Reviews - Film, Books, Plays

१९०९ : पालकांनी मुलांना दाखवावा असा चित्रपट

कलाकार : अक्षय शिंपी, श्रीकांत भिडे, अमित वझे, रोहन पेडणेकर, श्रीनिवास जोशी

निर्माते : श्री वेंकटेश्वरा मूव्हीज, दिग्दर्शक : अभय कांबळी, संगीत : प्रदीप वैद्य.

वर्ष: २०१४

“दे दी हमे आझादी बिना खडग बिना ढाल” अशा खोट्या बोंबा मारणार्‍या लोकांना आणि अन्यायाच्या विरोधात मेणबत्त्या पेटवणार्‍या आजच्या सो-कॉल्ड तरुणाईला सणसणीत चपराक देणारा चित्रपट म्हणजेच १९०९. आपल्या संसाराची होळी करुन स्वातंत्र्य यज्ञात स्वतःची आहूती देणारे क्रांतिकारक यांची वीरगाथा म्हणजेच १९०९. वीरगाथा ही कृरगाथा नसते तर शौर्यगाथा असते याची जाणीव करुन देणारा चित्रपट म्हणजेच १९०९. अनंत कान्हेरे नावाचा असाच एक तरुण या सशस्त्र क्रांतियुद्धात उडी घेतो आणि जॅक्सन नावाच्या गोर्‍या राक्षसाचा वध करतो. अनंत कान्हेरे हा मिसुरडही न फुटलेला अतिशय तरुण मुलगा.

बाबाराव आणि तात्याराव सावरकर यांच्या विचाराने प्रेरित झाला. बाबाराव सावरकर यांच्यावर झालेल्या अन्यायाचा सूड उगवण्यासाठी सज्ज होतो आणि ज्या वयात आजची मुलं सुंदर तरुणीच्या मिठीचा हार करुन घेतात. त्या वयात अनंत कान्हेरेने फासाच्या दोरालाच गळ्यातील हार केला. नाशकामध्ये किर्लोस्कर नाटक कंपनीचं विजयानंद नाट्यगृहात संगीत शारदा हे नाटक सुरू असताना अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनचा वध केला. अनंताची ही शौर्यगाथा दिग्दर्शकाने चांगल्या पद्धतीने मांडली आहे.

कोणत्याही नावाजलेल्या कलाकारांना न घेता, नव्या कलाकारांना संधी देण्यात आली आहे. पण या नवोदितांनी हे शिवधनुष्य चांगलेच पेलले आहे. या चित्रपटाची जमेची बाजु म्हणजे याचे दिग्दर्शन, कला-दिग्दर्शन, संगीत आणि अभिनय. परंतु याची कथा खुपच हळूवार पुढे सरकते. चित्रपट तसा बराच लांबला आहे. पण चित्रपटात नाट्य घडत नाही. तर नुसत्याच चर्चा होतात आणि दुसरे म्हणजे चित्रपट तुकड्या तुकड्यांनी पुढे जातो. त्यामुळे संकलनाची बाजू तशी मजबूत नाही. चित्रपटाची लांबी पाहता चर्चा थोड्या वगळून जर नाट्य घडवले असते तर चित्रपटाला वेगळी उंची लाभली असती.

पण तरीही चित्रपट पाहताना कंटाळा येत नाही. याचे कारण नवोदितांनी केलेला उत्तम अभिनय आणि संवाद. रोहन पेडणेकरने साकारलेले विनायक देशपांडे यांची भुमिका आणि श्रीकांत भिडे यांनी साकारलेले कृष्णाजी कर्वे हे अतिशय जिवंत वाटतात. अमित वझे यांच्या सशक्त अभिनयामुळे बाबाराव सावरकर आपल्या समोरच उभे आहेत असा भास होतो. अक्षय शिंपी या तरुण कलावंताने अनंद कान्हेरे यांची भुमिका उत्तम साकारली आहे. चित्रपटाच्या संगीतामुळे चित्रपटाला बहर आली आहे. विशेष म्हणजे वंदे मातरम या क्रांतिगीताला दिलेली चाल व संगीत यामुळे अंगावर काटा येतो. अभय कांबळींनी दिग्दर्शनाची बाजू छानच पेलली आहे. १०० वर्षाआधीचा काळ दाखवण्यात ते यशस्वी ठरलेत.

थोडक्यात सांगायचे तर बर्‍याच काळानंतर स्वातंत्र्य संग्रामावर आलेला हा चित्रपट चांगला आहे. अनंत कान्हेरे आणि त्यांच्या सहका-यांनी हा कट कसा रचला? तत्कालीन परिस्थिती कशी होती? या गोष्टींचा तपशील आपण चित्रपटात पाहू शकतो. पालकांनी आपल्या मुलांना आवर्जून दाखवावा असा हा चित्रपट आहे.

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01