुक्त व्हावी अशी श्रद्धा प्रत्येक भारतीयाने जोपासली तर येणार्‍या काही वर्षांत आपण सिंधूसरीतेत पवित्र स्नान करु शकू. पण किमान आपण पाकव्याप्त काश्मीर मुक्त करण्याचे ध्येय तरी ठेवू शकतो. शिवाजी, मावळे आणि सामान्य जनता ह्यांचे ध्येय एकच होते, स्वराज्य. जे शिवरायांना हवे होते, तेच मावळ्यांना हवे होते आणि तेच सामान्य रयतेलाही. फलस्वरुप स्वराज्य स्थापन झाले. शिवराय छत्रपती झाले. हिंदवी स्वराज्य ही भावना जिजाऊंनी शिवरायांच्या मनात रुजवली. त्याचप्रमाणे साहित्यिकांनी पुढाकार घेऊन पाकव्याप्त काश्मीरची भावना जनतेच्या मनात रुजवली पाहिजे. साहित्यिक म्हणजे समाजाची माऊली. ज्याप्रमाणे जिजा माऊलीने शिवरायांवर स्वराज्याचे संस्कार केले त्याप्रमाणे साहित्यिकांनी जनतेवर पाकव्याप्त काश्मीर मिळवण्याचे संस्कार केले पाहिजे. तर आणि तरच सरकार आणि सैन्याला बळ मिळतो. सरकार आणि सैन्याच्या मागे जनतेचे बळ असावे लागते.

सिनेमाचा प्रभाव जनमानसावर होत असतो. एक दुजे के लिये हा सिनेमा पाहून अनेक प्रेमी जोडप्यांनी आत्महत्या केली होती. ज्यावेळी देवदास हा सिमेना प्रदर्शित झाला. त्याचा नकारात्मक परिणाय तरुणांवर होऊ लागला. अशा वेळी व्ही. शांताराम ह्यांनी माणूस नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली. चित्रपट व नाटकांचा प्रभाव लोकांवर लवकर होतो. म्हणूनच सावरकरांनी नाट्य लेखन केलेले आहे. बाहुबलीने ज्याप्रमाणे आपल्या आईला मुक्त केले आणि आपले राज्य परत मिळवले, त्याप्रमाणे पाकव्याप्त काश्मीर भारतीय सेनेने मुक्त करावे, तसेच काश्मीरमधील हिंसक कार्यावर आळा घालावा व दुष्ट पाकीस्थानास कायमचा धडा शिकवावा. जेणेकरुन पाक भारताकडे डोळे वर करुन पाहण्याचे हिंमत करणार नाही. पण हे ध्येय आधी भारतीय जनतेने जोपासले पाहिजे. हे कार्य अत्यंत कठीण आहे. पण पाकच्या घशात हात घालून ज्याप्रमाणे भारतीय सैन्याने बांग्लादेश मुक्त केला. त्या महापराक्रमी भारतीय सैन्याला हे शक्य आहेच. एक धक्का और दो, पाकीस्थान तोड दो…

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01