Reviews - Film, Books, Plays

चांगल्या कल्पनेचे निराशाजनक सादरीकरण; बघतोस काय मुजरा कर.


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01

कलाकार: जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, अक्षय टंकसाळे, हेमंत ढोमे, नेहा जोशी, पर्ण पेठे, अनंत जोग, अश्विनी काळसेकर, विक्रम गोखले.
लेखक/दिग्दर्शक: हेमंत ढोमे.


शिवाजी महाराजांचे नाव प्रत्येक जण स्वतःच्या फायद्यासाठी वापरतो. मग तो राजकारणी असो, सामाजिक कार्यकर्ता (असे स्वतःच म्हणवून घेणारे) किंवा अजून कुणीही. प्रत्येकाला शिवाजी महाराजांचं नाव वापरुन प्रसिद्ध व्हायचं असतं. कारण देशात महात्मा गांधी जसे चालतात, तसे महाराष्ट्रात शिवाजी महाराज आहेत, हे कटू सत्य आहे. शिवरायांचं नाव वापरलं की प्रसिद्धी मिळते व लोकभावना आपल्याकडे आकृष्ट होते. प्रत्येक जण महाराजांच्या इतिहासाने प्रेरीत झालेला आहे. पण ही प्रेरणा तोकडी आहे. शिवाजी महाराजांनी त्याकाळी जे पराक्रम केले, तसे पराक्रम आपण आता करावे, असं तरुणांना वाटत राहतं. मग ते पराक्रम करता येत नाही म्हणून आपल्या मुलाचं नाव शिवाजी, संभाजी ठेवायचं किंवा त्यांच्यासारखी दाढी ठेवायची किंवा स्वतःच्या नावापुढे राजे लावायचं की झाला पराक्रम. इतिहासातून आपण काय शिकावे हे अनेकांना कळत नाही, ते सांगण्याचा प्रयत्न लेखक, दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी केला आहे.

नानासाहेब (जितेंद्र जोशी) हे सातारा जिल्ह्यातील एका गावचे सरपंच आहेत. पांडाशेट (अनिकेत विश्वासराव) हा त्यांचा जीवलग मित्र व या दोघांचाही निष्ठावान सहकारी म्हणजे शिवा (अक्षय टंकसाळे). या तिघांचे शिवरायांवर मनापासून प्रेम आहे व शिवरायांच्या गड-किल्ल्यांचा विकास व्हावा व त्यातून सबंध महाराष्ट्राचा विकास अशी त्यांची मनीषा आहे. गडांवर सहलीसाठी येऊन धिंगाणा घालणार्‍यांना, गडाचे पावित्र्य भंग करणार्‍यांना ते तरुण चांगलाच हिसका दाखवतात. पण हे किती दिवस चालणार? म्हणून पांडाशेट नानासाहेबांना आमदार होण्यास सांगतो. आमदार होण्यासाठी काहीतरी मोठं करावं लागतं. म्हणून ते लंडनला जाऊन महाराजांची तलवार आणण्याचं ठरवतात आणि लंडनला जातातही. पुढची कथा जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.

आता सिनेमा हा विनोदी अंगाने पुढे जातो. त्यामुळे लंडनला जाऊन ती तलवार आणण्याची कल्पना विनोदीच वाटते. तलवार आणण्यासाठीचा जो सराव दाखवला आहे, तो पुन्हा विनोदीच आहे. लंडनला जाऊन तलवारीसाठी जी काही खटाटोपट करतात ती बालीश वाटते. राणीच्या पॅलेसमध्ये चोरी करताना पकडल्यानंतरही लंडनचे पोलिस त्यांना कोणतीही कठोर शिक्षा न करता तत्काळ देश सोडायला सांगतात, हे कुणालाही पटणार नाही. ती तलवार घेऊन भारतात आल्याचा दावा हे तरूण करतात, त्यावेळेस दाखवलेलं राजकारण अतिशय तर्कहीन आहे. महाराजांची तलवार या तिघांनी आणली आहे, असा दावा केल्यानंतरही लंडनचे सरकार आणि राणी यावर प्रतिक्रीया देण्याचे टाळतात. असं कसं होऊ शकतं? यावरुन लंडनचे शासन मुर्ख आहे किंवा सिनेमा बनविताना तर्क पूर्णपणे बाजूला ठेवला आहे, असेच सूचित होते. महाराष्ट्रात ती तलवार आणल्याचा दावा जेव्हा केला जातो, तेव्हा निर्माण झालेलं वातावरण संकुचित आहे. म्हणजे शिवरायांची तलवार महाराष्ट्रात परत आणली तर देशात हाहाकार माजला पाहिजे.

अनेक तर्क वितर्क निर्माण झाले पाहिजेत. आणलेली तलवार खरी की खोटी याची शाहनिशः खर्‍या अर्थाने झाली पाहिजे. लंडनशी सरकारने तशी बोलणी केली पाहिजे व त्यांच्याकडून या वृत्ताला दुजोरा मिळवला पाहिजे, हे यामागचं तर्क आहे. पण तसं काही न होता, सरकारी पक्षातील एक महिला नेता लगेच पत्रकार परिषद बोलावून आम्हाला या तरुणांचा अभिमान आहे वगैरे बोलून दाखवते, तसा वरुन तिच्यावर दबाव येतो. तलवारीची सत्यता पारखायला जो इतिहाससंशोधक (अनंत जोग) येतो, तो सुद्धा गंमतीदार आहे. “‘ही ६५ किलोची वाटत नाही” असं तो म्हणतो. म्हणजे महाराजांची तलवार ६५ किलोची आहे, हे लेखकाला कसं कळलं? बरं तो तलवार पाहून तलवार खरी असल्याचे सर्टिफिकेट देतो आणि त्यानंतरच पालटलेलं राजकारण, हे राजकारणाचा अभ्यास न करता ढोबळ मनाने लिहिलेलं आहे. राजकीय विरोधक, पत्रकार, समीक्षक, इतिहाससंशोधक इतके मुर्ख नसतात. असो.

लंडनला त्यांना एक मराठी मुलगी (सोनाली कुलकर्णी) भेटते. पण तिचं अचानक स्क्रीनवरुन गायब होणं खटकतं. अर्थात ते महत्वाचं पात्र नाहीच. पण तिची एक्झिट समाधानकारक वाटत नाही. अक्षय, पर्ण पेठे, नेहा जोशी, हेमंत ढोमे, रसिका सुनील, अनंत जोग, विक्रम गोखले, श्रीकांत यादव, अश्विनी कळसेकर या सर्वांनी त्यांची भूमिका छान निभावली आहे. अनिकेतचं खर्जात किंवा घशाला जोर देऊन बोलणं खटकतं. ते खोटं आणि नाटकी वाटतं. त्यात सहजता येत नाही. जितेंद्र जोशींनी त्यांची भूमिका नेहमीप्रमाणे उत्तम साकारली आहे. चित्रपटातलं शीर्षक गीत वगळता एकही गाणं प्रभावित झालेलं नाही. चित्रपटातील काही संवाद चित्रपटगृहात हशा आणतात. हेमंत ढोमेने चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. दिग्दर्शक म्हणून त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे. दिग्दर्शक या नात्याने त्याचं काम तसं बर्‍यापैकी समाधानकारक आहे. पुढील चित्रपटात दिग्दर्शन केल्यास तो अजून चांगलं देऊ शकेल. पण लेखक म्हणून हेमंत कमी पडलाय. चित्रपटाची कल्पना चांगली आहे, त्याहीपेक्षा हेतू तर उत्तमच आहे. पण पडद्यावर कथा सांगताना बर्‍याच गोष्टी चुकल्यात.

चित्रपट लिहितानाच तर्क बाजूला ठेवल्यामुळे निव्वळ मनोरंजनाला अधिक जागा देण्यात आली आहे. चित्रपटाचा विषय गंभीर असताना, तो विनोदी अंगाने दाखवण्याचा अट्टाहास का? आपल्याकडे मनोरंजन म्हणजे विनोद असंच पाहिलं जातं. मग बाकीच्या आठ रसांनी काय पाप केलंय? हाच चित्रपट वेगळ्या पद्धतीने आणि विषय गंभीर असल्यामुळे गांभीर्याने मांडला असता तर विषय पोहोचला असता. चित्रपटातून जो संदेश द्यायचा आहे, त्याचा आणि चित्रपटाचा एकमेकांशी थेट सबंध नाही. चित्रपट जिथे संपतो, ते अपेक्षित आहेतच, पण संपण्यासाठी जी सुरुवात होते किंवा संपूर्ण चित्रपट ज्या पद्धतीने जातो आणि चित्रपटाचा शेवट यात फारकत आहे.

चित्रपटात महाराजांच्या स्मारकारवरही भाष्य करण्यात आलेलं आहे. ते पुरेसं बोलकं आहे. नानासाहेबांना पडणारं स्वप्न, त्याचा त्यांनी घेतलेला चुकीचा अर्थ आणि शेवटी त्यांना जो योग्य अर्थ गवसतो त्या अर्थाचा आणि त्या स्वप्नाचा काडीचाही संबंध नाही. जंज़िर चित्रपटात अमिताभना पडणार्‍या स्वप्नाचा उलगडा शेवटी किती सहज आणि तार्कीक होतो, तसा इथे होत नाही. चित्रपट बनवण्याचा उद्देशच चांगला संदेश देणे हा आहे. पण संदेश देण्याची पद्धत फसली आहे.

तरीही एक गोष्ट सांगावीच लागेल की हा चित्रपट कमर्शियल ऍंगलने बनवलेला असल्यामुळे चित्रपट पाहतात श्रोते उत्सुक असतात. तो सामान्य मराठी माणसाला किंवा गावाकडच्या माणसाला साद घालणारा आहे. “गावरान कोंबडं always गड्या tastyच लागतय”, या गाण्यावर प्रेक्षक नाचले आहेत. “तुमचं आमचं नातं काय… जय जिजाऊ! जय शिवराय” असे संवाद टाळ्या मिळवतात. त्यात शिवाजी हे महाराष्ट्राचे प्राण आहेत. त्यांचा जयजयकार होत असताना कोण मराठी उल्हासित आणि उत्सुक होणार नाही? गदकिल्ल्यांचे संवर्धन, तेथील स्वच्छता या विषयावर चित्रपट प्रामुख्यात भाष्य करतो, ते कौतुकास्पद आहे.

चित्रपट व्यवसायिक गणिताचा आहे. शिवरायांच्या आणि गडकिल्ल्यांच्या प्रेमींना उत्तेजना देणारा आहे. हेमंत ढोमेने एक प्रामाणिक प्रयत्न कला आहे.

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री


असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01